वार्मस, हॅरॉल्ड इलियट: (डिसेंबर १८ १९३९ -) हॅरॉल्ड इलियट वार्मस यांचा जन्म अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात झाला. हॅरॉल्डचे शालेय शिक्षण फ्रीपोर्ट हायस्कूल, न्यूयॉर्कमध्ये झाले. सुरुवातीचा डॉक्टर होण्याचा विचार बदलून हॅरॉल्डनी मानव्य ज्ञानशाखेकडे मोर्चा वळवला. ॲमहर्स्ट महाविद्यालयातून विशेष प्राविण्यासह मुख्य अभ्यास विषय ‘इंग्रजी साहित्य’ घेऊन बी.ए. पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी एम. ए. पदवी हार्वर्ड विद्यापीठ, केंब्रिज, मॅसेच्यूसेट्स मधून इंग्रजी विषयात प्राप्त केली. नंतर पुन्हा एकदा वैद्यकीय शाखेकडे जावे असे त्यांनी ठरवले. कोलंबिया विद्यापीठात त्यांना प्रवेश मिळाला. न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठातून संशोधन करून एम. डी. ही वैद्यकीय पदव्युत्तर पदवी मिळवली.

व्यवसाय प्रशिक्षणाचा भाग म्हणून भारतात बरेलीतील मिशनरी हॉस्पिटलमध्ये अल्पकाळासाठी त्यांनी काम केले. व्हिएतनाममध्ये लष्करी डॉक्टर म्हणून जाण्याच्या ऐवजी त्यांनी दोन वर्षे अमेरिकन सार्वजनिक आरोग्य खात्यात शल्यवैद्य पदावर काम करणे स्वीकारले.

बेथेस्डा, मेरिलँड येथील ‘नॅशनल इंस्टिट्यूटस ऑफ आर्थ्रायटिस अँड मेटॅबॉलिक डिसिझेस’ मध्ये वार्मसनी सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदावर काम केले. ते पीएच्.डी. नंतरच्या छात्रवृत्तीवर सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया मेडिकल सेंटर, सॅनफ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे कार्यरत राहिले. त्यांचे संशोधन जीवाणूंच्या जनुक व्यक्ततेशी संबंधित होते. त्यासाठी त्यांच्या मार्गदर्शिका डॉ. इरा पास्तान होत्या.  

पुढे त्याच संस्थेत त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र आणि रोगप्रतिक्षमता या संयुक्त विभागात पूर्ण प्राध्यापक पदाची जबाबदारी स्वीकारली. १९८४-९३ मध्ये ते ‘अमेरिकन कॅन्सर सोसायटी’त ‘रेण्वीय विषाणूशास्त्र’ विषयाचे प्राध्यापक या नात्याने कार्यरत राहिले. १९९३-९९ या सात वर्षांत त्यांचे नाव धारण करणाऱ्या प्रयोगशाळेत ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ मध्ये वार्मस प्रमुखपदाची धुरा सांभाळत होते. त्यापुढील सुमारे एक दशक, वार्मस ‘मेमोरिअल स्लोन केट्टरिंग कॅन्सर सेंटरचे’ अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. याखेरीज याच संस्थेत ‘कॅन्सर बायॉलॉजी अँड जेनेटिक्स प्रोग्राम’ चे सदस्य, ‘रेण्वीय जीवशास्त्र विभागाचे पर्यवेक्षक वैद्यकीय अधिकारी’आणि स्लोन केट्टरिंग विभागाचे प्राध्यापक अशा जबाबदाऱ्या ही त्यांच्याकडे होत्या.

सन १९९३ मध्ये राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांनी वार्मस यांची ‘नॅशनल इन्स्टिट्यूटस ऑफ हेल्थ’च्या संचालकपदी नेमणूक केली. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅनफ्रान्सिस्को, येथील सलग दीर्घ कार्यकालात त्यांनी कर्करोगकारक जनुकांवर आणि एकसर्पिल आरएनए रेणूधारी विरुद्ध-विषाणूं (Retroviruses) वर संशोधन केले.

याखेरीज वार्मस अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रम मंडळांना मुख्यतः रेण्वीय जीवशास्त्र, विषाणूशास्त्र, कर्करोग आणि आनुवंशिकता, जैवतंत्रज्ञान या विषयांत अद्ययावत राहण्यासाठी मार्गदर्शन करतात. कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबॉरेटरी प्रेस, सायंटिफिक अमेरिकन अशा प्रतिष्ठित प्रकाशकांनी वार्मस यांची काही पूर्ण पुस्तके वा त्यांनी लिहिलेली, संपादन केलेली कित्येक प्रकरणे उपलब्ध करून दिली आहेत. त्यात जीवशास्त्राशी संबंधित अत्याधुनिक विषय हाताळले आहेत.

