विल्सन, एडवर्ड ऑस्बॉर्न : (१० जून १९२९ -) एडवर्ड ओस्बॉर्न विल्सन, यांचा जन्म अमेरिकेतील अलाबामा राज्यात, बर्मिंगहॅम शहरात झाला. बाल एडवर्ड घराजवळच्या मोकळ्या जागी मनसोक्त भटकंती करीत असे. त्यातून त्याला निसर्गाची आवड निर्माण झाली. एडवर्डला मासे पकडण्याच्या नादात एका माशाच्या शेपटीचा तडाखा एका डोळ्यावर बसला. दुखापतीबद्दल घरी सांगितले, वैद्यकीय उपचार करावे लागले तर भटकंतीला बाधा येईल. या कारणाने त्यानी ही गोष्ट दडवली आणि कित्येक महिने वेदना सहन केल्या. परिणामी मोतीबिंदू होऊन त्यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी गेली. त्रिमिती दृष्टीस अडथळा आल्याने लांबून पक्षी, सस्तन प्राणी बारकाईने पाहणे कठीण झाले. त्यांना डाव्या डोळ्याने उत्तम दिसत असल्यामुळे त्यांनी निसर्ग निरीक्षण चालू ठेवले. मात्र आता जवळच्या अंतरावरील प्राणी उदा., मुंग्या, फुलपाखरे यासारखे कीटक पाहण्यावर त्यानी भर दिला. वयाच्या नवव्या वर्षीसुद्धा वॉशिंग्टन डी. सी. जवळच्या रॉक क्रीक निसर्गउद्यानात जाऊन तेथे जाळ्यात फुलपाखरे आणि अन्य कीटक पकडून त्यांचा संग्रह करू लागले. एक दिवस पडलेल्या झाडाचा ओंडका उलथल्यावर त्याना पिवळसर रंगाच्या, चिरडल्या जाताना गवती चहासारखा गंध सोडणाऱ्या, सिट्रोनेला (लॅसियस इंटरजेक्टस, Lasius interjectus) कामकरी मुंग्यांची सेना दिसली. ती पाहून त्याना मुंग्यांबद्दल जबरदस्त आकर्षण निर्माण झाले.
डिकेटर सिनियर हायस्कूलमधील शालेय शिक्षणानंतर त्यांनी बी.एस. आणि एम.एस. या पदव्या अलाबामा विद्यापीठातून मिळवल्या. सुरुवातीला अलाबामाच्या पर्यावरण संवर्धन विभागात कीटकशास्त्रज्ञ म्हणून काम केले. नंतर हार्वर्ड विद्यापीठातून लॅसियस या मुंग्यांच्या प्रजाती (Genus) चे वर्गीकरण दृष्ट्या तपशीलवार पृथक्करण करून पीएच्.डी. मिळवली.
हार्वर्ड विद्यापीठात त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी मुंग्या आपापसात संदेशांची देवाणघेवाण कशी करतात यावर संशोधन केले. त्यातून त्यांच्या लक्षात आले की मुंग्या काही संकेती रसायने (ओळखीची रसायने, Pheromones) वापरतात.
विल्सन, यांनी मेलॅनेशिया द्वीपसमूहामधील (Melanesian archipelago) मुंग्याची वारुळे कशी विस्तारत वा संकोचत जातात याचे बारकाईने निरीक्षण केले. त्यांच्या म्हणण्यानुसार काही गट- वर्ग वर्गेकक (टॅक्सॉन) बदलत जाण्याचे चक्र असते. ही संकल्पना इतर शास्त्रज्ञांच्या सहभागाने नंतर आणखी परिपूर्ण होत गेली. कीटकजाती उत्क्रांतीच्या वर्गेकक चक्राच्या प्रारंभिक अवस्थेत परस्परापासून विस्तार करत दूरदूर जातात. दुसऱ्या अवस्थेत त्यांचा विस्तार वेग कमी होऊन उपजाती निर्माण होतात. तिसऱ्या अवस्थेत जाती बऱ्याच अंशी सुघटित झालेल्या असतात. आपला वंश स्थिर होईल अशा अनुकूल सुस्थानात (adaptive niche) त्यांचा जम बसतो. चौथ्या अवस्थेत उपजाती लुप्त होतात. जाती प्रदेशनिष्ठ (endemic) होतात, त्यातील समूहसंख्या वाढते आणि हे चक्र असेच फिरत राहते.
