एका विचाराने प्रभावित झालेला गट म्हणजे संप्रदाय होय. एखादा काळ, धर्म, भक्ती, कला किंवा विषय अशा अनेक स्वरूपाची विचारसरणी प्रथमत: स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करते. त्यातूनच एक अनुकरणशील गट उदयास येतो. हाच गट आपले विचार समाजव्यवस्थेच्या माध्यमांतून क्रियाशील ठेवत असतो. या विचारांना प्रभावित आणि निर्मितीक्षम करणारी व्यक्ती असतात, जी या संप्रदायाला चालवत असतात किंवा समाजाचे चालक असतात.
अर्थशास्त्रीय स्वरूपाची मांडणी करताना वरील विषयाच्या अंगाने ऐतिहासिक संप्रदाय अभ्यासणे आवश्यक आहे. यामध्ये प्राचीन काळापासून अर्थशास्त्राचा एक विचार प्रभावीपणे समाजमनावर बिंबविणारा आणि आर्थिक विचारांचा अभ्यास करणारा गट असतो; जो अर्थव्यवस्थेच्या मार्गाने सामान्य दृष्टीकोन बाळगून असतो; मात्र स्थळ, काळ आणि संस्कृती यांच्या बदलत्या स्वरूपामुळे हे सांप्रदायिक विचार बदलत जातात. जुन्या विचारांना नवीन आयाम मिळतो व एक नवा संप्रदाय उदयास येतो. असे सांप्रदायिक गट हे जुने आणि नवे विचार यांना जोडणारे असतात. त्यामुळे अशा आर्थिक विचारांच्या बाबतीत निरनिराळ्या काळात विचार प्रणाली आणि अर्थशास्त्रीय संप्रदाय निर्माण झाले. त्यांनी अर्थशास्त्राच्या विकासाला हातभार लावाला.
आर्थिक विचारांच्या संप्रदायाचे टप्पे : (१) प्राचीन काळ : अर्थशास्त्रीय विचारांच्या दृष्टीने हा सुरुवातीचा काळ मानला जातो. जगात या काळात अनेक आर्थिक विचार नव्याने उदयास येत होते. भारत, चीन, ग्रीक, इस्लामी राष्ट्रे इत्यादी देशांतील सांस्कृतिक वारसा लाभलेल्या प्राचीन वास्तुशास्त्र, शिल्प, पौराणिक कथा, धर्मशास्त्र आणि दैनंदिन वागणुकीचे नियम, तसेच भाषेचे माध्यम यांमुळे आर्थिक घटकांशी संबंधित विचार अभ्यासायला मिळतात. प्राचीन काळी आजच्या सारखे अर्थशास्त्राचे स्वतंत्र अस्तित्व नव्हते. त्यामुळे भारतासारख्या देशात कौटिल्य यांनी मांडलेले राजकीय विचार यांमध्ये अर्थ म्हणजे पैसा, तसेच राजधर्म आणि अर्थव्यवस्था यांची संमिश्र मांडणी केलेली आहे. त्यामुळे भारतात आर्य चाणक्यांना अर्थशास्त्राचे उदाते मानले जाते. याच संप्रदायात इस्लामिक देशातील अर्थव्यवस्थेतील रचनात्मक मांडणी दिसून येते. त्यांच्या मते, अर्थशास्त्र हा विषय सरावाचा भाग आहे. याची माहिती खालीफात पाहायला मिळते. आठव्या व बाराव्या शतकांत बाजार अर्थव्यवस्था आणि व्यापारी पद्धतीची भांडवलशाही यांचा अभ्यास करण्यास मिळते. तिलाच ‘इस्लामिक भांडवलशाही’ असेही म्हणतात. यामध्ये इस्लाम समाजाच्या आर्थिक उद्दिष्टांची चर्चा केलेली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संपत्तीवरील कर, सर्व प्रकारचे व्यापार व व्यवहार यांवरील कर आकारण्याच्या प्रक्रियेला असलेला विरोध दिसून येतो. यूरोपीयन राष्ट्रे आणि ग्रीकमध्ये ॲरिस्टॉटल, प्लेटो यांसारख्या विचारवंतानी आर्थिक विचार मांडले.