वार्मस यांचे सुमारे चारशे शोधनिबंध विविध प्रख्यात वैज्ञानिक नियतकालिकांत प्रकाशित झाले आहेत. यापैकी काही नामांकित जर्नल्स आहेत – नेचर, सायन्स, जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन, कॅन्सर रिसर्च, यूरोपियन मॉलेक्युलर बायॉलॉजी ऑर्गनायझेशनची नियतकालिके, जर्नल ऑफ मॉलेक्युलर अँड सेल बायॉलॉजी, जर्नल ऑफ व्हायरॉलॉजी, प्रोसीडिंग्स ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, कोल्ड स्प्रिंग हार्बर सिम्पोसियम ऑन क्वान्टिटीटीव्ह बायॉलॉजी, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचे ‘न्युक्लिइक ॲसिड रिसर्च’, पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्स.

वार्मस यांनी आरएनए पासून प्रतिरेखन (Reverse transcription) करून डीएनए तयार करू शकतो अशा विषाणूंवर संशोधन केले. असे विरुद्ध-विषाणू (Retroviruses) स्वतःच्या नव्या प्रती कशा तयार करतात. त्यांनी निर्माण केलेले डीएनए प्राण्यांच्या गुणसूत्रांतील डीएनएमध्ये कसे सामावले जाते. याखेरीज असे विषाणू प्राण्यांच्या शरीरात कर्करोग कसा निर्माण करतात. हे विषाणू प्राण्यांच्या शरीराबाहेर प्रयोगशाळेत काचपात्रांत वाढत असलेल्या प्राणीपेशींत कर्करोगासारखी अनियंत्रित वाढीची स्थिती कशी निर्माण करतात, याचा अभ्यास केला. यापैकी बरेचसे काम त्यांनी जे. मायकेल बिशप ह्यांच्या बरोबर केले.

हॅरॉल्ड वार्मस आणि जे. मायकेल बिशप ह्यांचे सर्वात जास्त प्रसिद्धी मिळालेले संशोधन प्राणीपेशींतील जनुक, सी – एसआरसी (C-SRC) आणि त्यातून उद्भवणारे राउस सार्कोमा व्हायरसमधील व्ही – एसआरसी (V-SRC) जनुक याबद्दलचे आहे. पेटन राउसना १९१० मध्ये प्रथमच ‘राउस सार्कोमा व्हायरस’ हा कर्करोगकारक विषाणू, कोबड्यांमध्ये सापडला. ह्या विषाणूमुळे कोबड्यांमध्ये अर्बुद (tumors) निर्माण होतात. वार्मस आणि बिशप यांना त्या विषाणूतील कर्करोगकारक जनुक (viral oncogene) मुळात सुप्तावस्थेत प्राणीपेशींत (cellular proto-oncogene) असते हे समजले. नंतरच्या काळात अशा सुमारे पन्नास प्रोटोआँकोजीन्सचा शोध लागला. विषाणूंतील कर्करोगकारक जनुके खरेतर विषाणू, प्राणीपेशींतून घेतात. प्राणीपेशींत सुप्तावस्थेत असलेली ही जनुके उत्परिवर्तनामुळे कर्करोगकारक होतात. या शोधाबद्दल हॅरॉल्ड वार्मस आणि जे. मायकेल बिशप ह्या दोघांना मिळून १९८९ सालचे ‘शरीरक्रिया शास्त्र आणि वैद्यक विषयाचा’ नोबेल पुरस्कार दिला गेला.

ऐंशीच्या घरातील कर्तबगार आणि गुणी वार्मस २०१५ पासून वेइल मेडिकल कॉलेज, लेविस थॉमस युनिव्हर्सिटीचे वैद्यक प्राध्यापक या नात्याने अजूनही कामात मग्न आहेत.

अनेक विद्यापीठांनी त्यांना मानद डीएससी पदवी दिली आहे. अनेक प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकांच्या, अहवालांच्या संपादनात वार्मस यांचा संपादक मंडळाचे सदस्य, सहसंपादक, संपादक किंवा ज्येष्ठ संपादक म्हणून महत्त्वाचा वाटा आहे.

वार्मस यांना मानाचे समजले जाणारे ‘नॅशनल मेडल ऑफ सायन्स’ अमेरिकन सरकारतर्फे देण्यात आले. तसेच वार्मस आणि बिशप यांना एकत्रितपणे ‘अल्बर्ट लास्कर बेसिक मेडिकल रिसर्च ॲवार्ड’ बहाल करण्यात आले.

वार्मस सदस्य असलेल्या प्रमुख स्वदेशी संस्था म्हणजे ‘अमेरिकन असोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स’, ‘अमेरिकन सोसायटी फॉर सेल बायॉलॉजी’,‘अमेरिकन सोसायटी फॉर व्हायरॉलॉजी, ‘नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस’. याशिवाय ‘द रॉयल सोसायटी कॅनडा’चे ते परदेशी मानद सदस्य आहेत.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा