मध्य आफ्रिकेतील रूआंडा या खंडांतर्गत देशाची राजधानी. लोकसंख्या ११,३२,६८६ (२०१२). देशाच्या मध्यवर्ती भागात, रूगन्वा नदीच्या काठावर, सस. पासून १,५४० मी. उंचीवर हे शहर वसले आहे. या शहराचा विस्तार सौम्य चढ-उतार असलेल्या चार टेकड्यांवर झालेला आहे. शहराच्या ईशान्य भागात निवासी क्षेत्र, तर आग्नेय भागात औद्योगिक क्षेत्र आहे. गे शहर विषुववृत्ताजवळ असूनही येथील हवामान आल्हाददायक आहे.
किगाली शहर जर्मन वसाहतकाळात (इ. स. १८९५ नंतर) एक व्यापारी केंद्र म्हणून भरभराटीस आले होते. पहिल्या महायुद्धानंतरच्या बेल्जियन प्रशासनकाळात (इ. स. १९१९ ते १९६२) हे प्रमुख विभागीय केंद्र बनले. रूआंडाच्या स्वातंत्र्यापासून (१ जुलै १९६२) ही देशाची राजधानी बनली. तेव्हापासून हे देशाचे प्रमुख आर्थिक, सांस्कृतिक, दळणवळण व व्यापारी केंद्र बनले. १९९४ मध्ये किगालीमधील हूतू जमावांनी आणि रूआंडा सैन्यांनी हजारो तूत्सी लोकांची हत्या केली होती. आता मात्र येथील लोकांनी या घटनेला विस्मरणात लोटून देशास प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याच्या हेतूने प्रेरित होऊन विकासाचा मार्ग अनुसरला आहे. हे येथील पायाभूत सुविधांच्या विकासावरून लक्षात येते. येथे कृषी, मासेमारी आणि वनांवर आधारित व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतात. १९८० च्या दशकात येथे कथिल, टंगस्टन व लोह ओतशाळा सुरू करण्यात आल्या. शहराच्या नजीक असलेल्या कथिल खाणी या किगालीच्या आर्थिक विकासाचा प्रमुख स्रोत आहे. त्या कंपन्यांची प्रधान कार्यालये किगालीमध्ये आहेत. शहरात अनेक लघूद्योग चालत असून त्यांमध्ये पादत्राणे, रंगनिर्मिती, रेडिओ जुळणी, व्हार्निश (रोगण) करणे, कातडी कमविण्याची प्रक्रिया इत्यादींचा समावेश आहे.
किगाली हे शहर देशाच्या चारी दिशांच्या सीमांपर्यंत रस्त्यांनी जोडलेले आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. टेकड्यांवरील स्थान आणि आल्हाददायक हवामानामुळे पर्यटनाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे शहर आहे. येथे रूआंडा विद्यापीठ आहे (स्था. २०१३). येथील रोमन कॅथलिक चर्च, ल्यूथियन चर्च ऑफ रूआंडा, अँग्लिकन चर्च, किगाली सिटी टॉवर, व्हॉल्केनोज नॅशनल पार्क इत्यादी उल्लेखनीय आहेत.
समीक्षक : वसंत चौधरी