प्रतिरोधक शक्ती म्हणजे दोन गटांच्या क्षमतांचा आपसांत समतोल साधला जाणे होय. प्रतिवाद क्षमता म्हणजे ग्राहकांच्या गटाची अशी क्षमता की, ज्यायोगे विक्रेता (पुरवठादार) गटात स्पर्धा वाढीस लागते. अमेरिकन अर्थतज्ज्ञ जॉन केनेथ गालब्रेथ यांनी १९५२ मध्ये लिहिलेल्या आपल्या अमेरिकन कॅपिटॅलिझम या पुस्तकात प्रतिरोधक शक्ती ही संज्ञा मांडली. ग्राहकांच्या मोठ्या समूहाकडून लहान आकाराच्या बाजारपेठेत वस्तूंच्या खरेदीवर भरघोस सूट मिळवण्याच्या प्रक्रियेचे विश्लेषण करणे, हा या संज्ञेच्या विश्लेषणामागे त्यांचा हेतू होता. १९५० च्या दशकात अमेरिकन बाजारपेठेत निर्माण झालेल्या अतिरिक्त केंद्रीकरणाचा प्रतिरोधक करून ग्राहकांची खरेदीक्षमता मजबूत होण्यासाठी एक साधन म्हणून गालब्रेथ यांनी प्रतिवाद क्षमता या संकल्पनेचे स्पष्टीकरण केले. त्या दृष्टीने प्रतिरोधक शक्ती ही ग्राहकांच्या खरेदी क्षमतेत वाढ करते, असे म्हणता येईल.
ग्राहक आणि विक्रेते या दोन गटांच्या स्पर्धात्मक वातावरणामुळे बाजारपेठेत कुणा एकाची मक्तेदारी निर्माण होत नाही. बाजारपेठेत जर एखाद्या उत्पादकाची मक्तेदारी असली, तरी त्यास तुल्यबळ स्पर्धक निर्माण होतात आणि बाजारपेठेचा समतोल साधला जातो. पूर्ण स्पर्धेचा अभाव असणाऱ्या मक्तेदारी बाजारपेठेत ग्राहकांची प्रतिवाद क्षमता कमी असते. अशा बाजारात पुरवठानुकूल केंद्रीकरण होण्यास सुरुवात होते. यामुळे बाजाराचा कल पुरवठादारांकडे झुकतो. अशा परिस्थितीत ग्राहकांचे नुकसान होते; परंतु अशा बाजारपेठांमध्ये ग्राहकांची संख्या जसजशी वाढत जाईल, तसतसा बाजाराचा कल मागणीकडे झुकू लागतो. त्यामुळे ग्राहकाच्या या मोठ्या गटाकडून तुल्यबळ प्रतिवाद अस्तित्वात आल्याने बाजाराचे विकेंद्रीकरण होण्यास सुरुवात होते. परिणामी, बाजारातून मक्तेदारीचा अंश कमी होतो व स्पर्धा निर्माण होते. या स्पर्धेत टिकण्यासाठी पुरवठादार ग्राहकांसाठी विविध सवलत योजना राबवितात आणि ग्राहकांचा फायदा होतो. बाजारपेठेतून मक्तेदारी संपुष्टात येण्यासाठी प्रतिरोधक शक्ती उपयुक्त ठरते. उदा., अन्न उत्पादकांकडून किराणा दुकानदारांना मिळणारी सूट, लोह-पोलाद उत्पादकांकडून स्वयंचलित वाहन निर्मिती उत्पादकाला मिळणारी सूट इत्यादी.
ग्राहकांच्या मोठ्या गटाला वस्तू विकणे, हे विक्रेत्यासाठीदेखील फायद्याचे असते. यातून त्याचा वाहतूक खर्च, जाहिरात खर्च इत्यादींची बचत होते. म्हणजेच, वस्तूच्या वितरणाचा प्रत्येक नगाचा खर्च वाचल्याने उत्पादकाला ग्राहकांना वस्तूच्या किमतीवर सूट देणे परवडत असल्याने यातून ग्राहकाचादेखील फायदा होतो. अशा रीतीने विक्रेता आणि ग्राहक या दोघांचाही दीर्घकालीन फायदा होतो. थोडक्यात, ग्राहकाची प्रतिवाद क्षमता वाढून बाजाराचे ग्राहकानुवर्ती केंद्रीकरण झाल्याने उत्पादक विक्रेत्याचा किंमत-खर्चातील फरक कमी होण्यास सुरुवात होते. यातूनच विक्रेत्याची बाजारातील मक्तेदारी संपते आणि ग्राहक बाजारपेठेच्या केंद्रस्थानी येतो. १९५० च्या दशकात अमेरिकन अर्थव्यवस्थेत विविध बाजारपेठांमध्ये अशीच परिस्थिती दिसून आली होती. त्यातूनच गालब्रेथ यांना प्रतिरोधक शक्ती ही संकल्पना सुचली.
प्रतिरोधक शक्ती या संकल्पनेचे उपयोजन सूक्ष्म अर्थशास्त्रात मक्तेदारी, अल्पाधिकारी बाजारपेठ यांच्या विश्लेषणात प्रामुख्याने होतो. याशिवाय ग्राहक मक्तेदारी, द्विपक्षीय मक्तेदारी या प्रकारच्या बाजारपेठांच्या संतुलन विश्लेषणातही प्रतिरोधक शक्ती ही संकल्पना वापरली जाते. तसेच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात आयात-निर्यात शुल्क धोरण आखताना या संकल्पनेचा वापर होतो. या दृष्टीने प्रतिरोधक शक्ती ही संकल्पना महत्त्वाची समजली जाते. अमेरिकेसारख्या प्रगल्भ भांडवलप्रधान लोकशाही देशात प्रतिवाद क्षमतेचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवते.
समीक्षक : श्रीनिवास खांदेवाले