गर्ल, वुमन, आदर : बर्नार्डिन एव्हरिस्टो या आफ्रो-ब्रिटीश लेखिकेची मॅनबुकर पुरस्कारप्राप्त इंग्रजी कादंबरी. २०१९ साली द टेस्टामेण्टस्  या मार्गारेट ऍटवुड यांच्या कादंबरीसह विभागून हा पुरस्कार देण्यात आला. आफ्रिकेतून इंग्लंडमध्ये स्थलांतरीत झालेल्या कृष्णवर्णीय स्त्रियांची धडपड अधोरेखित करणारी ही कादंबरी हॅमिश हॅमिल्टन प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. मॅनबुकर पुरस्कार मिळालेल्या एव्हरिस्टो या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत. एव्हरिस्टो यांचा जन्म लंडनमध्ये ब्रिटिश आई व नायजेरियन वडील अशा परिवारात झाला. ग्रीनिच यंग पीपल्स थिएटर मध्ये नाटकाचे शिक्षण घेऊन गोल्डस्मिथ कॉलेज यूनिवर्सिटी ऑफ लंडन येथून कल्पक लेखनात त्यांनी आचार्य पदवी (डॉक्टरेट) मिळवली. सध्या ब्रूनेल विद्यापीठ, लंडन येथे त्या अध्यापन करतात. एम्परर बेब (२००१), हॅलो मम (२०१०) ही त्यांची इतर प्रसिद्ध पुस्तके प्रकाशित आहेत. याशिवाय त्यांची आठ पुस्तके प्रकाशित झाली असून ब्रिटनमध्ये स्थलांतरीत झालेल्या आफ्रिकन वंशाच्या लोकांचे जीवनदर्शन यात घडते. गद्य व पद्य यांचे बेमालूम मिश्रण हा त्यांच्या लेखन शैलीचा विशेष होय. १९८० साली कृष्णवर्णीय महिलांसाठी त्यांनी नाट्य चळवळ सुरू केली होती.

आफ्रिकेमधून ब्रिटनमध्ये स्थलांतरित झालेल्या पिढीची स्थिरावण्याची धडपड एव्हरिस्टो यांच्या गर्ल, वुमन, अदर  या बारा लघुकादंबऱ्यांनी संपन्न असलेल्या ग्रंथाचा मुख्य गाभा आहे. त्यात ब्रिटनमधील कृष्णवंशीय – त्यातही डझनभर स्त्रियांमध्ये चार आई, त्यांच्या चार मुली आणि या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात आत्यंतिक महत्त्वाच्या असलेल्या इतर चार महिला, अशा मिळून बारा जणींच्या सांगितलेल्या गोष्टी स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती आणि स्त्रीमौजवाद या संकल्पनांकडे तटस्थ दृष्टीने पाहतात. आफ्रिकेतील घाना, सोमालिया आणि नायजेरिया या देशांसह कॅरेबियन बेटांवरून लंडनमध्ये नशीब अजमावण्यासाठी आलेल्या लोकांचा इथल्या समाजात सामावण्याचा इतिहास खूपच रंजक शैलीमध्ये उतरलेला आहे.

