समुद्री शेवाळ हा जैवशास्त्रीय उत्क्रांतीच्या खूप तळच्या पायदानामधला एक वनस्पतीचा प्रकार आहे. असूक्ष्मजीवी शैवाळाला जरी इंग्रजीत ‘सी-वीड’ (निरुपयोगी रान) असे म्हटले जात असले, तरी त्याचे नानाविध उपयोग आहेत आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेसुद्धा त्याचे योगदान बहुमूल्य आहे. समुद्री परिसंस्थेत या वनस्पती प्राथमिक निर्माता म्हणून आपली भूमिका बजावतात आणि प्रकाश-संश्लेषणाद्वारे स्वतःचे अन्न स्वतःच बनवतात व इतर जीवांच्या उपजीविकेचेही साधन बनतात. सामान्यतः ही वनस्पती उथळ ते १० मीटर खोल पाण्यात वास्तव्य करते, परंतु नवीन संशोधनानंतर काही प्रकार हे अनेकपट जास्त खोलीमध्येसुद्धा आढळून आले आहेत.
आज जागतिक स्तरावर या वनस्पतीच्या १० हजारपेक्षा अधिक, तर भारतात ९०० पेक्षा अधिक प्रजाती आढळतात. त्यांच्यामध्ये आढळणाऱ्या रंगद्रव्याच्या आधारावर त्यांचे प्रामुख्याने हरित, लाल आणि तपकिरी शेवाळ अशा ३ प्रमुख गटामध्ये वर्गीकरण केले आहे.
१) हरित शेवाळ (Chlorophyceae) : या गटातील शेवाळांमध्ये क्लोरोफिल हे प्रमुख रंगद्रव्य आढळते. बहुतांश जाती या उथळ पाण्यात व जिथे जास्त खनिज द्रव्ये आढळतात; त्या पाण्यात वास्तव्य करतात. यामधील कित्येक प्रजाती खाण्यायोग्य असून, त्याचा वापर अतिपूर्व आशियाई देशांच्या रोजच्या जेवणात कोशिंबीर किंवा पालेभाजी म्हणून केला जातो.
२) लाल शेवाळ (Rhodophyceae) : यात आर-फायकोएरिथ्रीन आणि आर-फायकोसायनीन नावाची रंगद्रव्ये अधिक प्रमाणात असतात. अतिखोल पण उबदार पाण्यात याचे अधिकतम वास्तव्य आढळते. यातील आगर (आगार) आणि केराजिनान नावाचे घटक औद्योगिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे आहेत.
३) तपकिरी शेवाळ (Ochrophyta or Phaeophyta) : या शेवाळात झँथोफिल नावाचे रंगद्रव्य असते. आणि त्यांचे वर्गीकरण ओक्रोफायटा या शास्त्रीय नावाने केले आहे. यामध्ये केल्पसारख्या समुद्रात आढळणाऱ्या सर्वात मोठ्या वनस्पतीचा समावेश होतो. यातील अल्जिनेट आणि फ्युकॉइडीन नावाचे घटक ओद्योगिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे आहेत.
या शेवाळांची, विशेषतः त्यांच्या विविध व्यावसायिक उपयोगांमुळे समुद्रात शेती केली जाते. ‘फूड आणि ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन’ च्या २०१८ च्या अहवालानुसार या शेवाळांचे ३१.२ दशलक्ष टन उत्पादन असून, त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ११.७ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी आहे. जागतिक आगर उद्योग या शेवाळांच्या १२५,२०० टन सुका जीवभार वापरून १४,५०० टन आगर बनवते, त्याचे बाजारमूल्य २४६ दशलक्ष अमेरिकी डॉलर इतके आहे. भारतात आगरचा तुटवडा मुख्यतः दुसऱ्या जागतिक युद्धानंतर जाणवू लागला, आज भारतात ६०० टन आगरची गरज आहे, पण त्यातील फक्त ३०० टन इतकीच पूर्तता होऊ शकते. जागतिक केराजिनान उद्योग २३२,२०० टन सुका जीवभार वापरून ५७,५०० टन केराजिनान बनवते, त्याचे बाजारमूल्य ५१८ दशलक्ष अमेरिकी डॉलर इतके आहे. भारतात केराजिनानची गरज ५०० टन आहे, पण त्यापैकी फक्त ५०-६० टन इतकीच पूर्तता आज होऊ शकते. जागतिक अल्जिनेट उद्योग २३६,२२० टन सुका जीवभार वापरून २४,६४४ टन अल्जिनेट बनवते, त्याचे बाजारमूल्य ३४५ दशलक्ष अमेरिकी डॉलर इतके आहे. भारतात अल्जिनेटची गरज १००० टन आहे, पण त्यापैकी फक्त ३०० टन इतकीच पूर्तता आज होऊ शकते.
समुद्री शेवाळांच्या शेतीमध्ये आशियाई देश प्रगतीशील आहेत. चीन, जपान, कोरिया, फिलीपाईन्स व इंडोनेशिया यांचा आज अग्रणी क्रमांक लागतो. २०% आशियाई आहारात समुद्री शेवाळांचा समावेश आहे, पण पाश्चिमात्य देशात यांचा उपयोग आहारात फक्त पूरक अन्नद्रव्य (Food Additives) अथवा अर्क (Decoction) म्हणूनच केला जातो. यात असणाऱ्या प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, इत्यादींची मुबलकता याला पौष्टिक अन्न अथवा औषधी घटक म्हणून मान्यता देतात. यात असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्स, अँटीम्युटाजेनिक, अँटीकोयागुलंट, अँटीकॅन्सर व अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळेच याचा उपयोग प्राचीन चीनी औषधांमध्ये, तसेच प्राचीन रोमन साम्राज्यात केला जात असे. भारतातदेखील अजूनही काही ठिकाणी कोकण व तमिळनाडूचा तटीय भाग येथे समुद्र शेवाळे घरगुती औषधे म्हणून वापरल्याच्या नोंदी सापडतात. आज भारतात मुख्यत्वे मोठ्या शहरात सुशी रेस्टॉरंटच्या स्वरूपात उदयास येत असणारी खाद्य संस्कृती आपणास समुद्री शेवाळांच्या आहाराची ओळख देऊ लागली आहेत.
भारतात समुद्री शेवाळ आणि त्यांचे व्यावसायिक महत्त्व याबद्दलचे ज्ञान हळूहळू वाढत आहे. यामध्ये मुख्यत्वे करून केंद्रीय नमक आणि समुद्री रसायन अनुसंधान संस्था (C.S.I.R.) भावनगर यांनी केलेले संशोधन मोलाची कामगिरी बजावत आहे. याचा उपयोग किनारपट्टीच्या भागातील लोकांच्या विकासासाठी नक्कीच अत्यंत मोलाची भूमिका बजावू शकतो.
समीक्षक : शरद चाफेकर