सिरोही, देविका : (१९९२-) देविका सिरोही यांचा जन्म उत्तरप्रदेशातील मीरत येथे झाला. देविका यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मीरतमध्ये, दयावती मोदी अकॅडमी आणि सोफिया गर्ल्स स्कूलमध्ये झाले. दिल्लीमधून त्यांनी जीवरसायनशास्त्र विषयातील पदवी घेतली. पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांची निवड मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये झाली. तेथून त्यांनी एम.एस्सी. पूर्ण केले. रोगप्रतिक्षमताशास्त्र,  पेशीशास्त्र, रेण्वीय जीवशास्त्र, भ्रूणचेता विकास अशा विविध विज्ञान शाखांचा अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली.

देविका सिरोही यांनी अमेरिकेतील, पर्ड्यू या प्रख्यात विद्यापीठात, ‘फ्लॅवी विषाणू रचना आणि  विषाणू संघटन यावर संशोधन करून पीएच्.डी. मिळवली. झिका विषाणूवर संशोधन करणाऱ्या तीन प्राध्यापक आणि चार विद्यार्थी अशा सात संशोधकांच्या गटात त्या वयाने सर्वात लहान सदस्य होत्या. पर्ड्यूतील या संशोधक गटाने जगात पहिल्यांदाच झिका विषाणूची रचना शोधून काढली. विषाणूची रचना समजल्यावर आता झिका विषाणूविरुद्ध उपचार करणे, झिका विषाणूविरोधी लस शोधून काढणे सोपे जाणार आहे. झिका विषाणू हा फ्लॅवीव्हायरस प्रकारचा विषाणू आहे. फ्लॅवीव्हायरसचे प्रकार – झिका, डेंग्यू, पीतज्वर, चिकनगुन्या इ. त्यांचे रोगकारक विषाणू डासांच्या एडीज प्रजातीकडून मानवी शरीरात प्रवेश शिरतात.

सर्व फ्लॅवीव्हायरस डासांमार्फत प्रसारित होतात असे नाही. मेंदूदाह ज्वराचा रोगकारक विषाणू, फ्लॅवीव्हायरस प्रकारात मोडतो. त्याचा प्रसार गोचीडींद्वारे होतो. जगभरात फ्लॅवीव्हायरसीसमुळे लाखो लोक आजारी पडतात आणि त्यापैकी कित्येक मरतात. झिका विषाणू गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयातील वारेतून, नाळेतून रक्तात आणि तेथून भ्रूणात येऊ शकतात. भ्रूणाच्या वाढीत डोके अगदी बारीक राहण्यासारखा गंभीर दोष निर्माण होऊ शकतो. काहीवेळा जन्माआधीच गर्भ गळून जाणे किंवा जन्मानंतर अल्पावधीतच अर्भक दगावण्याचाही धोका असतो.

अन्य फ्लॅवीव्हायरसपेक्षा झिका विषाणू कसा वेगळा आहे हे ही देविका सिरोही यांच्या संशोधक चमूने शोधून काढले. फ्लॅवीव्हायरसमध्ये आर.एन.ए हे केंद्रकाम्ल असते. या केंद्रकाम्लाच्या रेणूत ठराविक क्रमाने न्युक्लिओटाइड्चे अकरा हजार घटक असतात. इतर फ्लॅवीव्हायरसच्या आर.एन.ए. शी तुलना केली तर कोणते विशिष्ट न्युक्लिओटाइड्स क्रम झिका विषाणूच्या आर.एन.ए. केंद्रकांम्लामध्ये असतात हे देविका सिरोही यांच्या संशोधन कामामुळे समजले आहे.

