स्मार्टफोन, टॅबलेट संगणकाचा एक प्रकार. कॅनेडियन कंपनी रिसर्च इन मोशन ( रिम; RIM; आताचे नाव ब्लॅकबेरी लिमीटेड) याद्वारे या वायरलेस, हाताळण्याजोगा, संप्रेषण उपकरणांची  निर्मिती करण्यात आली.  1999 सालात रिमद्वारे प्रस्तूत पेजर (Pager; रिम-850) याच्या निर्मितीत ब्लॅकबेरीच्या निर्मितीची मुळे रोवली गेली आहेत. ब्लॅकबेरीवर छोटेसे कळफलक देण्यात आले आहे. या वैशिष्ट्यामुळे सदर उपकरण वायरलेस ई-मेल प्रवेश प्रदान करते आणि सहज मजकूर पाठविणे अगर मिळण्यास वापरकर्त्यास परवानगी देते. त्यानंतर लगेच रिमद्वारे जलद आणि अधिक शक्तिशाली अशा रिम-857 या उपकरणाची निर्मिती करण्यात आली. रिम 857 हा वैयक्तिक अंकीय साहायक (पीडीए; PDA) सारखास दिसत होता आणि वैयक्तिक व व्यावसायिक ई-मेल खाते समक्रमित करू शकत असे. या उपकरणांची  विक्री हळूहळू सुरू झाली. सुरुवातीच्‍या पहिल्या वर्षात फक्त 25,000 वापरकर्त्यांच्या वापरासह, नंतर ही संख्या वेगाने वाढली. 2000 वर्षांच्या सुरुवातीला पहिल्या ब्लॅकबेरी उपकरणाला प्रकाशित करण्यात आले. यामध्ये सेल्युलर फोनच्या सेवा, वायरलेस ई-मेल क्षमता आणि इंटरनेट (आंतरजाल) प्रवेश यांसारख्या सुविधा होत्या. व्यावसायिक जगात या नवीन स्मार्टफोनने धुमाकूळ घातले. सेल्युलर फोन प्रदात्यांनी लवकरच ब्लॅकबेरी-सक्षम फोन तयार करण्यास सुरुवात केली.

ब्लॅकबेरी यशाच्या शीखरावर असतांनाच अमेरिकेच्या पेटंट (एकस्व) धारण करणाऱ्या एनटीपी कॉर्पो. आणि रिम यांमधे वाद निर्माण झाले, त्यामुळे नवीन ब्लॅकबेरी उपकरण प्रकाशित करण्यास विलंब झाला. ब्लॅकबेरी वापरकर्ता नियोजित केलेल्या नियमांनुसार इंटरनेटद्वारे किंवा सेल्युलर फोन नेटवर्कद्वारे ई-मेल, कॅलेंडरमधील नोंदी आणि डेटा फाईल्स सतत प्राप्त करतात. या वैशिष्ट्याला “ढकलणे तंत्रज्ञान; पुश टेक्नॉलॉजी; Push Technology”  असे म्हणतात. यासारख्या तंत्रज्ञानाचे पेटंट असल्याबाबत एनटीपी यांनी दावा केला आणि 2001 साली रिमच्या विरुद्ध उल्लंघनाचा खटला दाखल केला. त्यानंतर कायदेशीर लढाई खूप वर्षे चालली आणि ब्लॅकबेरीची सेवा जवळजवळ बंद झाली. एनटीपी आणि रिम यांमधील वाद 2006 साली  सहाशे दशलक्षापेक्षा जास्त डॉलरवर स्थिरावले आणि सोबतच एनटीपीने पेटंटच्या वापराबाबत रिम यांना परवाना  देऊ केला. 2008 साली ॲपल इनकॉ.च्या आयफोन सारखे ब्लॅकबेरीने स्पर्श-पटल (टच- स्क्रीन; Touch screen) असणारे स्मार्टफोन प्रकाशित केले. नवीन प्रतिकृती असणाऱ्या ब्लॅकबेरीने सर्वसामान्य ग्राहक आणि व्यावसायिक वापरकर्ता यांमध्ये लोकप्रियता मिळविली.

ब्लॅकबेरी या शब्दाची स्थानिक भाषेही भर करण्यात आली आहे. ब्लॅकबेरी-थम (ब्लॅकबेरीच्या अतिवापरामुळे पुनरुक्त-ताण इजा) अशी परिभाषा दैनंदिन वापरात आली. ब्लॅकबेरी या नावानेच ब्लॅकबेरी 10 ही मोबाइल परिचालन प्रणाली (ती फक्त ब्लॅकबेरीच्या उपकरणांकरिता 2013 ते 2015 दरम्यान वापरण्यात आली होती.) रिमने तयार केलेले ब्लॅकबेरी टॉर्च, ब्लॅकबेरी कर्व्ह, ब्लॅकबेरी टूर, ब्लॅकबेरी प्ले बुक (टच-स्क्रीन टॅबलेट संगणक) इत्यादी उपलब्ध आहेत. ब्लॅकबेरी पिन (पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर; PIN) प्रत्येक ब्लॅकबेरी उपकरणाला नियुक्त केलेला आठ-वर्णांचा षट्दशमान अंक (हेक्साडेसिमल) ओळख क्रमांक आहे. ब्लॅकबेरी उपकरणांवर पिन स्वहस्ते बदलता येत नाही (जरी ब्लॅकबेरी तंत्रज्ञ पिन सर्व्हर-साइड पुनर्योजित किंवा अद्ययावत करण्यास सक्षम असला तरी) आणि प्रत्येक ब्लॅकबेरी उपकरण लॉक (बंदिस्त) केलेले आहेत.

कळीचे शब्द : #Blackberry #स्मार्टफोन #टॅबलेट #सेल्युलरफोन  #Cellularphone

संदर्भ :

समीक्षक : रत्नदीप देशमुख