(२) मध्ययुगीन काळ : इतिहासात इ. स. ५०० ते १,५०० हा काळ मध्ययुगीन कालखंड म्हणून ओळखला जातो. याच काळात व्यापारवाद, निसर्गवाद अशा संकल्पना उदयास आल्या. या संकल्पनांमुळे यूरोपीयन देशांमध्ये या काळातील आर्थिक परिस्थितीच्या प्रवाहातून अनेक विचारसरणी उदयास आल्या. विशेषत: फ्रांस, इटली, इंग्लंड या देशांमधील उत्पादक व व्यापारी यांना हा काळ प्रभावित केल्याचे दिसून येतो. या काळात आर्थिक दृष्ट्या राज्याच्या निर्मितीवर भर दिल्याचे दिसून येते. व्यापारवादी संप्रदाय हा पैशाचा वाढता व्यापार आणि राजकीय परिवर्तन यांतून आर्थिक संपन्नता अशा कारणांतून उदयास आल्याचे दिसते. या संप्रदायाची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे पैसा ही राष्ट्राची संपत्ती मानली जात. त्याच बरोबर उद्योग आणि व्यापार यांवर नियंत्रण कसे ठेवता येईल, ही भूमिका होती. याच काळात विभाजन, वेतन, खंड, व्याज आणि कर या प्रणालींची निर्मिती झालेली दिसून येते. व्यापारवादी संप्रदायातील सेंट थॉमस निकोलस, जे. बी. कोल्बर्त, सर जे. चाईल्ड हे विचारवंत १५७१ ते १६७३ या काळातील आहेत. व्यापारवादी संप्रदायात इतरांच्या कल्याणापेक्षा ऐहिक कल्याणाचा विचार महत्त्वाचा मानलेला आहे. माणसाच्या कृत्रिम कार्यावर यांचा जास्त विश्वास होता. म्हणजेच त्यांनी वास्तववादी दृष्टीकोन स्वीकारलेला दिसतो. त्यामुळे पैसा, व्याज, उत्पादन, व्यापार यांविषयी त्यांच्या मुख्य भूमिका विचारांतून दिसतात.
याच काळात क्वेस्ने तुर्गो, मिराबू, रोव्होरा इत्यादी निसर्गवादी विचारसरणी असलेले आर्थिक विचारवंत उदयास आले. या विचारवंतानी निसर्गनियमांवर आधारित असलेल्या अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण स्थान दिले. त्यांनी शेतीला राष्ट्राची संपत्ती मानली. त्यामुळे त्यांना निसर्गवादी संप्रदाय म्हणून ओळखले जाते. सरकारने निसर्गामध्ये हस्तक्षेप करू नये या विचारासह मूल्य, व्यापार, राज्याची कार्ये, कर आणि वेतन इत्यादींविषयक विचारही त्यांनी मांडले आहेत. याच काळात राजकीय अर्थव्यवस्था असलेले शास्त्रीय दृष्ट्या अर्थशास्त्र हे अठरा व एकोणिसाव्या शतकांचा मुख्य प्रवाह आणि अर्थव्यवस्थेचे मूळ रूप होते. हे अर्थशास्त्र समतोल साधण्यासाठी आणि मूल्यांच्या उद्दिष्ट सिद्धांतावर आधारित बाजाराच्या प्रवृत्तीवर केंद्रित आहे. याच कालखंडात प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांचा जन्म झाला. क्वेस्ने यांचा स्मिथ यांच्यावर प्रभाव होता. या काळातच आधुनिक संप्रदाय उदयास आला.