पर्ड्यू विद्यापीठात असताना त्यांनी फ्लॅवीव्हायरस प्रकारातील  मुख्यतः डेंग्यू विषाणूवरही काम केले.  या कामाचा त्यांना त्यांच्या पीएच्.डी.साठीही उपयोग झाला. डेंग्यू विषाणूसंबंधी संशोधनावर लेख लिहिणे आणि त्याचे नीट संपादन करणे ही मुख्य लेखक म्हणून जबाबदारी त्यांच्याकडे होती. डेंग्यू विषाणूची विशेषतः त्यातील केंद्रकाम्लाची रचना कशी असते ह्याचा तपशील पाहणे रिचर्ड कुह्न हे शोथ,  रोगप्रतिक्षमता शास्त्र आणि संक्रामक रोग यांच्या प्रयोगशाळेचे संचालक होते. त्यांचे मार्गदर्शन  सिरोही यांना पीएच्.डी.साठी मिळाले. कुह्न, मायकेल रॉस्मन आणि टेड पिअर्सन या ज्येष्ठ संशोधकाना अनेक वर्षांचा विविध प्रकारच्या फ्लॅवी म्हणजे विषाणूंचा अभ्यास आहे.  खरेतर विषाणू पिवळ्या रंगाचे नसून त्यांच्यामुळे यकृत बिघडून पिवळसर टाकाऊ द्रव्ये रक्तात साठतात असा फ्लॅवीचा संबंध आहे. जैविक सुरक्षा पातळी-२ मूल्यांकन असलेली अत्याधुनिक उपकरणे विषाणू प्रयोगशाळा पर्ड्यू विद्यापीठात आहेत. विशेषतः अतिशीत वातावरणात काम करता येईल असा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक आणि अशी साधने वापरण्यात पारंगत उच्चशिक्षित पीएच्.डी. नंतरच्या संशोधनाचे काम करत असलेले शास्त्रज्ञही तेथे आहेत. असा कुशल, जिज्ञासू, संशोधनाचा ध्यास घेतलेल्या माणसांचा संघ आणि अत्याधुनिक उपकरणे असलेली प्रयोगशाळा या बळावर त्यांचे प्रयत्न सफल झाले.

सिरोही यांनी व्यक्तिश: झिका विषाणू वाढवण्यासाठी कोणत्या पेशी वापरायाच्या हे ठरविले. नमुन्यांतील विषाणू शुद्ध रूपात मिळावे यासाठी प्रक्रिया केल्या. या शुद्धीकरणाला एक महिना लागला. परंतु त्याचा प्रतिमा रेखनासाठी एकाच प्रकारचे विषाणू  मिळायला फायदा झाला. विविध विषाणू प्रकारांचे मिश्रण असते तर रचनेत स्पष्टता आली नसती.

चेन या त्यांच्या सहकाऱ्याने झिका विषाणूंची विविध कोनांतून अक्षरश: हजारो छायाचित्रे घेतली. त्यांचे एकावर एक चित्ररोपण व संकलन करून झिका विषाणूची त्रिमित प्रतिमा जगात पहिल्यांदाच साकारली गेली.

झिका विषाणू प्रतिमांची पुरेशी माहिती एकत्र मिळाल्यानंतर सिरोही यांनी विदा (माहिती) विश्लेषण केले. कुह्न, या ज्येष्ठ संशोधक आणि गटप्रमुखाचा विश्वास असल्याने संशोधन शब्दबद्ध करणे, संपादित करणे ही जबाबदारी वयाने लहान असूनही सिरोही यांच्याकडेच होती. अन्य लेखक आणि संख्याशास्त्र, आकृत्या यांचे तज्ज्ञ यांच्याशी समन्वय साधणे अशी प्रकाशन पूर्व संस्करणाची बहुविध कामे सिरोही यांनी अचूक आणि झपाट्याने केली.

यातून  लक्षात आले की  झिका विषाणू रचना समजण्याची सुरुवात झाली आहे. याबद्दल शिकण्यासारखे खूप आहे. विषाणूची बाह्य रचना समजल्यावर त्याच्या पृष्ठावरचे ग्राहक रेणू कसे आहेत, त्यांची कोणत्या आकार, प्रकारच्या प्रथिन रेणूवर पकड बसू शकते कळेल. ती पकड बसू नये यासाठी काय औषध योजना करता येईल, कोणत्या रसायनांनी विषाणूचे कवच फोडून त्यांना निष्प्रभ करता येईल. पृष्ठावरच्या ग्राहक रेणूंची रचना त्यांच्या विरुद्ध प्रतिद्रव्ये तयार करायला, लस निर्माण करायला उपयोगी पडेल. झिका विषाणू रचना नक्की ठरल्याचा रक्त तपासणीतून निश्चित रोगनिदान करण्यासही फायदा होईल.

आफ्रिका खंडातील युगांडाचे झिका जंगल हे उगमस्थान असलेला हा विषाणू आता आफ्रिकेतून सरकत ब्राझील, कोलंबियासारख्या दक्षिण अमेरिकन देशांत आणि जगातील एकूण शहाऐंशी देशांत आरोग्य सेवांना आव्हान बनून राहिला आहे.

सध्या झिका विषाणूरोगावर एकही औषध नाही. झिका विषाणू विरोधी लसही नाही. परंतु संशोधनातून ज्ञान आणि त्यातूनच झिका विषाणू विरोधी उपाययोजना सापडेल.

 संदर्भ:

समीक्षक : मोहन मद्वाण्णा