निरनिराळे रंग एकमेकांपासून भिन्न आहेत हे न ओळखणे म्हणजे रंगांधत्व (रंगांधळेपणा) होय. यात कोणताही प्राथमिक रंग न ओळखता येण्यापासून एखादाच रंग न ओळखणे या अवस्थांचा समावेश असतो. X या लिंग गुणसूत्रजनुक विकृतीमुळे रंगांधत्व निर्माण होते. त्यामुळे रंगांधत्व आनुवंशिक असते.
जॉन डाल्टन या शास्त्रज्ञांनी १७९८ मध्ये प्रथमत: तांबडा-हिरवा रंगांधळेपणा विकाराचे वर्णन केले होते. रंगांधळेपणाचे तांबडा-हिरवा, निळा-पिवळा आणि पूर्ण रंगांधळेपणा असे तीन प्रकार आढळतात. यातील तांबडा-हिरवा रंगांधळेपणाअधिक प्रमाणात आढळतो. रंगांधळेपणा विकृती X या लैंगिक गुणसूत्रावर असलेल्या अप्रभावी (Recessive) जनुकामुळे निर्माण होते. आनुवंशिक कारणांनी हा दोष जनक पिढीतून संततीमध्ये संक्रमित होतो. क्वचित काही औषधांच्या परिणामामुळे रंगांधळेपणा निर्माण होतो. उदा., हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आणि स्ट्रायरीन यांसारख्या रसायनांमुळे रंगांधळेपणा झाल्याची उदाहरणे आहेत. परंतु, रसायनामुळे झालेला रंगांधळेपणा आनुवंशिक नाही.
तांबडा-हिरवा रंगांधळेपणा जनुक X गुणसूत्रावर असल्याने ते आईकडून मुलाकडे संक्रमित होते. (मुलाकडे आलेले X लिंग गुणसूत्र आईकडून, तर Y गुणसूत्र वडिलांकडून येते.) रंगांधळ्या व्यक्तींत दृष्टीपटलातील शंकू पेशींमध्ये रंग ओळखण्यासाठीची आवश्यक प्रथिने तयार होत नाहीत. स्त्रियांमध्ये शक्यतो हा विकार आढळून येत नाही. कारण स्त्रीच्या प्रत्येक पेशीत ४४ कायिक गुणसूत्रे आणि दोन (XX) गुणसूत्रे असतात. दुसऱ्या सामान्य X गुणसूत्रामुळे स्त्रिया रंगांधळ्या होत नाहीत. ज्या स्त्रीच्या एका X गुणसूत्रावर हे रंगांधळेपणाचे जनुक असते, त्या मात्र रंगांधळेपणाच्या वाहक असू शकतात. अशा वाहक स्त्रीपासून रंगांधळेपणाचे जनुक असणारे X गुणसूत्र मुलामध्ये गेले, तर तो मात्र रंगाधळा होतो. आईकडून मुलामध्ये अशाप्रकारे रंगांधळेपणा संक्रमित होतो. आईकडून मुलीमध्ये जर असे गुणसूत्र गेले तर ती देखील रंगांधळेपणाची वाहक होते. कारण तिच्यामध्ये वडिलांकडून आलेले दुसरे सामान्य X गुणसूत्र असते. पुरुषांत एकच X गुणसूत्र असल्याने त्यांच्यात जर रंगांधळेपणाचे जनुक आले, तर त्यांना हा विकार जडतो. वाहक रंगांधळेपणा असणाऱ्या स्त्रीची दृष्टी सामान्य राहते. जर तिच्या दोन्ही X गुणसूत्रांवर रंगांधळेपणाची जनुके आली, तर मात्र ती देखील रंगांधळी होते. रंगांधळ्या वडिलांचा मुलगा हा विकार दाखवत नाही; कारण त्याच्यातील X गुणसूत्र आईकडून आलेले असते. स्त्री रंगांधळी होण्यासाठी तिचे वडील रंगांधळा आणि आई वाहक असावी लागते. आई-वडील अशा दोघांकडून रंगांधळेपणाची जनुके आल्यास स्त्री रंगांधळी होते. अर्थात ही शक्यता कमी असते. त्यामुळे रंगांधळ्या पुरुषांचे प्रमाण रंगांधळ्या स्त्रियांपेक्षा खूप जास्त असते.
निळा-पिवळा रंगांधळेपणा मात्र स्त्री व पुरुषांत सारखाच येतो; कारण हा विकार ठरवणारी जनुके सातव्या गुणसूत्रावर असतात. याचा लिंग गुणसूत्राशी संबंध नाही. वर्णपटातील तिसरा रंग अशा व्यक्तीस दिसत नाही, म्हणून या विकारास तृतीयवर्णांधता (ट्रायटॅनोपिया) या नावाने ओळखले जाते. नेहमीच्या सातव्या गुणसूत्रावरील जनुकातील उत्परिवर्तनामुळे हा विकार होतो. नेमका कोणता रंग दिसत नाही किंवा नेहमीसारखा दिसत नाही यावरून रंगांधळेपणाचे चार प्रकार केले आहेत.