(३) आधुनिक काळ : हा कालखंड अर्थशास्त्राच्या इतिहासात नवीनतम निर्मितीचा कालखंड मानला जातो. या काळात अर्थशास्त्राचा जनक म्हणून ॲडम स्मिथ यांची जगाला ओळख झाली आणि अर्थशास्त्राला स्व:ताचे नाव मिळाले. या काळात सनातनवादी, नवसनातानवादी आणि केन्सीयन असे तीन संप्रदाय उदयास आले.
सनातनवादी संप्रदाय : सनातनवादी म्हणजे अभिजात विचारप्रणाली होय. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात यूरोपीय राष्ट्रांत झालेल्या बदलांमुळे किंवा स्थित्यंतरांमुळे पूर्वी मांडलेले आर्थिक विचार कालबाह्य होऊन तत्कालीन परिस्थितीत उपयोग पडतील असे नवीन विचार मांडण्यात आले. यातून जी मतप्रणाली उदयास आली, तिला सनातनवादी संप्रदाय म्हणून ओळखले जाते. या संप्रदायाचा संस्थापक ॲडम स्मिथ असून पुढे हा वारसा डेव्हिड रिकार्डो, टॉमस रॉबर्ट मॅल्थस, जे. बी. से, जॉन स्ट्यूअर्ट मिल इत्यादी अर्थाशास्त्रांनी चालवला; मात्र बदलत्या काळात सनातनवादी अर्थाशास्त्रज्ञांवर टीका होऊ लागली. यामध्ये जे छोट छोटे संप्रदाय म्हणजेच राष्ट्रवाद, इतिहासवाद, व्यक्तिनिष्ठ प्रभाव, समाजवाद यांनी वरील विचारांविषयी असमाधान व्यक्त करण्यास सुरुवात केली. सनातनवादी विचारामध्ये व्यक्ती आणि समाज यांच्यात भेद दिसून येत नाही. त्यामुळे ते भांडवलशाहीचा पुरस्कार करताना दिसतात. पुढे या विरोधातूनच नवसनातनवादी संप्रदाय जन्माला आला.
नवसनातनवादी संप्रदाय : नवसनातनवादी संप्रदायामध्ये व्यक्तिहितापेक्षा समाजहिताला महत्त्वाचे मानले आहे. निर्हस्तक्षेप आणि भांडवलशाहीला यांचा प्रखर विरोध होता. यामध्ये कार्ल मार्क्स, रॉबर्ट ओएन, सिस्माँडिया या विचारवंतांचा समावेश होतो. राष्ट्रीय आर्थिक विकास, प्रत्यक्ष अनुभवाच्या कसोटीवरचे विचार ही उद्दिष्टे यांना अभिप्रेत होती. ॲल्फ्रेड मार्शल हे नवसनातनवादी संप्रदायाचे जनक मानले जाते. सनातनवादी विचारसरणी आणि त्यावरील टीका यांचा समन्वय साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नंतर नवसनातनवादी विचारांची परंपरा केंब्रिज संप्रदायवाद्यानी चालू ठेवली. यामध्ये हॅरॉड, चेंबरलिन, जोन व्हायोलेट रॉबिन्सन आणि आर्थर सेसिल पिगू इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी कल्याणाच्या अर्थशास्त्राची संकल्पना मांडली. अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांनी अर्थशास्त्रातील नवीन संकल्पना व सिद्धांत मांडले. केन्स यांची विचारप्रणाली ही विकसित व विकसनशील राष्ट्रांना मार्गदर्शक ठरलेली आहे.
संदर्भ :
- मोरावन्डीकर, आर. एस., कौटिल्य अर्थाशास्त्र परिचय.
- Bhatia, H. L., History of Economics Thought, Delhi.
- Donald, J. Harris, THE CLASSICAL THEORY OF ECONOMIC GROWTH, 2007.
- Wolff, Richard D.; Resnick, Stephen A., Contending Economic Theories, Massachusetts, 2012.
समीक्षक : श्रीराम जोशी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.