कादंबरीला सुरुवात अ‍ॅमा या प्रथितयश नाटककारापासून होते. तिच्या नव्या नाटकाचा प्रयोग नॅशनल अकादमीमध्ये सुरू होणार असून ते त्यापूर्वी तिच्या आत्मविकासाच्या प्रवासाकडे पाहताना दिसते. सत्तरीच्या दशकातील स्त्रीवादी विचारसरणी अंगीकारलेली आकर्षक अ‍ॅमा समलिंगी असून तिने तिच्या समविचारी कृष्णवंशीय मैत्रिणींची भलीमोठी फौज तिच्यासोबत कायम ठेवली आहे. ५१ व्या वर्षी तिचा सुधारक विचारांच्या ‘गे’ नवऱ्यासोबत संसार सुरळीत सुरू आहे. ज्या स्त्रीमुक्तीच्या विचारांवर तिच्या जगण्याचे तत्त्वज्ञान अवलंबून आहे, ते आपल्या मुलीच्या बाबत वापरताना ती काहीशी कंजुषी करीत असल्यासारखे भासते. याझ या १९ वर्षीय मुलीच्या कपडय़ांच्या निवडीपासून ते जगण्यापर्यंत तिचे काहीसे आक्षेप आहेत. तिचे जगणे नियंत्रणात आणण्याची तिची तीव्र इच्छा आहे. रंगभूमीवर प्रचंड अनुभव असतानाही नव्या नाटकाचे लोक कसे स्वागत करतील, याबाबत ती पहिल्या नाटकाच्या वेळेसारखी भेदरलेली दिसते. शाळेच्या शेवटच्या वर्षांपासून कृष्णवंशीय मुलींच्या हक्कांसाठी संघटना उभारणारी अ‍ॅमा कृष्णवंशीय महिलांच्या जगभरातील साहित्य-विचारांचा अर्क घेऊन मोठी झालेली असते. डॉमनिक या तिच्या लाडक्या मैत्रिणीसह लंडनमधील प्रायोगिक रंगभूमीचा इतिहास आणि मुक्तछंदात जगणाऱ्या व्यक्तींची बरीच माहिती अ‍ॅमाच्या कथेमध्ये येते. जे स्वातंत्र्य घेऊन आपण प्रगल्भ झालो, ते आपली मुलगी उपभोगत असलेला विचारही तिला खपत नाही. हा कथेतील व्यक्तीचा वैचारिक विरोधाभास एव्हरिस्टो यांनी अचूक नोंदविला आहे.

इंग्रजी साहित्याचा अभ्यास करणाऱ्या याझला पत्रकार व्हायचे असून जगातला सर्वात वादग्रस्त स्तंभ लिहिण्याचा तिचा विचार आहे. कारण तिच्या मते, जगाने ऐकावे इतके सांगण्यासाठी तिच्याकडे भरपूर आहे. तिच्या विचारांची जडणघडण होण्याच्या कालावधीत अमेरिकेमध्ये पहिल्या कृष्णवंशीय अध्यक्षाच्या निवडीचा इतिहास घडला आहे. त्या घटनेने तिच्या भवताली बराक ओबामा यांना आदर्श ठेवून राजकारणात जाण्यासाठी अभ्यास करू लागलेल्या मुलींची उदाहरणे तिने पाहिली आहेत. समोरच्या परिस्थितीकडे व्यंगाने पाहणारी ही मुलगी आपल्या आईचा- म्हणजेच अ‍ॅमाचा स्त्रीवाद बेगडी ठरविते. सतत कोणत्या ना कोणत्या राजकीय विषयांवर मत-मतांतरे व्यक्त करण्यासाठी टीव्हीवर बोलावल्या जाणाऱ्या विचारवंत लेखक बापाची खिल्ली उडविते.

अ‍ॅमाच्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान एका व्यक्तीचे वर्णन करताना ती म्हणते, की सध्या रंगमंचावरील कोणत्याही नाटकापेक्षा जागतिक राजकीय पटलावर नाटय़ ओतप्रोत भरले असून ‘ब्रेग्झिट’ आणि ‘ट्रम्पक्वेक’ या दोन घटनांमध्ये आजच्या काळावर केलेला सर्वात मोठा विनोद आहे, अशी या व्यक्तीची धारणा असल्याने तो इतरांपासून वेगळा आहे. वारिस नावाच्या बुरखा घालणाऱ्या सोमाली मुस्लीम तरुणीशी याझची सर्वाधिक घसट आहे. अमेरिकेवर २००१ साली झालेल्या हल्ल्यानंतर ब्रिटनमधील मुस्लीम व्यक्तींना मिळणाऱ्या संशयास्पद वागणुकीने वारिसचे आयुष्य बदलून टाकलेले असते. तरीही बुरखा घालून वर स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्ट्स शिकणाऱ्या आपल्या समकालीन वारिसच्या आत्मविश्वासाचे व्यक्तिचित्र याझ सांगताना दिसते. आपल्या भोवतालच्या कृष्णवंशीय व्यक्तींमध्ये तिला एकही उत्तम प्रियकर सापडत नाही. पत्रकार बनण्यासाठी प्रचंड टोकदार व्यंगशैली असलेली याझ आपल्या उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल करताना दिसते.

