रुदरफोर्ड-ॲपलटन प्रयोगशाळेचे विहंगमदृश्य

रुदरफोर्डपलटन प्रयोगशाळा : (स्थापना – १९७९) इंग्लंडमध्ये ऑक्सफर्डशायर परगण्यात रुदरफोर्ड ॲपलटन नावाची एक संशोधन संस्था आहे. विज्ञान तंत्रज्ञान यांच्या विकासाला गती देण्यासाठी ऑक्सफर्ड शहराजवळ हार्वेल नावाचे एक विशेष क्षेत्र विकसित करण्यात आले. या क्षेत्राला हार्वेल परिसर असे म्हणतात. रूदरफोर्ड-ॲपलटन प्रयोगशाळा याच परिसरात आहे. अर्नस्ट रुदरफोर्ड हे एक प्रथितयश शास्त्रज्ञ होते. त्यांनी अणुसंरचनेचा अभ्यास केला. त्यासाठी त्यांना १९०५ सालचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. एडवर्ड ॲपलटन हे देखील भौतिक शास्त्रज्ञ होते. त्यांनी वातावरणातील आयनांबराचा अभ्यास केला. त्यांच्या या कामासाठी त्यांना १९४७चा  नोबेल पुरस्कार देण्यात आला.  रुदरफोर्ड ह्यांच्या नावाने स्थापिलेल्या रुदरफोर्ड महाऊर्जा प्रयोगशाळेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन न्यूक्लिअर सायन्सेस (NIRNS) ही प्रयोगशाळा १९५७ मध्ये उभारण्यात आली होती.

सन १९७५ च्या जवळपास ॲटलास कॉम्प्यूटर लॅबोरेटरीचे तिच्यात विलीनीकरण करून रुदरफोर्ड प्रयोगशाळेची स्थापना झाली आणि १९७९ मध्ये ॲपलटॅन प्रयोगशाळेची जोड देऊन रुदरफोर्ड ॲपलटॅन प्रयोगशाळेची स्थापना केली गेली.

इंग्लंडची सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॅसिलिटीज कौन्सिल ही संघटना या प्रयोगशाळेचे नियंत्रण करते. विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रांत आधुनिक संशोधन करण्यासाठी लागणार्‍या सर्व सुविधा पुरविण्याचे कार्य ही प्रयोगशाळा करते. येथे म्युऑन आणि न्यूट्रॉन स्रोतांचा वापर करून भौतिकशास्त्रातील अनेकविध प्रयोग केले जातात. या प्रयोगशाळेत असलेली दुसरी सुविधा आहे ती लेझर किरणांची. या सुविधेचा फायदा केवळ इंग्लंडमधलेच नाही तर इतर यूरोपियन देशातील शास्त्रज्ञ देखील घेऊ शकतात.

इतर संस्थांमधील संशोधकांना सुविधा पुरविण्याबरोबरच अनेक महत्त्वाचे संशोधन प्रकल्प या संस्थेत राबविले जातात. यामध्ये समावेश होतो अंतरिक्ष विज्ञानाचा. इंग्लंड देशाच्या अंतरिक्ष संशोधनात ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावते. याखेरीज इतर देशांच्या अंतरिक्ष कार्यक्रमातदेखील संस्था मदत करते. अनेक देश अंतरिक्षाचा अभ्यास करण्यासाठी उपग्रह पाठवतात. या उपग्रहातील काही भाग याच प्रयोगशाळेत बनविलेले असतात.

भारताच्या चंद्रयान योजनेला देखील या संस्थेने मदतीचा हात दिलेला आहे. संशोधनाचा वारसा पुढच्या पिढीकडे जावा यासाठी या प्रयोगशाळेत विशेष प्रयत्न केले जातात. शाळा किंवा महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी जर या संस्थेला भेट देऊ इच्छित असतील तर त्यांच्यासाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. आधी जर कळविले असेल तर विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा दाखविण्याबरोबरच काही मनोरंजक प्रयोगाची व्यवस्थादेखील करण्यात येते.

संदर्भ :

  • Science and Technology Facilities Council
  • Proton liner accelerators for nuclear research and the A E R C 600 MeV project // Nuovo Cimento 2(S1) 413-422
  • Central Laser facility Science and Technology Facility Council April 2007. Retrieved 2 November 2008

समीक्षक : श्रीनिवास केळकर