बेल, प्येर : (१८ नोव्हेंबर १६४७—२८ डिसेंबर १७०६). फ्रेंच तत्त्ववेत्ता. जन्म कार्ला-बेल या स्पॅनिश सरहद्दीजवळच्या एका फ्रेंच गावी. त्यांचे वडील प्रॉटेस्टंट धर्मगुरू होते. त्यांच्या बालपणीचा काळ हा फ्रान्समधील प्रॉटेस्टंटांच्या धार्मिक छळवणूकीचा काळ होता. बेल यांचे शिक्षण प्रथम एका कॅल्व्हिनपंथी शाळेत आणि नंतर एका जेझुईट महाविद्यालयात झाले. कॅथलिकपंथी प्राध्यापकांचे युक्तिवाद त्यांच्या बुद्धीला पटल्यामुळे ते पंथान्तर करून कॅथलिक बनले; पण नंतर प्रॉटेस्टंटपंथी युक्तिवाद पटल्यामुळे ते परत प्रॉटेस्टंट, कॅल्व्हिनिस्ट बनले. कॅथलिक पंथ सोडून देणे हा त्या काळी फ्रान्समध्ये गुन्हा होता. म्हणून ते फ्रान्स सोडून जिनीव्हाला गेले आणि तेथे त्यांनी धर्मशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयांचे आपले शिक्षण पुर्ण केले.

ते १६७४ मध्ये गुप्तपणे फ्रान्सला परतले आणि पॅरिस व रूआन येथे खाजगी शिक्षक म्हणून वर्षभर राहिले. त्यानंतर सडॅन येथे सात वर्षे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर ते विद्यालय बंद पडल्यामुळे हॉलंडमधील रॉटरडॅम येथील ‘एकोले इलक्ट्रे’मध्ये १६८१ साली ते नोकरीला लागले. येथे त्यांनी १६८०च्या धूमकेतूविषयीचे एक ‘पत्र’ प्रसिद्ध केले. हाच बेल यांचा पहिला प्रकाशित ग्रंथ होय. तो त्यांनी टोपणनावाने प्रसिद्ध केला. अंधश्रद्धेवर हल्ला करणे आणि अंधश्रद्धेची तरफदारी करणाऱ्या तार्किक व तत्त्वज्ञानात्मक युक्तिवादांची चिकित्सा करून त्यांचा फोलपणा उघड करणे, हे ह्या ग्रंथाचे उद्दिष्ट होते आणि बेल यांचे सर्वच भावी लेखणाचेही ते उद्दिष्ट राहिले. त्यांचे वडील व भाऊ हे फ्रान्समधील धार्मिक छळाला बळी पडलेले पाहून धार्मिक सहिष्णूता प्रस्थापित करण्याच्या ध्येयाला त्यांनी वाहून घेतले. रॉटरडॅम येथील आपले उर्वरित जीवन अध्ययन व लेखनात त्यांनी घालविले. श्रद्धाळू, सनातनी प्रॉटेस्टंट धर्मगुरूंच्या तसेच कॅथलिक धर्मगुरूंच्या दृष्टीने बेल यांची मते पाखंडी होती. त्यामुळे त्यांच्या लिखाणाभोवती वादंग माजले व १६९३ मध्ये त्यांना विद्यालयातून बडतर्फ करण्यात आले. ह्यानंतर बेल यांनी पूर्वीच हातात घेतलेल्या ‘ऐतिहासिक आणि चिकित्सक कोशा’वर (Dictionnaire historique er critique) आपले सर्व लक्ष केंद्रित केले.

हा कोश बेल यांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ होय. त्यांनी इतरही विपुल लेखन केले आहे आणि त्यातील काही टोपणनावाने केले आहे. शिवाय कडव्या सनातनी वृत्तीच्या कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट धर्मपंडितांच्या रोषापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी अनेकदा आपले लिखाण त्याचा कर्ता कोण आहे ह्याविषयी संभ्रम निर्माण होईल, अशा रीतीने प्रसिद्ध केले आहे. १६८० मध्ये त्यांनी धूमकेतूविषयी लिहिलेले पत्र टोपणनावाने प्रसिद्ध झाले. त्यात अंधश्रद्धा, असहिष्णूता, चुकीचे तत्त्वज्ञान आणि इतिहास ह्यांच्यावर परखडपणे टीका करण्यात आली आहे; बेल यांच्या टीकेची ही सतत लक्ष्ये राहिली. १६८४ ते ८७ पर्यंत बेल यांनी Nouvelles de la republique des lettres ह्या वैचारिक समस्यांना वाहिलेल्या नियतकालिकांचे संपादन केले आणि त्यात नव्याने प्रसिद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या वैचारिक साहित्याचा चिकित्सक परामर्श घेणारे अनेक लेख प्रसिद्ध केले. ह्यामुळे एक प्रमुख विचारवंत म्हणून त्यांना मान्यता मिळाली व लायप्निट्स, लॉक, मालब्रांश, रॉबर्ट बॉइल, आंत्वान आर्नो इ. त्या काळच्या मान्यवर विचारवंतांशी त्यांचे संबंध जुळून आले. १६८६ मध्ये त्यांनी Commentaire philosophique sur ces paroles de jesus ChiriostConstrains-les d’entrer” (म.शी. ‘त्यांना प्रवेश घ्यायला भाग पाडा ह्या येशू ख्रिस्ताच्या शब्दांवरील तत्त्वज्ञानात्मक भाष्य’) हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्याच्यात संपूर्ण धार्मिक मतस्वातंत्र्य असावे आणि ख्रिस्तीतर पंथ धरून सर्व धार्मिक पंथांच्या अनुयायांना सहिष्णुतेने वागवावे ह्या भूमिकेचे समर्थन केले.

बेल यांचा उपरोल्लेखीत कोश  १६९५–९७ ह्या वर्षांत दोन खंडांत प्रसिद्ध झाला. ह्या ग्रंथाने धार्मिक आणि वैचारिक वर्तुळात मोठीच खळबळ माजली. प्रॉटेस्टंट व कॅथलिक ह्या दोन्ही धर्मपीठांनी त्याचा निषेध केला. कॅथलिक चर्चने त्याच्यावर बंदी घातली; तर ॲम्स्टरडॅम येथील प्रॉटेस्टंट चर्चने, बेल यांनी मांडलेल्या काही मतांचे स्पष्टीकरण करावे असे त्यांना सांगितले. ही विनंती बेल यांनी मान्य केली. कोशाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध करण्याचे त्यांनी ठरविले आणि तिच्यात स्पष्टीकरणात्मक असे अनेक लेख समाविष्ट केले, पूर्वीचे काही बदलले आणि १७०२ मध्ये ही अंतिम आवृत्ती प्रसिद्ध केली. ह्यानंतरचा त्यांचा काळ मुख्यतः कोशामुळे माजलेल्या वादंगामध्ये भाग घेऊन आक्षेपकांना उत्तरे देण्यात गेला. Entretiens de Maxime et de The’miste (१७०७–म.शी. ‘माक्सिम आणि थिमिस्टे यांच्यामधील संवाद’) हा शेवटचा ग्रंथ पूर्ण करीत असताना रॉटरडॅम येथे त्यांचा मृत्यू झाला.

बेल यांचा कोश त्यांच्या नावाप्रमाणे ऐतिहासिक व चिकित्सक आहे. तो टॅलमुड (तलमूद)च्या शैलीत रचला आहे. त्यातील नोंदी मुख्यतः ऐतिहासिक पुरुषांविषयी आहेत. नोंदीत प्रथम एका ऐतिहासिक पुरुषाचे चरित्र संक्षेपाने देण्यात येते आणि नंतर त्याच्या अनुषंगाने उपस्थित होणाऱ्या धार्मिक, नैतिक, तत्त्वज्ञानात्मक, ऐतिहासिक, वैज्ञानिक समस्यांचा ऊहापोह करणाऱ्या टीपा चरित्रलेखनाखाली देण्यात येतात. या टीपांवरही टीपा देण्यात येतात. अनेकदा एखाद्या फारशा महत्त्वाच्या नसलेल्या व्यक्तीच्या चरित्राखाली अत्यंत गंभीर आणि जटिल समस्येचा विस्तृतपणे परामर्ष घेण्यात आलेला असतो. ख्रिस्ती मत कितपत विवेकानुसारी आहे हा प्रश्न, विश्वातील दुरिताचा प्रश्न, आत्म्याच्या अमरत्वाचा प्रश्न, शरीर व मन यांच्यामधील संबंधाचा प्रश्न, तसेच लॉक, न्यूटन, लायप्निट्‌स इ. समकालीन तत्त्ववेत्ते व वैज्ञानिक यांच्या तत्त्वज्ञानातून उद्‌भवणाऱ्या समस्या यांचे मूलगामी विवेचन ह्या पद्धतीने कोशातील नोंदीत करण्यात आले आहे. ह्याबरोबरच हरतऱ्हेच्या मनोरंजक आणि काही खमंग अशा ऐतिहासिक आणि चरित्रविषयक माहितीने कोश  खच्चून भरला आहे. यामुळे तो लोकप्रिय आणि प्रभावी ठरला; पण त्याच्या अव्यवस्थित रचनेमुळे एक संदर्भग्रंथ हे त्याचे स्थान फार दिवस टिकू शकले नाही. तथापी या कोशाचे महत्त्व त्याच्या तत्त्वज्ञानात्मक भागात आहे. ह्यात बेल यांनी जे विवेचन केले आहे, युक्तिवाद मांडले आहेत व निष्कर्ष काढले आहेत त्यांचा प्रभाव व्हॉल्तेअर, ह्यूम, गिबन, दीद्रो यांसारख्या विचारवंतांवर पडला. कोशात  उपलब्ध असलेल्या माहितीचा व युक्तिवादांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर आढळतो. शिवाय कोशात ग्रथित केलेल्या अनेक चटकदार कथांनी पोप, फील्डिंग इ. कवी, कादंबरीकार आणि नाटककार यांना कथानके पुरविली आहेत. आधुनिक यूरोपच्या वैचारिक व सांस्कृतिक घडणीत बेल यांच्या कोशाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, यांत शंका नाही.

तत्त्वज्ञान : बेल संशयवादी होते. त्यांनी सेक्स्टस इंपीरिकस ह्या प्राचीन आणि रोदेरिगो आरिआगा ह्या स्पॅनिश स्कोलॅस्टिक तत्त्ववेत्त्यांपासून स्फूर्ती घेतली आहे. बेल यांच्या संशयवादाचा गाभा म्हणून पुढील सिद्धांत मांडता येईल : मानवी अनुभवाच्या कोणत्याही क्षेत्राचा–उदा., निसर्गज्ञान, नीती, धर्म इ.–अर्थ लावण्यासाठी निर्माण करण्यात आलेली कोणतीही बौद्धिक रचना फसलेली असते, असे आढळून येते; तिची चिकित्सा केल्यानंतर ती आत्मविसंगत, अपुरी आणि तर्कविपरीत असल्याचे दिसून येते. विघातक आणि खंडनपर युक्तिवाद रचण्यात बेल अतिशय कुशल होते आणि हे शस्त्र त्यांनी पारंपरिक ख्रिस्ती धर्मशास्त्र आणि ‘नवीन’ विज्ञान व तत्त्वज्ञान ह्या दोघांवरही चालविले. उदा., सबंध विश्वाचा निर्माता व नियामक असा एक ईश्वर नसून, जे जे मंगल आहे त्या सर्वांचा निर्माणकर्ता असलेला एक देव व जे अमंगल आहे त्या सर्वांचा निर्माणकर्ता असलेला दुसरा देव असे विश्वात दोन देव आहेत असा ‘मॅनीकिअन’ सिद्धांत आहे. एकेश्वरवादी ख्रिस्ती देवशास्त्रापेक्षा मॅनीकिअन सिद्धांत आपल्या नैतिक अनुभवाचे अधिक समाधानकारक स्पष्टीकरण करतो; पण त्याची अधिक परीक्षा केल्यावर तोही आत्मविसंगत असल्याचे दिसून येते, असा युक्तिवाद बेल करतात. नीतीला धार्मिक श्रध्देचा आधार आवश्यक नसतो, व्यक्तीची नीती हा तिच्यावर झालेला संस्कार, सामाजिक रूढी, तिच्या स्वतःच्या भावना व मनोवृत्ती आणि ईश्वरी अनुग्रह यांसारख्या अनेक घटकांचा परिपाक असतो; अनेक नास्तिक व्यक्ती अत्यंत शुद्ध व उन्नत अशा नैतिक चारित्र्याच्या होत्या, तर अनेक उच्चस्थानी असलेल्या धर्मगुरूंचे आचरण अतिशय अनैतिक व लंपट होते, हे त्यांनी भरपूर पुराव्यानिशी सिद्ध केले आहे.