(१) प्रथमवर्णांधता (Protanopia) : अशा प्रकारचा रंगांधळेपणा असणाऱ्या व्यक्तीस काळा रंग तांबड्या रंगाच्या छटांमध्ये दिसतो. गडद तपकिरी रंग गडद हिरव्या आणि गडद केशरी रंग गडद तांबड्या रंगाप्रमाणे दिसतो. निळ्या रंगाच्या छटा जांभळ्या व गडद जांभळ्या रंगाच्या दिसतात. या प्रकारास रक्त हरित वर्णांधता असेही म्हणतात .
(२) द्वितीयवर्णांधता (Deuteranopia) : लॅटिन भाषेत deuteron म्हणजे दुसरा. रंग शास्त्राप्रमाणे हिरवा रंग हा तीन मूळ रंगातील दुसऱ्या क्रमांकाचा रंग आहे. दुसऱ्या क्रमांकाचा रंग नीट दिसत नाही, म्हणून या आजाराला द्वितीयवर्णांधता असे म्हणतात. यामध्ये गडद हिरवा व पिवळ्या रंगाच्या छटा ओळखता येत नाहीत.
(३) तृतीयवर्णांधता (Tritanopia) : फिकट निळा करडा आणि गडद जांभळा हे रंग काळ्या रंगाप्रमाणे दिसतात. या व्यक्तींना वर्णपटातील फक्त दोन तृतीयांश रंग ओळखता येतात. हा विकार लिंग गुणसूत्राशी संबंधित नाही.
(४) एकवर्णता (Monochromacy) : हा वरील प्रकारांशिवाय एक दुर्मिळ प्रकार आहे. यामध्ये सर्व रंग एकाच प्रकारचे म्हणजे काळ्या-पांढऱ्या (Black & White) रंगाचे दिसतात.
रंग वर्णन करता येत नाहीत. कारण रंग दिसणे हा बोधन क्रियेचा भाग आहे. उदा., निळा म्हणजे काय असा प्रश्न विचारल्यास आकाश निळ्या रंगाचे आहे असे उत्तर द्यावे लागते. त्यामुळे रंगांधळ्या व्यक्तीस रंग कसे दिसतात, हे सामान्य व्यक्तीस समजणे अशक्य आहे. तरीपण रंगांधळेपणाची कल्पना येण्यासाठी वाहतूक संकेत दिवे (Traffic Signal Lights) सामान्य व रंगांधळ्या व्यक्तीस कसे दिसतात, याची वरील आकृतीवरून कल्पना येईल.
वाहन परवाना देताना रंगांधळेपणाची चाचणी घेणे आवश्यक असते. सार्वजनिक वाहने, रेल्वे चालक किंवा बस चालक परवान्यासाठी रंगांधळेपणाची चाचणी घ्यावी लागते. काही व्यवसायात सामान्य रंगदृष्टी असणे अत्यंत आवश्यक असते. रंगांधळ्या व्यक्तींना अशा व्यवसायासाठी प्रवेश वर्ज्य आहे. उदा., नाविक दल व वैमानिक यांच्या संदेशवहनामध्ये झेंडे किंवा दिव्यांच्या साहाय्याने संदेश दिले जातात. रंगांधळ्या व्यक्तींना असे संदेश पाठवताना किंवा समजण्यात अडथळा येतो. व्यक्ती सामान्य रंगदृष्टीची आहे की रंगांधळी आहे हे समजण्यासाठी ईशिहारा चाचणी (Ishihara test) करण्यात येते. यावरून रंगांधळेपणाचे परीक्षण करता येते.
वरील ईशिहारा चाचणीमधील 7, 6, 26, 73, 74 आणि 45 या संख्या ज्या व्यक्तीला स्पष्ट दिसतात, त्या व्यक्तीला रंगाधळेपणा नसतो. (संदर्भ क्रमांक ३ वरील संकेतस्थळाला भेट देऊन रंगांधळेपणाची चाचणी देता येईल.)
पहा : जीवनसत्त्व अ, डोळा (पूर्वप्रकाशित), रातांधळेपणा (पूर्वप्रकाशित).
संदर्भ :
- https://www.colourblindawareness.org/colour-blindness/inherited-colour-vision-deficiency/
- https://en.wikipedia.org/wiki/Color_blindness
- https://www.colorlitelens.com/ishihara-test?skipcache=rsform601cdad076a92
समीक्षक : मोहन मद्वाण्णा