प्लाइस्टोसीन हिमयुग सुमारे १०,००० वर्षांपूर्वी संपले. त्या वेळी सांप्रत सहारा प्रदेशातील हवामान बरेच आर्द्र स्वरूपाचे होते. अल्जीरिया व इतर वाळवंटी भागात सापडलेल्या गुहाचित्रांवरून एकेकाळी सहाराचे हवामान आर्द्र आणि जमीन सुपीक होती, हे स्पष्ट होते. अनेक सरोवरे व प्रवाहांचे अस्तित्व होते. अगदी सुरूवातीस या भागात आफ्रिकन लोकांचे वास्तव्य असे. बराचसा भाग गवताळ प्रदेशांनी व जंगलांनी व्यापलेला होता. त्यांत हत्ती, जिराफ व इतर वन्य प्राण्यांचा वावर असे. सहाराच्या बऱ्याच दक्षिणेस आज आढळणारी गोपालक संस्कृती त्या वेळी या भागात अस्तित्वात असल्याच्या खुणा दिसतात. इ. स. पू. सुमारे ५,००० वर्षांपूर्वीपर्यंत या प्रदेशात मासेमारी व शिकार करणाऱ्या निग्रॉइड लोकांचे वास्तव्य होते. पुढे त्यांनी मध्यपूर्व आशियाच्या संपर्कातून शेती व पशुपालन कला अवगत केली. दक्षिण सहारामधील सांप्रत माली देशामध्ये शेती व्यवसाय विकसित झाला होता.
इसवी सन पूर्व सुमारे ५००० नंतर मात्र सहारा वाळवंटातील हवामान कोरडे बनण्यास सुरुवात झाली. पुढे हजारो वर्षे ही प्रक्रिया चालू राहिली. मूळ आर्द्र हवामान असलेल्या या प्रदेशाचे जलवायुमान दृष्ट्या वाळवंटी प्रदेशात रूपांतर होत गेले. शतकानुशतके येथील लोकांनी केलेली अतिगुरचराई आणि सहाराच्या सरहद्द प्रदेशातील झाडा-झुडुपांची केलेली बेसुमार तोड यांमुळे सहारा वाळवंटाचा विस्तार वाढतच गेला. सहारा प्रदेश जसजसा कोरडा बनू लागला, तसतसे येथील निग्रॉइड लोक हळूहळू दक्षिणेकडे स्थलांतरित होऊ लागले. कार्थेजियनांनी ताम्रयुगात सहाराच्या अंतर्गत भागाशी प्रस्थापित झालेले व्यापारी संबंध कायम राखले होते. हीरॉडोटस यांनी केलेल्या वर्णनानुसार आफ्रिकेच्या वायव्य किनाऱ्यावर राहणारे बर्बर लोक हळूहळू संपूर्ण सहारा प्रदेशात स्थायिक होत गेले.
ख्रिस्तपर्वात मध्यपूर्व आशियातून सहाराकडे उंट आणण्यात येऊ लागले. तोपर्यंत सहारा प्रदेशातील व्यापार घोडा व गाडीनेच केला जात असे. बर्बरांच्या ताब्यात असलेल्या व्यापारी मार्गाने उंटांचे तांडे सहाराकडे येऊ लागले. इ. स. ४० ते २३५ या रोमन साम्राज्याच्या उत्कर्षाच्या काळात रोमनांनी सहाराच्या उत्तरेकडील सरहद्द प्रदेशात शहरे वसविली, रस्ते बांधले व शेतीच्या सुधारित पद्धती आणल्या. इ. स. चौथ्या शतकात व्हँडॉल लोकांनी आफ्रिकेच्या उत्तरेकडील भाग जिंकून घेतला. फिनिशियन, ग्रीक व रोमनांच्या उत्तर आफ्रिकेतील वसाहतींच्या काळात सहारा प्रदेश मात्र अपरिचित व असमन्वेषित राहिला. बर्बर हे भटके पशुपालक भूमध्यसागरी किनाऱ्यावर राहत होते. ते हळूहळू दक्षिणेकडील वाळवंटी प्रदेशाकडे सरकू लागले. मध्य व पश्चिम सहाराचा बहुतांश भाग आपल्या वर्चस्वाखाली येईपर्यंत बर्बरांचा हा प्रवास तसाच चालू राहिला.