विल्सन हे संपूर्ण जगात मुंगीवैज्ञानिक (Myrmecologist) म्हणून प्रसिद्ध आहेत. मुंग्यांपासून माणसांपर्यंत विविध प्रकारच्या प्राण्यांच्या वर्तणुकीचा जनुकीय पाया अभ्यासण्यासाठी त्यांनी कित्येक दशके अथक परिश्रम केले. ते सामाजिक जीवशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. अत्यंत नि:स्वार्थ भावनेने मुंग्या एकत्र कशा राहतात या साठी त्यांनी समूह जीवनातील सर्वोच्च स्थितीबद्दल- यूसोशालिटी (Eusociality) हा शब्द सर्वात प्रथम वापरला. सामूहिकजीवन असलेले कीटक व मानवी उत्क्रांती यावर असलेले त्यांचे लिखाण सर्वमान्य झाले आहे.
कोलंबिया विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित पुलित्झर पुरस्काराने त्यांना दोनदा गौरवण्यात आले. हा पुरस्कार ललित वा ललितेतर (nonfiction) साहित्य, पत्रकारितेसारख्या समाज माध्यमांचा प्रभावी वापर, संगीत इ. साठी प्रदान केला जातो. विल्सन यांना ‘On Human Nature’ आणि ‘The Ants’ या त्यांच्या पुस्तकांबद्दल पुलित्झर पुरस्कार बहाल करण्यात आला. वर उल्लेखलेल्या पहिल्या पुस्तकात सामाजिक जीवशास्त्र मानवी आक्रमकता, लैंगिकता आणि नैतिकता यांच्याशी कसे निगडीत आहे याचे विवेचन त्यांनी केले आहे. दुसऱ्या ग्रंथात कीटकजगताबद्दल मुख्यतः मुंग्यांविषयी अद्ययावत माहिती दिली आहे.
The Superorganism: The Beauty, Elegance, and Strangeness of Insect Societies या पुस्तकात मुंग्या, मधमाशा, गांधीलमाशा, वाळवी यासारख्या कीटकांच्या वसाहती म्हणजे महाकाय समूह जीव आहेत अशी भूमिका मांडली आहे. त्यातील व्यक्ती, पेशीसमान आहेत. वेगवेगळी कामे करणारे कीटक व्यक्तीगट, उदा., पोळ्याचे रक्षण करणाऱ्या मधमाशा, तो महाकाय जीव जगवण्यासाठी लागणारी इंद्रिये आहेत, असे विषद केले आहे.
त्यांचे सर्वांत नवे पुस्तक ‘Letters to a Young Scientist’ हार्वर्ड विद्यापीठातील बेचाळीस वर्षांच्या अध्यापकीय अनुभवाच्या आधारे संशोधनाकडे येऊ पाहणाऱ्यासाठी मार्गदर्शक आहे. उत्तम संशोधक बनण्यासाठी तुम्ही अतिशय बुद्धीवान असलेच पाहिजे असे नाही. पण विषयाचा ध्यास घेऊन तुम्ही सतत काम केलेच पाहिजे असे सल्ले त्यांनी दिले आहेत. वयाच्या नवव्या वर्षी केलेली भटकंती आणि हल्ली त्र्याऐंशीव्या वर्षी दक्षिण प्रशांत प्रदेशात संशोधक चमूला घेऊन केलेली वानुवाटू द्वीपसमूहाची (Vanuatu Archipelago) मोहीम त्यांना सारखीच उत्साहवर्धक वाटते.
भाषेतील प्रभुत्वामुळे प्राप्त झालेले दोन पुलित्झर पुरस्कार, रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसचा पर्यावरणशास्त्रातील नोबेलच्या तोलाचा क्राफूर्ड पुरस्कार, इंटरनॅशनल प्राईझ ऑफ बायॉलॉजी ऑफ जपान अशा शंभराहून जास्त गौरवांनी विल्सन मंडित झाले आहेत. विल्सन हे चौतीस पुस्तकांचे लेखक, जगभरच्या संस्थांत शेकडो भाषणे करणारे वक्ते, उत्कृष्ट शिक्षक, पीएच्.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ आहेत. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातील कीटक प्राणीसंग्रहालयाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती. आता नव्वदीकडे वाटचाल करत असले तरी विल्सन आजही उत्साहाने कार्यमग्न आहेत.
संदर्भ :
- http://eowilsonfoundation.org/e-o-wil
- https://www.famousscientists.org/e-o-wilson/
- https://www.childrenandnature.org/2015/10/01/e-o-wilson-explains-why-parks-and-nature-are-really-good-for-your-brain/
समीक्षक : मोहन मद्वाण्णा