राष्ट्रीय जीव विज्ञान केंद्र, बेंगळूरू

राष्ट्रीय जीवविज्ञान केंद्र : (स्थापना – १९९२) अब्राहम फ्लेक्सनर यांनी प्रिंस्टन (यूएस) येथील इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी उभी करत असता अशी संस्था कशी असावी याबद्दल त्यांचे मत व्यक्त केले. ते म्हणाले “संस्था लहान असावी, शिक्षक व संशोधकांची संख्या कमी असावी. व्यवस्थापन जाचक नसावे. व्यवस्थापकाचे स्थान वरिष्ठ नसावे. शिक्षकाकडून व्यवस्थापनाचे काम फावल्या वेळात करून घ्यावे. त्यांचा निर्णय प्रक्रियेत सरळ सहभाग असावा. सुदैवाने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे संस्थापक होमी भाभा या वेळी फ्लेक्सनर यांच्यासमवेत होते. त्यांच्या मनात फक्त भौतिक विज्ञानासाठी संस्था सुरू न करता भारतात वैज्ञानिक संस्कृती चालू व्हावी यासाठी भौतिकी, गणित, जीवविज्ञान आणि इतर विज्ञान शाखेमध्ये मूलभूत संशोधन करण्यासाठी नवी संस्था सुरू करण्याच्या प्रयत्नातून नियोजन सुरू झाले.

राष्ट्रीय जीवविज्ञान केंद्र अधिकृतपणे चालू होण्यापूर्वीच मध्यवर्ती मंडळाचे (Core group) सदस्य एकत्र आले. ओबेद सिद्दिकी, गायती हसन आणि के. विजय राघवन यांनी नव्या प्राध्यापकांची निवड करण्याचे काम चालू केले. मध्यवर्ती मंडळाने बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथील रेडियो अ‍ॅस्ट्रॉनॉमीच्या परिसरात भावी संस्थेचे काम चालेल असे प्रसिद्ध केले. कारण रेडियो अ‍ॅस्ट्रॉनॉमी विभाग पुण्याला नेण्याचा निर्णय पूर्वीच झालेला होता. संचालक प्रोफेसर सी. एन. आर. राव यांची  परवानगी  त्वरित मिळाली. मुंबईतील टी.आय.एफ.आर.ने  बेंगलोर येथील परिसरात नव्या प्रयोगशाळा बांधण्याचे काम वेळ न घालवता चालू केले. १९८८ साली झालेल्या थोड्या नेमणुकानंतर १९९० साली  डॉ. जयंत उदगावकर, एम. रामस्वामी, १९८१ साली एम. के. मेनन, एम. एम. पणिक्कर, वगैरे आले. १९९२ साली एन.सी.बी.एस. या संस्थेचे प्रशासकीय अधिकारी टी. एम. महादेवन पुण्याहून बेंगलोर येथे परतले. कार्यकारी समितीची पहिली सभा २७ जुलै १९९२ या दिवशी झाली.

राष्ट्रीय जीव विज्ञान केंद्र (एन.सी.बी.एस.) ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचा भाग असलेली संस्था रेणू, पेशी आणि सजीव या तीनही पातळ्यावर प्रायोगिक आणि संगणकीय संशोधन करणारी एक महत्त्वाची संस्था आहे. संस्थेचा उद्देश वरील तीनही पातळ्यांवर जीवविज्ञानात जैविक पद्धतींचा अभ्यास करणे हा आहे. संस्थेतील शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थी यांना एका अद्ययावत संशोधन संस्थेतून काम करता यावे यासाठी संस्थेमधे सर्व सोयी उपलब्ध केल्या आहेत.

बेंगळुरू शहराच्या उत्तरेस बेल्लारी रस्त्यावर गांधी कृषीविज्ञान केंद्राच्या परिसरात संस्थेचे मुख्य कार्यालय आहे. संस्थेच्या परिसरातच विद्यार्थी, अभ्यागत, प्रशिक्षक आणि संशोधक यांच्या निवासी, क्रीडा आणि करमणुकीच्या सोयी केलेल्या आहेत. याच्या जवळ आणखी विद्यार्थ्यांची वसतिगृहे उभी करण्याचे काम चालू झाले आहे.

राष्ट्रीय जीवविज्ञान केंद्राचा मुख्य उद्देश जीवविज्ञानाचा अभ्यास आहे. हे साध्य होण्यासाठी एखाद्या जीववैज्ञानिक प्रश्नाचा सर्व बाजूने विचार करण्याची आवश्यकता आहे. यासाठी विविध जीवाविज्ञान, गणित आणि संगणक तज्ज्ञांची निवड करण्यात आली. जीवशास्त्राच्या प्रश्नांचा अभ्यास विविध मार्गाने करण्यामुळे संशोधक कमी असले तरी संशोधनाची गुणवत्ता सुधारली.

