हर्डलिका, अॅलेस एफ. (Hrdlicka, Ales F.) : (२९ मार्च १८६९ – ५ सप्टेंबर १९४३). प्रसिद्ध अमेरिकन शारीरिक मानवशास्त्रज्ञ. ‘निएंडरथल मानव’ आणि ‘अमेरिकन इंडियन्सचे आशियातून झालेले स्थलांतर’ या प्रमुख अभ्यासासाठी ते ओळखले जातात. हर्डलिका यांचा जन्म हंपोलेक (बोहेमिया) येथे झाला. हर्डलिका यांच्यासह ते एकूण सात भावंडे होती. ते मूळचे चेकोस्लोव्हाकियन होते; मात्र इ. स. १८८१ मध्ये त्यांचे कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले. अमेरिकेत आल्यावर सुरुवातीला सिगारेट फॅक्टरीमध्ये काम करून त्यांनी रात्र शाळेत शिक्षण घेतले. न्यू यॉर्कच्या इक्लेक्टिक मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले; परंतु वैद्यक व्यवसाय त्यांनी थोडा काळ म्हणजे इ. स. १८९६ मध्ये मानवशास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी पॅरीसला जाईपर्यंतच केला. त्यानंतर ते परत अमेरिकेत येऊन ‘न्युयॉर्क पॅथेलॉजिकल इन्स्टिट्युट’मध्ये मानवशास्त्रातील सहयोगी म्हणून रुजू झाले. इ. स. १८९९ मध्ये ‘अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री’च्या एका विशेष मोहिमेसाठी ते रुजू झाले. इ. स. १९१० मध्ये स्मिथसोनियन इन्स्टिट्युटच्या शारीरिक मानवशास्त्राच्या संग्रहालयासाठी ‘सहायक अभिरक्षक’ म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यानंतर ते तेथेच ‘संग्रहालय अभिरक्षक’ झाले.
हर्डलिका यांनी एक अभिरक्षक म्हणून भरपूर प्रवास केला. पिथिकॅन्थ्रोपसचे अवशेष मिळालेल्या उत्खनन स्थळी आणि विविध पुराश्मयुगीन अधिवास स्थळी त्यांनी भेटी दिल्या. त्यातूनच निएंडरथलच्या त्यांच्या प्रवर्तकीय कामाची सुरुवात झाली. इ. स. १९२७ मध्ये ‘द निएंडरथल फेज ऑफ मॅन’ या लेखात होमो सेपियन्स हे होमो निएंडरथलेनसिस पासून विकसित झाले आणि सर्व मानवी वंशांचे मूळ एकच होते, हा सिद्धांत त्यांनी मांडला. त्यानंतर अलास्का भागात अभ्यास मोहिमा काढून त्यांनी स्थानिक अमेरिकन लोकांचे मूळ आशियायी असल्याचा निष्कर्ष मांडला.
हर्डलिका यांनी अमेरिकन भारतीय हे मूळ सैबेरियाचे रहिवासी असल्याचे सर्वप्रथम प्रतिपादन केले. त्यांच्या मते, अमेरिकन भारतीय हे उत्तर प्लाइस्टोसीन काळामध्ये जमिनीच्या सलग भागातून अमेरिकेच्या नवीन भूभागावर प्रवेश केला. मानवसदृश्य कवटी आणि कपीसदृश्य जबड्याच्या पिल्टडाऊन या एकत्रित स्वरूपावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हर्डालिका हे एक प्रमुख अभ्यासक होते. दक्षिण अफ्रिकेत टाँग येथे मिळालेल्या कवटीचा सखोल अभ्यास करून त्याच्या कपीस्वरूपाची चर्चा त्यांनी फेटाळून लावली. इ. स. १९१६ मध्ये त्यांनी अमेरिकन जर्नल ऑफ फिजिकल ॲन्थ्रोपोलॉजी सुरू केले, तर इ. स. १९२८ मध्ये त्यांनी अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिकल अँथ्रोपोलॉजी या संस्थेची स्थापना केली. हार्डलिका यांनी नॅशनल म्युझियममध्ये ‘ह्युमन ऑस्टिऑलॉजिकल मटेरिअल्स इन दी वर्ल्ड’चे भव्य प्रदर्शन उभे केले.
हर्डलिका यांचे अनेक शोधनिबंध आणि पुस्तके प्रसिद्ध आहेत. डिस्क्रिप्शन ऑफ ॲन ॲन्सिएन्ट ॲनॉमेलस स्केलटॉन फ्रॉम दी व्हॅली ऑफ मेक्सिको (१८९९); डायरेक्शन फॉर कलेक्टिंग इन्फॉर्मेशन अँड स्पेसिमेन्स फॉर फिजिकल अँथ्रोपोलॉजी (१९०४); नोट्स ऑन दी इंडियन्स ऑफ सोनोरा, मेक्सिको (१९०४); एन्शंट मॅन इन नॉर्थ अमेरिका (१९०७); अर्ली मॅन इन साऊथ अमेरिका (१९१२); दी मोस्ट एन्शंट स्केलेटल रीमेन्स ऑफ मॅन (१९१४); अँन्थ्रोपोमेट्री (१९२०); दी अँन्थ्रोपोलॉजी ऑफ फ्लोरिडा (१९२२), ओल्ड अमेरिकन्स (१९२५); दी ॲन्थ्रोपोलॉजीकल सर्व्हे इन अलास्का (१९३०); दी स्केलेटल रिमेन्स ऑफ अर्ली मॅन (१९३०); प्रॅक्टिकल ॲन्थ्रोपोमेट्री (१९३९); दी ॲन्थ्रोपोलॉजी ऑफ कोडिएक आयलंड (१९४४) इत्यादी.
हार्डलिका यांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक मानसन्मान मिळाले. प्रागमधील संग्रहालयाला त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘हर्डलिका म्युझियम ऑफ मॅन’ असे नाव दिण्यात आले. त्यांच्या षष्ठीपूर्तीनिमित्त त्यांच्या झेक मित्रांनी अँथ्रोपोलॉजी जर्नलचा ॲलेस हर्डलिका अॅनिव्हर्सरी व्हॅल्युम प्रसिद्ध केला. त्यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिकल अँथ्रोपोलॉजिस्टने एक अॅनिव्हर्सरी व्हॅल्युम काढला. विविध देशांतील तज्ज्ञ लोकांचे २४ लेख यात प्रसिद्ध झाले. त्यांच्या नावे दी ॲलेस हर्डलिका पारितोषिक देण्यात येते.
हर्डलिका यांचे वॉशिंगटन येथे निधन झाले.
संदर्भ : Srivastava, R. P., Morphology of the Primates & Human Evolution, New Delhi, 2009.
समीक्षक : सुभाष वाळिंबे