सहाव्या व सातव्या शतकांत अरब लोकांनी उत्तर आफ्रिकेत आक्रमण करून तेथील लोकांचे इस्लाम धर्मात धर्मांतर घडवून आणण्यास सुरुवात केली. दहाव्या शतकापर्यंत अरबांनी सहाराच्या दक्षिण सरहद्द प्रदेशापर्यंत इस्लाम धर्माचा प्रसार केला. चौदाव्या शतकापर्यंत इस्लामचा प्रसार वाढतच गेला. अरबी हीच सहारामधील लोकांची प्रमुख भाषा बनली. या कालावधीत येथील व्यापार चांगलाच भरभराटीस आला होता. नायजर नदीच्या काठावरील तसेच पूर्वेकडील राज्ये आपल्याकडील सोने व गुलामांच्या बदल्यात उत्तरेकडील लोकांकडून मीठ व इतर वस्तू वस्तुविनिमय पद्धतीने विकत घेत असत.
मध्ययुगात प्रवाशांनी धार्मिक व व्यापारी हेतूने केलेल्या प्रवासामुळे सहारा प्रदेश व त्यातील लोकांविषयी माहिती मिळण्यास मदत झाली. इ. स. १३७५ मध्ये ज्यू मानचित्रकार अब्राहम क्रेस्कस यांनी कॅटलन अॅटलास हा नकाशासंग्रह प्रकाशित केला. यूरोपीयनांना सहारा वाळवंटी प्रदेशाविषयी विशेष रस वाटू लागला. पंधराव्या शतकातील वेगवेगळ्या समन्वेषकांनी आपल्या प्रवासाची वर्णने व्यवस्थितपणे लिहून ठेवल्याचे आढळते. परिणामत: पंधराव्या शतकात यूरोपीयनांचे पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यावर आगमन झाले. त्यामुळे सागरी मार्गाने येथील वस्तू उत्तरेकडे जाऊ लागल्या. परिणामत: सहारा मार्गाने होणारा व्यापार घटला. अठराव्या शतकाच्या थोडे आधी यूरोपीयनांनी सहाराच्या समन्वेषणास सुरुवात केली. तोपर्यंत त्यांना सहाराबाबत फारच थोडी माहिती होती. त्यांच्या नकाशातही हा भाग पूर्णपणे कोरा असे. मध्ययुगात अरबांनी लिहून ठेवलेल्या माहितीच्या आधारे त्यांचे समन्वेषक या प्रदेशाच्या समन्वेषणाचे नियोजन करीत होते. त्यांचे सुरुवातीचे प्रयत्न अयशस्वी झाले; परंतु इ. स. १८५० च्या दशकात मात्र हे महावाळवंट पार करण्यात अनेक समन्वेषकांना यश आले. इ. स. १८२० च्या दशकापासून इ. स. १८७० च्या दशकापर्यंतच्या कालावधीत ब्रिटिश समन्वेषकांचा गट (डेनम, क्लॅपर्टन, ऑडने), फ्रेंच समन्वेषक रेने व हेन्री ड्यूव्हेरियर, जर्मन समन्वेषक हाईन्रिख बार्ट, गुस्ताव नाच्टिगल व गेरहार्ड रोहल्फ्स यांनी सहाराचे यशस्वी समन्वेषण केले. दरम्यानच्या काळात यूरोपीयनांनी उत्तर आफ्रिकेत वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली होती. फ्रान्सने सहाराच्या बऱ्याच प्रदेशावर (ईजिप्त, लिबिया, अँग्लो-ईजिप्शियन सूदान व पश्चिमेकडील स्पॅनिश प्रदेश वगळता) ताबा मिळविला. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत फ्रान्स, स्पेन, इटली व ग्रेट ब्रिटनने सहाराच्या वेगवेगळ्या भागांचा ताबा घेतला. इ. स. १९५० च्या दशकापासून सहारामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीच्या जोरदार चळवळी सुरू झाल्या. १९६० च्या दशकापर्यंत स्पॅनिश सहारा वगळता इतर सर्व यूरोपव्याप्त प्रदेश स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आले. १९७६ मध्ये स्पेनने स्पॅनिश सहारावरील आपला ताबा सोडला आणि तो प्रदेश पश्चिम सहारा म्हणून अस्तित्वात आला. सहाराच्या दक्षिण सरहद्द भागात साहेल हा संक्रमित प्रदेश आहे. १९६० च्या दशकाच्या अखेरपासून हा प्रदेश तीव्र अवर्षणग्रस्त बनला. १९८० च्या दशकापर्यंत ती परिस्थिती तशीच राहिली. या अवर्षण काळात पडलेला दुष्काळ व उपासमारीमुळे अगणित भटके पशुपालक व त्यांचे पशुधन मृत्यूच्या खाईत लोटले गेले. संपूर्ण प्रदेश उजाड झाला. हे अवर्षण म्हणजे या प्रदेशातील सामान्य व नियतकालिक वातावरणीय बदल आहेत. काहींच्या मते, हे अवर्षण म्हणजे सहारा प्रदेशाचा विस्तारच आहे.
समीक्षक : माधव चौंडे