एन.सी.बी.एस.च्या पहिल्या पाच वर्षात ही जीवविज्ञान संशोधनाची एक प्रमुख संस्था बनली. पदव्युत्तर शिक्षण, संशोधन व पीएच्.डी. संशोधन करताना पाच वर्षाचा पीएच्.डी. पदवीचा अभ्यासक्रम आखला गेला. यासाठी बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील तज्ज्ञांची मदत झाली.

भारतातली जैवविविधता मोठ्या प्रमाणावर धोक्यात आलेली आहे. त्याचे संशोधन व भविष्यातील आर्थिक परिणाम यांचा अभ्यास करण्यासाठी नवे नैसर्गिक स्त्रोत शोधणे आवश्यक ठरले आहे. १९९७ साली एन.सी.बी.ए.एस.मध्ये वन्यजीवन (वाइल्ड लाईफ) संवर्धन व संरक्षण अभ्यासक्रम चालू केला. या विषयात एम.एस्सी. आणि पीएच्.डी. करण्याची सोय आहे. पारिस्थितिकी आकलन, प्रकल्प नियोजन, तांत्रिक कौशल्य, कायदेशीर बाजू, मानव वन्यजीव संघर्ष अशा सर्व बाबींचे शिक्षण या अभ्यासक्रमात दिले जाते.

टी.आय.एफ.आर. फक्त राष्ट्रीय जीवविज्ञान केंद्र चालू करून थांबली नाही. या संस्थेशी आणखी तीन-चार संलग्न संस्था आंतरराष्ट्रीय सहकार्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन करीत आहेत त्यातील पहिली ‘सीमॉन्स सेंटर फॉर स्टडी ऑफ लिव्हिंग मशीन्स’ या संस्थेमध्ये जैवरेणू, पेशी आणि सजीवांच्या यांत्रिक गुणधर्मावर संशोधन केले जाते. यामध्ये प्रथिनांचे कार्य, पेशीविज्ञानातील संगणकीय भाग, आणि उत्क्रांतीचा अभ्यास होतो. याचा उद्देश सजीव भौतिकी  विज्ञान संशोधन हा आहे. यासाठी गणितीय पद्धत व प्रयोग यांचा आधार घेतला जातो. यासाठी परस्पराशी संलग्न प्रयोगशाळा तयार झाल्या आहेत.

दुसरी संलग्न संस्था एन.सी.बी.एस. मॅक्स प्लँक लिपिड सेंटर. या संस्थेची स्थापना २२ सप्टेंबर २०११ या दिवशी झाली. जर्मनी ड्रेस्डॉन येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट ऑफ सेल बायॉलॉजी अ‍ॅन्ड जेनेटिक्स बरोबर एन.सी.बी.एस. संलग्न आहे. सजीव पेशीतील विशिष्ट मेद रसायनावरील संशोधन येथे करण्यात येते. या केंद्रामध्ये पेशी मेदाम्लांचा विशिष्ट मानवी आजार उदा., मधुमेह, स्थूलत्व विकार, दृष्टीपटलपेशी कमकुवत होणे (retinal degeneration) आणि आश्रयी-परजीवी पेशी संबंध यावर संशोधन होते

तिसरी संस्था ‘केमिकल इकॉलॉजी’ या नावाने कार्यरत आहे. सूक्ष्मजीवाणूपासून ते हत्तीचे सामूहिक जीवन या सर्व क्रियांमध्ये विशिष्ट रसायनांचा सहभाग आहे. सजीवांमधील रसायने व पर्यावरण यांचा सरळ संबंध आहे. सजीव वर्तन व उत्क्रांती यातील रासायनिक सहसंबंध हा या संस्थेच्या संशोधनाचे केंद्र आहे.

मेंदूतील विकार शोधण्यासाठी मूल पेशींचा वापर करून मेंदू विकार शोधण्यासाठी चौथी संस्था एन.सी.बी.एस. बरोबर संलग्न करण्यात आली आहे. या संस्थेमध्ये मानवी आनुवंशिक विकारावर संशोधन करण्यात येणार आहे. एन.सी.बी.एस. संस्थेला केंद्र सरकारच्या अणुशक्ती विभाग आणि जैवतंत्रज्ञान विभाग या दोघांचे सहाय्य मिळते.

एन.सी.बी.एस. सुरू झाल्यापासून बेंगळुरू शहर व परिसर जैवविज्ञान संशोधन समूह झाला आहे.

संदर्भ :

समीक्षक : किशोर कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.