(विद्युत संग्राहक, विद्युत धारित्र). विद्युत उर्जा साठविणारे उपकरण. यात दोन किंवा दोन पेक्षा अधिक संवाहक पट्टांच्या संचांनी बनलेला एक घटक असतो, ज्यामध्ये एक पातळ निरोधक असताे आणि या संचाला सिरॅमिक किंवा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवलेले असते. अशी याची सर्वसाधारण संरचना असते. याचे साधे उदाहरण म्हणजे समांतर-पट्ट संधारित्र. संधारित्राच्या एका पट्टावर संपूर्ण धन भार (+Q) संचयित असेल, तर तेवढ्याच प्रमाणात ऋण भार (-Q) दुसऱ्या पट्टावर असतो. त्यामुळे संधारित्राला भार (Q) आहे असे म्हणण्यात येते.

संधारित्राचे अनेक उपयोजन आहेत. उदा., संगणकाच्या स्मृतीमध्ये साठविलेली माहिती विद्युत प्रवाहात खंड पडल्यास गमवावी लागू नये म्हणून संगणकाच्या अंकीय मंडलावर संधारित्राचा वापर करण्यात येतो. विद्युत प्रवाहाच्या खंडतेमुळे ही माहिती संधारित्रावर विद्युत ऊर्जेच्या स्वरूपात असते. तसेच बनावट विद्युत संकेत वळवण्यासाठी गाळण म्हणून संधारित्र अधिक महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्यामुळे संवेदनशील घटक आणि विद्युत लाटामुळे होणारे विद्युत मंडलाचे नुकसान टाळता येते.

संधारित्राचा आणखी एक सामान्य प्रकार म्हणजे विद्युत अपघटनी संधारित्र (Electrolyte capacitor) आहे, जो लहान पाकीटामध्ये उच्च धारिता संधारित्र आहे.

संगणकातील इतर घटकांप्रमाणे, संधारित्र अयशस्वी होऊ शकतात आणि जेव्हा ते संगणकात अयशस्वी होतात तेव्हा ते इतर घटकांना अयशस्वी होण्यास कारणीभूत ठरतात. मदरबोर्डावरील संधारित्र अयशस्वी होतात तेव‌्‌हा संगणक सुरू करता येत नाही. या परिस्थितीत एकतर संधारित्र बदलणे आवश्यक असते किंवा संगणकात नवीन मदरबोर्ड ठेवणे आवश्यक असते.

संधारित्राचे मानक एकक फॅराडे (F) आहे.

1 µF =10-6F (µF = मायक्रो फॅराडे)

1 pF = 10-12 F (pF = पिकोफॅराडे)

संधारित्राचे संगणकातील कार्य : संधारित्राची बांधणी संकलित मंडलावर (Integrated Circuit) केलेली असते. ते संयुक्त रूपाने ट्रँझिस्टर (Transistor) सोबत डायनॅमिक रॅन्डम ॲक्सेस मेमरी (DRAM) मध्ये वापरले जातात. संधारित्र संगणकातील स्मृतीचा मजकूर राखण्यास मदत करतात. त्यांच्या लहान भौतिक आकारामुळे घटकांमध्ये कमी क्षमता असते, त्यामुळे त्यांना दर सेकंदाला हजारो वेळा पुनर्भरण करणे आवश्यक असते, नाहीतर DRAM आपली संग्रहीत माहिती गमावू शकत.

संधारित्र पाण्याच्या टाकीसारखे विद्युत घटाप्रमाणे कार्य करतात, ज्याप्रकारे टाकीमध्ये साठवलेले पाणी पुन्हा वापरता येते, त्याचप्रकारे संधारित्रामध्ये संचयित केलेली ऊर्जादेखील देखील पुनर्प्राप्त केली जाऊ शकते. विद्युत ऊर्जा गोळा करणे आणि विद्युत ऊर्जा पुनर्संचयित करणे हे संधारित्राचे मुख्य कार्य आहे. त्याच्या या कार्याला संधारित्राची भरण-पुनर्भरण (चार्जिंग-डिसचार्जिंग; Charging-Discharging) प्रक्रिया म्हणतात. संधारित्रातील धारिता इंग्रजी अक्षर ‘सी’ (C) याने दर्शविली जाते. त्याची क्षमता वरीलप्रमाणे म्हणजेच धारिता फॅराडे ‘एफ’ (F) ने मोजली जाते.

पहा : विद्युत धारित्र.

संदर्भ :

समीक्षक : विजयकुमार नायक