गिरिपिंड हा भूकवचाचा एक भाग असून त्याच्या सुस्पष्ट सीमा विभंगांनी (तड्यांनी) निश्चित झालेल्या असतात. म्हणजे तो विभंगांनी सीमाबद्ध झालेला असतो. अशा प्रकारच्या संरचनेतून तयार झालेल्या पर्वर्तांच्या गटालाही गिरिपिंड म्हणतात. भूकवचाचा हा विशाल भाग (घटक) सभोवतालच्या खडकांपेक्षा अधिक दृढ (घट्ट) असतो. यामुळे यावर प्रेरणा (जोर) लागू होते. तेव्हा तो भंग पावतो व एका नगासारखा हालतो.

गिरिपिंडाची निर्मिती : जमिनीखालील भूपट्टांच्या हालचालीद्वारे गिरिपिंडाच्या निर्मितीची सुरुवात होते. या हालचालीला पुष्कळदा शिलारस (मॅग्मा) कारणीभूत असतो. खडकांखाली निर्माण झालेल्या मोकळ्या जागांमध्ये शिलारसाचे विभाजन होऊन खडकांचे भिन्न प्रकार निर्माण होतात. यातून तयार झालेल्या अवशिष्ट द्रवाची घनता सभोवतालच्या खडकांपेक्षा जास्त असते. शेवटी हा द्रव खाली जातो व घनरूप होतो. या प्रक्रियेत तो प्रसरण पावतो. या प्रसरणामुळे त्याच्या लगतचे खडकांचे थर विस्थापित होतात, म्हणजे सरकतात. यामुळे भूपट्टांमध्ये स्थानबदल (स्थलांतर) होतो. जेव्हा या प्रेरणा वाकू न शकणाऱ्या कठीण खडकावर लागू होतात, तेव्हा त्या खडकाला एक संपूर्ण घटक म्हणून वरील दिशेत जोराने पृष्ठभागापर्यंत सरकवितात वा ढकलतात. तेथे तो गिरिपिंड बनतो. जेव्हा शिलारस पृष्ठभागी येऊन गोठतो, तेव्हाही गिरिपिंड तयार होऊ शकतो.

गिरिपिंडाची गुणवैशिष्ट्ये : गिरिपिंडांचे आकारमान प्रचंड मोठे असून काही गिरिपिंड नेहमीच्या पर्वतांपेक्षाही मोठे आहेत. टामू मासीफ हा सर्वांत मोठा गिरिपिंड वायव्य पॅसिफिक महासागरात असून तो सुमारे ४,६०० मी. उंच आहे. पाण्याखाली असला, तरी तो पृथ्वीवरील सर्वांत मोठा ज्वालामुखी मानतात. याच्या खडकांतील सिलिकेचे प्रमाण खूप जास्त आहे. संबंधित ज्वालामुखी प्रक्रियांमध्ये सिलिका नेहमीच असतो. संगमरवर, क्वॉर्टसाइट; पट्टिताश्म (नाइस) व अँफिबोलाइट हे खडक सामान्यपणे गिरिपिंडांशी निगडित असतात. जेव्हा शिलारसाने खडक वितळतात व नंतर थंड होतात, तेव्हा हे खडक तयार होतात.

गिरिपिंडांची उदाहरणे : पृथ्वीवर अनेक गिरिपिंड असून ते भूपृष्ठ व सागर या दोन्ही ठिकाणी आढळतात. समुद्रातील गिरिपिंडाचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे टामू मासीफ हा गिरिपिंड असून तो जपानच्या किनाऱ्यासमोरील भागात आहे. तो १४.५ कोटी वर्षांपेक्षा अधिक काळापूर्वी तयार झाल्याचे मानतात. फ्रान्समधील ऑव्हेगर्न प्रदेशातील मासीफ सेंट्रल हा यूरोपातील सर्वाधिक नामांकित गिरिपिंड पर्वतरांगांची मालिका, दऱ्या व पठारे यांचा बनलेला आहे. त्याने फ्रान्स देशाचा १५ टक्के भाग व्यापला आहे. या पर्वतरांगांमधील प्यू द सॅन्सी हे सर्वोच्च शिखर समुद्रसपाटीच्या वर २,०६२ मी. उंच आहे. सिरियातील लाइमस्टोन मासीफ हे गिरिपिंडाचे दुसरे उदाहरण असून त्यात माउंट कुर्द, माउंट सिमेऑन व हारीम माउंटन्स या तीन पर्वतांची मालिका आहे. अटलांटिक मासिफ हे आणखी एक नामांकित गिरिपिंड उत्तर अटलांटिक महासागरात आहे. ही समुद्रतळावरील घुमटाकार रचना असून ती सुमारे १६ किमी. पसरली आहे व तिची उंची ४६० मी. आहे. अंटार्क्टिकामधील विनसन मासीफ हा गिरिपिंड सुमारे २०.८ किमी. पसरलेला असून त्याची उंची समुद्रसपाटीच्या वर सुमारे ५,३०० मी. आहे. आफ्रिकेतही गिरिपिंडांची मालिका असून तिच्यात पुढील गिरिपिंड येतात. अद्रार द इफोघस (माली), मुलांजे (मालावी), किलिमांजारो मासीफ (केन्या व टांझानिया यांच्या सीमेवर), ओबान मासीफ (नायजेरिया) आणि वॉटरबर्ग बायोस्पिअर (दक्षिण आफ्रिका).

भूविज्ञानात विभंगांनी किंवा वळणांनी (वक्रांनी, घड्यांनी) सीमांकित झालेल्या भागाला गिरिपिंड  म्हणतात. भूकवचाच्या हालचाली होताना गिरिपिंडाची अंतर्गत रचना टिकून राहते, तर तो पूर्णरूपात अख्खा विस्थापित होतो. अशा रचनेद्वारे बनलेल्या पर्वतांच्या गटासाठीही गिरिपिंड ही संज्ञा वापरतात.

गिर्यारोहण किंवा पर्वतारोहण याविषयीच्या लेखनात पुष्कळदा एखाद्या पर्वताची मुख्य राशी सूचित करण्यासाठी गिरिपिंड ही संज्ञा वापरतात. गिरिपिंड हा भूकवचाचा भूपट्टापेक्षा अधिक लहान रचनात्मक घटक असून भूआकृतिविज्ञानात गिरिपिंड ही चवथी सर्वांत मोठी चालक प्रेरणा मानली जाते.

‘मासीफ’ हा शब्द फ्रेंच भाषेतून आला. फ्रेंच भाषेत याचा अर्थ ‘संपुंजित’ (भक्कम वा जबर) असाही आहे. फ्रेंच भाषेत तो पुढील संदर्भातही वापरतात : विशाल पर्वतराशी अथवा परस्परांशी निगडित असलेल्या पर्वतांचा सुटसुटीत (वा घट्ट) गट व या पर्वतांपासून पर्वतरांगेचा स्वतंत्र भाग तयार होतो.

मंगळावरील चेहरा (फेस म्हणजे भूरूपाचा मुख्य पृष्ठभाग) हा पृथ्वीबाहेरील गिरिपिंडाचे उदाहरण आहे; तर अटलँटिस मासीफ हे पाण्याखाली तयार होऊ शकणाऱ्या गिरिपिंडाचे उदाहरण आहे.

समीक्षक : वसंत चौधरी