लक्ष्मीनारायणन, महादेवन : ( १९६५ -) लक्ष्मीनारायणन महादेवन हे भारतीय वंशाचे वैज्ञानिक सध्या हार्वर्ड विद्यापीठात लोला इंग्लंड द वल्पीन प्रोफेसर आहेत. त्यांच्या अभ्यासाचे विषय उपयोजित गणित, पूर्ण जीवाचे (organismic) व उत्क्रांतीचे जीवशास्त्र, आणि भौतिकशास्त्र हे आहेत. ते रॉयल सोसायटीचे फेलो आहेत. सजीवाचा आकार कसा तयार होतो हे गणितीय पद्धतीने शोधताना या मागील भौतिकशास्त्र व जीवशास्त्र उलगडणे हा त्यांचा संशोधनाचा विषय आहे. भारतात जन्मलेल्या महादेवन यांनी मद्रासच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी येथून पदवीधर झाल्यानंतर पुढील शिक्षण अमेरिकेत घेतले. स्टॅन्फर्ड विद्यापीठामध्ये पीएच्.डी. केल्यानंतर त्यानी आपले स्वतंत्र शोधकार्य मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी येथे सुरू केले. इ.स. २००० मध्ये केंब्रिज विद्यापीठामध्ये त्यांची ट्रिनिटी फेलो आणि कॉम्प्लेक्स फिजिकल सिस्टीम या विषयाचे पहिले स्लमबर्जे प्रोफेसर म्हणून निवड झाली. इ.स. २००३ पासून ते हार्वर्डमध्ये कार्यरत आहेत.

महादेवन यांना अगदी बहुरेण्वीय रचनांपासून ग्रहगोलांपर्यंतच्या वस्तूंच्या आकाराचे आकृतिबंध आणि त्यांच्यामधील निर्जीव द्रव्याचे वहन तपासण्यात विशेष रुची आहे. त्याचप्रमाणे जे स्वसंघटन करू शकते, ज्याला संवेदना असते आणि जे कृती करू शकते अशा,अगदी पेशीतील असो की महाकाय, वेदनक्षम सजीव द्रव्याचे गतिशास्त्र हाही त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. यासाठी ते आणि त्यांचे सहकारी प्रयोग, सिद्धांत आणि संगणन या तिन्हींचा उपयोग करतात.

गळका नळ, चिकटपट्टी कालांतराने निकामी होणे किंवा चिखल वाळत गेल्यावर त्यामध्ये होणारे बदल अशा बाबी आपण गृहीत धरतो. उलट महादेवन यांच्यासाठी जगातील प्रत्येक गोष्ट म्हणजे मोठे कुतूहल आहे. ते गणित आणि भौतिक विज्ञानाच्या दृष्टीतून अशा गोष्टींचा विचार करतात. त्यावर योग्य संशोधन केले तर त्यातून महत्त्वाचे निष्कर्ष निघतात, असे त्यांचे म्हणणे आहे. कागदाचे त्यांना मोठे कौतुक आहे. चुरगाळलेल्या कागदाला पडलेल्या घड्या त्याच्या संविशेष बिंदूवर (singularity) पडतात.  तरंगत सोडलेला कागद वायुगतिकी नियम (aerodynamics) पाळतो. साध्या भिंतीवर लावलेला रंग वाळण्यावर त्यांनी हार्वर्डच्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या पत्रिकेसाठी शोधनिबंध लिहिला होता. आपल्या विद्यार्थ्यांनी काहीतरी भव्य दिव्य मोठ्या अवघड प्रश्नावर संशोधन करण्याबरोबर ज्ञान मिळवण्यासाठी साध्या साध्या प्रश्नांची उकल करण्यासाठीही वेळ द्यावा असे त्यांना वाटते.

महादेवन हे एकाच वेळी अनेक प्रश्नांचा विचार करतात. बेंगलोर आयआयटीमध्ये त्यांनी २००९ मध्ये पहिल्यांदा वाळवीचे वारूळ पाहिले. ब्राझीलमध्ये ग्रेट ब्रिटनच्या आकाराच्या वाळवी  वारुळाचा अभ्यास झाला आहे. वारुळामध्ये तापमान, आर्द्रता, वायुवीजनमार्ग, भ्रूण कोठड्या, कवक शेती सर्वांचा विचार केलेला असतो. दिवसातून एकदा वारुळाचे तापमान नियंत्रित होते. त्याची तुलना मानवी फुफ्फुसाबरोबर करता येईल अशी महादेवन यांची धारणा आहे. त्यांनी केलेल्या गणितीय प्रारूपामधून वारुळाचा त्रिमिती आकार (जॉमेट्री) परिसर सापेक्ष असून या आकाराद्वारे वाळवीचे वर्तन कसे ठरते हे स्पष्ट होते. महादेवन यांनी सस्तन प्राण्यांच्या मेंदूवरील घड्या आणि लहान आतड्यांच्या वेटोळ्याचा आकारशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास केला. त्याप्रमाणे सफरचंदाच्या आकाराचाही अभ्यास केला. सफरचंद गोल चेंडूच्या आकाराऐवजी जेथे देठ असतो तेथे विशिष्ट आकार घेते. या आकाराचे गणित काय आहे हे त्यांनी शोधले.

वरवर पाहताना साध्या-सोप्या पण गणितीय पद्धतीने त्रास देणाऱ्या प्रश्नांचे भौतिक व जैववैज्ञानिक उत्तर शोधल्याबद्दल त्यांना २००६ साली ग्युगेनहाईम फेलोशिप, २००७ साली भौतिक विज्ञानातील आयजी नोबेल पुरस्कार, तसेच २००९ मध्ये मॅकआर्थर फेलोशिप मिळाली होती. त्यांच्या कामास रॅडक्लिफ इन्स्टिट्यूट, ऑक्सफर्ड, इकोल नोर्मल सुपेरिअर (पॅरिस), बर्कले आणि एमआयटी या नामांकित विद्यापीठांतील अभ्यागत प्राध्यापक अशी मान्यता मिळाली आहे.

संदर्भ : 

समीक्षक : हेमचंद्र प्रधान