ह्या युक्तिवादांचा रोख ख्रिस्ती धर्मशास्त्राविरुद्ध होता; पण ह्याचबरोबर प्लेटो व ॲरिस्टॉटल ह्या प्राचीन आणि देकार्त, हॉब्ज, स्पिनोझा, लायप्निट्‌स, लॉक, न्यूटन इ. आधुनिक तत्त्ववेत्ते व वैज्ञानिक यांच्या तत्त्वज्ञानात्मक आणि वैज्ञानिक उपपत्तींची चिकित्सा करून त्यांतील विसंगतीही त्यांनी स्पष्ट केल्या आहेत. विशेषतः नवीन विज्ञानाचे पुरस्कर्ते भौतिक वस्तूंच्या गुणांमध्ये जो प्राथमिक गुण–आकार, वजन, गती इ.–आणि दुय्यम गुण–रंग, वास इ.–असा भेद करीत, त्याच्यातील तार्किक अडचणी दाखवून देऊन ह्या विज्ञानाच्या एका मूलतत्त्वावरच त्यांनी हल्ला केला. शाफ्ट्‌स्बरी आणि मॅंडेव्हिल तसेच बर्क्ली व ह्यूम ह्या तत्त्ववेत्त्यांवर बेल यांच्या ह्या युक्तिवादाचा प्रभाव पडलेला आढळतो.

मानवी बुद्धीच्या दुबळेपणापासून बेल जो निष्कर्ष काढतात, तो असा की, धार्मिक सत्ये ही बौद्धिक युक्तिवादांनी सिद्ध करता येत नाहीत, ती श्रद्धेनेच स्वीकारावी लागतात. हा बुद्धिनिरपेक्ष श्रद्धावाद हाच संत पॉलपासून जॉन कॅल्व्हिनपर्यंतच्या ख्रिस्ती धर्मशास्त्रवेत्त्यांच्या शिकवणीचा गाभा आहे, असे बेल यांचे म्हणणे आहे. बेल हे सश्रद्ध ख्रिस्ती होते की नाही आणि असले तर ह्या श्रद्धेचा आशय काय होता, हे प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहणार आहेत; पण ते स्वतःला कॅल्व्हिनपंथी ख्रिस्ती म्हणवीत आणि तसे आचरणही करीत. ईश्वरावर त्यांची वैयक्तिक श्रद्धा होती असे मानायला काही आधारही आहे; पण महत्त्वाची गोष्ट ही की, बेल यांनी साधलेल्या बौद्धिक कामगिरीमागची त्यांची स्वतःची उद्दिष्टे काहीही असोत, प्रत्यक्षात प्रबोधनकालीन धर्मविरोधी, विज्ञाननिष्ठ व पाखंडी वैचारिक वातावरण निर्माण करण्यात तिचा मोठा हातभार लागला होता.

बेल यांना त्यांच्या Dictionnaire historique et critique ह्या कोशाच्या रचनेची प्रेरणा मोरेरींच्या कोशामुळे मिळाली, असे म्हटले जाते. मोरेरींच्या कोशात दिलेल्या माहितीचे अद्ययावतीकरण हे बेलकृत कोशाचे एक वैशिष्ट्य असले, तरी विद्वत्ताप्रचुर अशा सनातनी कल्पनांना अनेक तळटीपा, विरोध, संशयवाद व पावित्र्यविडंबन ह्याच्या विलक्षण मिश्रणाने भरलेली त्यांची भाष्ये हे त्यांच्या कोशाचे आणखी एक वेगळेपण होते.

मानवी अनुभवाच्या कोणत्याही क्षेत्राचा अर्थ लावण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या कोणत्याही बौद्धिक रचनेची चिकित्सा केल्यानंतर ती आत्मविसंगत, अपुरी आणि तर्कविपरित असल्याचे दिसून येते, असे बेल यांचे प्रतिपादन होते. आपल्या कौशल्यपूर्ण युक्तिवादांनी त्यांनी ख्रिस्ती धर्मशास्त्रावर, तसेच प्राचीन आणि आधुनिक तत्त्ववेत्त्यांवर चिकित्सकपणे टीका केली. धार्मिक सत्ये ही श्रद्धेनेच स्वीकारावी लागतात; बौद्धिक युक्तिवादांनी ती सिद्ध करता येत नाहीत, असा त्यांचा निष्कर्ष होता.

संदर्भ :