सहारातील वाळवंटी हवामान कधीपासून सुरू झाले, याबाबतीत तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता आढळत नाही. येथील खडकांविषयी जे वेगवेगळे अभ्यास करण्यात आले, त्यानुसार २ ते ३ द. ल. वर्षांपूर्वी येथे वाळवंटी हवामान निर्माण झाले असावे. हा कालावधी अतिनूतन (प्लायोसीन) च्या अखेरीपासून ते प्लाइस्टोसीन काळाच्या सुरुवातीपर्यंतचा कालखंड येतो. सन २००६ मध्ये उत्तर चॅडमध्ये ७ द. ल. वर्षांपूर्वीचे जुने वालुकागिरी सापडले. त्यानुसार मध्यनूतन (मायोसीन) कालखंडात सुमारे २३ ते ५३ द. ल. वर्षांपूर्वी हा प्रदेश वाळवंटी बनलेला असावा, असा अंदाज करण्यात येतो.
सहारा वाळवंटाचे हवामान उष्ण व कोरडे असून अती शुष्कता, उच्च दैनिक व वार्षिक तापमानकक्षा, शीत ते अतिशीत हिवाळे, उष्ण उन्हाळे आणि अत्यल्प पर्जन्यमान ही येथील हवामानाची वैशिष्ट्ये आहेत. सांप्रत सहारा वाळवंट दोन प्रकारच्या हवामानांच्या विभागांत मोडते. उत्तरेकडे उपोष्ण कटिबंधीय शुष्क वाळवंटी प्रदेश आहे. दक्षिण सहारात स्थिर, खंडीय उपोष्ण कटिबंधीय वायुराशी व दक्षिणी उष्ण कटिबंधीय सागरी वायुराशी यांच्यातील आंतरक्रियांमुळे उष्ण कटिबंधीय कोरडे हवामान निर्माण झाले आहे.
कोरडी हवा व मेघाच्छादनाचा अभाव यांमुळे सूर्यास्तानंतर लगेचच तापमानात एकदम घट होते. त्यामुळे दैनिक तापमानकक्षा नेहमीच सुमारे २८° से. असते. उन्हाळ्यात सरासरी तापमान सतत ३८° से.पेक्षा अधिक राहाते. जगातील सर्वांत उष्ण प्रदेशांमध्ये सहाराचा समावेश होतो. जगातील सर्वाधिक म्हणजे ५८° से. इतक्या अधिकतम तापमानाची नोंद सप्टेंबर १९२२ मध्ये लिबियातील अल् अझीझीयाह येथे झाली आहे. तिबेस्ती पर्वतात -१५° से. इतक्या किमान तापमानाची नोंद झालेली आहे. उत्तर सहारापेक्षा दक्षिण सहारात तापमानकक्षा कमी असते. हिवाळ्यात सरासरी तापमान १०° ते १६° से.च्या दरम्यान असते. हिवाळ्यात रात्रीचे तापमान गोठणबिंदूच्या खाली जाते. सहाराच्या पश्चिमेकडील सीमांत व किनारपट्टी प्रदेशात थंड कानेरी या सागरी प्रवाहाचा प्रभाव येथील हवामानावर झालेला आहे. त्यामुळे तुलनेने येथील तापमानाची तीव्रता कमी होते. हवेत आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहून कधीकधी धुके आढळते. सहारातील केवळ काही पर्वतीय प्रदेश वगळता कोठेही वार्षिक सरासरी पर्जन्यमान १३ सेंमी. पेक्षा अधिक असत नाही. उत्तर सहारात बहुतांश वृष्टी हिवाळ्यात होते. कधीकधी ऑगस्टमध्ये झंझावातापासून पाऊस पडतो. मध्य सहाराचे वार्षिक सरासरी वृष्टिमान २.५ सेंमी. असून बाहेरच्या बाजूस हे प्रमाण १२.५ सेंमी. पेक्षा अधिक वाढलेले आढळते. पूर्वेकडील व पश्चिमेकडील विस्तृत प्रदेशांत वर्षाला केवळ २ ते ५ सेंमी. पाऊस पडतो. काही प्रदेशात तर कित्येक वर्षांपासून पाऊसच पडलेला नसतो; मात्र कधीतरी येणाऱ्या एखाद्या मुसळधार पावसात १३ सेंमी. पेक्षा अधिक पाऊस पडून जातो. पर्वताचे माथे कधीकधी हिमाच्छादित बनतात. उत्तर सहारात वसंत ऋतूत उष्ण, धूळयुक्त दक्षिणी वारे वाहतात, तर दक्षिण सहारात हिवाळ्यात हरमॅटन हे धूळयुक्त ईशान्य वारे वाहतात. दक्षिणी वाऱ्यांना ईजिप्तमध्ये खामसिन, लिबियात गिब्ली आणि ट्युनिशियात चिली या नावांनी ओळखले जाते. सूदानमधील हबूब हे धुळीचे वारे अल्पकालीन असतात. ते मुख्यत: उन्हाळ्यात वाहतात आणि पाऊसही देतात.
समीक्षक : माधव चौंडे