डॉमनिक या अ‍ॅमाच्या सर्वात लाडक्या मैत्रिणीची कथा येते, ती आजच्या स्त्रीवादाबद्दल प्रश्न विचारते. झिंगा या आफ्रो-अमेरिकी मैत्रिणीच्या प्रेमात पडलेली डॉमनिक तिच्यासोबत लंडनमधील थिएटर सोडून अमेरिकेला जाते. तिथे फक्त महिलांनी महिलांसाठी वसविलेल्या शहरात हे समलैंगिक जोडपे राहू लागते. सुरुवातीच्या आनंदी सहवासानंतर झिंगा डॉमनिकवर पुरुषासारखे वर्चस्व गाजवते. इतर महिलांशी बोलण्या-चालण्यापासून तिच्या फेरफटक्यावर निर्बंध आणते. डॉमनिकला मीठरहित जेवणापासून ते मद्यमुक्त जगण्यापर्यंत भाग पाडते. तिच्या आज्ञांचे पालन न केल्यास डॉमनिकला मारहाणही करते. तीन वर्षे या मानसिक आणि शारीरिक जाचाला कंटाळून डॉमनिक त्या शहरातून पळ काढते. मात्र पुन्हा लंडनमध्ये न जाता अमेरिकेत स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सज्ज होते.

कॅरल या गुंतवणूक बँक व्यावसायिकाची गोष्टदेखील शून्यातून विश्व उभारणाऱ्या मुलीची आहे. १३ व्या वर्षी सामूहिक बलात्कार झालेली कॅरल आपल्यावरील अत्याचाराच्या जखमांवर मात करीत गणिताच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करते. नायजेरियामधून स्थलांतरित झालेल्या आणि साफसफाईचे काम करणाऱ्या आईच्या पोटी जन्मलेली कॅरल गोऱ्यांच्या भूमीत कृष्णवंशीय म्हणून मिळणाऱ्या अपमान, दुय्यम वागणूक याविषयीच्या रागाचा शस्त्र म्हणून वापर करीत पुढे जाते. तिची आई बम्मी आपली आज्ञा मोडून कॅरलने गोऱ्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय नुसता पचवतच नाही, तर घानामधून आलेल्या वृद्धाशी उतारवयात लग्न करताना दिसते.

मूळ देशातील प्रथा-परंपरांच्या पगडय़ातून मुक्त होऊन स्वातंत्र्य कमावलेल्या महिलांनी लंडनमध्ये तयार झालेल्या नव्या मूल्यजाणिवांचा डोलारा पुढल्या पिढीकडून मोडला जाण्याचा प्रवास जवळजवळ प्रत्येक कथेमध्ये आला आहे. इथल्या प्रत्येकाला उभे राहण्यासाठी आपापल्या पातळीवर तीव्र संघर्ष करावा लागला असून त्यात कुणीही मोडून पडले अथवा अयशस्वी झालेले नाही. प्रचंड विचित्र कुटुंबात जन्मलेली लतीशा १९ व्या वर्षीच आई बनते. फूस लावून सोडून देणाऱ्या व्यक्तींची पुनरावृत्ती तिच्याबाबत ३० व्या वर्षी तीन बाळंतपणे उरकण्यापर्यंत संपत नाही. आपल्या आई आणि सावत्र बहिणीसोबत या मुलांना वाढवितानाही, ती एका मॉलमधील विक्री विभागात बढती मिळविण्यासाठी मर मर मेहनत करते. शर्ली किंग ही शिक्षिका आपल्या कृष्णवंशीयपणातून आलेल्या काहीशा न्यूनगंडावर मात करून शाळेत विद्यार्थ्यांची उत्तम पिढी घडविण्याच्या कार्यात स्वत:ला झोकून देते. ब्रिटनमधील शिक्षण व्यवस्थेसोबत बदलत्या समाजाची नोंद तीव्रतेने शर्लीची कथा घेताना दिसते. विन्सम, पेनेलॉप, मेगन-मॉर्गन, हॅट्टी, ग्रेस यांच्या कथांमधूनही कृष्णवंशीयांच्या जगण्याचे संदर्भ आजच्या ब्रिटनला कवेत घेऊन येतात.

दीन-दुबळ्यांचे जगणे युद्धानंतर गेल्या ७० वर्षांत बरेच बदलले. तो बदल हा आजच्या आफ्रो-अमेरिकी, आफ्रो-ब्रिटिश साहित्यामधून नुकताच डोकावू लागला आहे. याचे मोठे उदाहरण म्हणून गर्ल, वुमन, अदर कादंबरीकडे पाहिले जाते.

संदर्भ

  • Evaristo, Bernardine, Girl, Woman, Other, Penguin Books, UK, 2019.