ब्रोका, पॉल (Broca, Paul) : (२८ जून १८२४ – ९ जुलै १८८०). प्रसिद्ध फ्रेंच शल्यविशारद, शारीरविज्ञ आणि शारीरिक मानवशास्त्राचे आद्य प्रणेते. ब्रोका यांचा जन्म फ्रान्समधील सेंट फोय ला ग्रँडे येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बेंजामीन, तर आईचे नाव ॲनीटी होते. फ्रान्समधील नामांकित अँद्रे ब्रोका हे पॉल यांचे चिरंजीव होते. ब्रोका हे लहानपणापासूनच हुशार होते. त्यांनी पॅरीस विद्यापीठात वयाच्या सतराव्या वर्षी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि इ. स. १८४४ मध्ये वैद्यक विषयाची पदवी मिळविली. तसेच भोतिकशास्त्र, गणित आणि साहित्य या विषयांच्याही त्यांनी एकाच वेळी पदव्या संपादन केल्या. इ. स. १८४९ मध्ये त्यांनी वैद्यक विषयाची विद्यावाचस्पती ही पदवी मिळविली. तत्पूर्वी इ. स. १८४८ मध्ये ते वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शरीरविच्छेदनाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते इ. स. १८५३ मध्ये शल्यचिकित्सक म्हणून रुजू झाले.
ब्रोका यांनी वैद्यकीय संशोधनाला सुरुवात करून मानवमिती, मस्तिष्क आणि कवटीमितीचा पाया घातला. त्यांनी मानवी शरीरावरील मोजमापे, महत्त्वपूर्ण शरीरखूणा, त्यासाठी लागणारे साहित्य व तंत्र यांची पद्धत विकसित केली. त्यांनी मानवी कवट्यांची मोजमापे घेऊन त्यांच्या लांबी आणि रुंदीवरून त्या त्या कवटीचा निर्देशांक, कवटीची घनता आणि क्षमता मोजण्याऱ्या तंत्रांचा शोध लावला. त्यांनी कवटीमितीसाठी २० विविध मोजमापांची आणि साहित्यांची रचना केली. उपलब्ध शारीरिक मोजमापांवरून मानवाचे विविध वांशिक गटांत वर्गीकरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी ॲफॅसिक रुग्णाचा (बोलण्यास असमर्थ व्यक्ती) अभ्यास करून डोक्याच्या-कपाळाच्या डाव्या बाजुकडील मेंदूतील वाचाकेंद्र शोधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. या भागाला ‘ब्रोकास एरीया’ म्हणून ओळखले जात असून त्याचे मानसशास्त्रात फार मोठे महत्त्व आहे. याबरोबरच त्यांनी कर्करोग, विकारविज्ञान, रोहिणी विस्फार (एन्युरिझम), बालमृत्यू यांचाही अभ्यास केला.
ब्रोका यांनी इ. स. १८५९ मध्ये ‘सोसायटी ऑफ अँथ्रोपॉलॉजी ऑफ पॅरिस’ या संस्थेची स्थापना केली. तत्पूर्वी त्यांची इ. स १८५८ मध्ये जर्मन अकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून निवड झाली. इ. स. १८७२ मध्ये रिव्ह्यू डी अँथ्रोपॉलॉजी आणि इ. स. १८७६ मध्ये पॅरीस येथे मानवशास्त्र शाळेची स्थापना केली. त्यांनी सोसायटी अॅनाटॉमिक दि पॅरीस या संस्थेचे सदस्य, सचिव आणि उपाध्यक्ष; फ्रेंच सिनेटचे आजीवन सदस्य; फ्रेंच अकादमीचे सदस्य अशी विविध पदांवर काम केले. त्यांनी मानवी मेंदू, डार्विनवाद यांवर अनेक निबंध व पुस्तके लिहिली आहेत. त्यांची सुमारे २२३ संशोधन लेख आणि शेकडो पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कार्यास देश-विदेशांतून अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
ब्रोका यांचे पॅरीस येथे निधन झाले. पॅरीसच्या आयफेल टॉवरवर कोरलेल्या एकूण ७२ नावांत पॉल ब्रोका यांच्या नावाचा समावेश आहे.
संदर्भ :
- Srivastava, R. P., Morphology of the Primates and Human Evolution, New Delhi, 2009.
समीक्षक : सुभाष वाळिंबे