गरजते चाळीस ही एक लोकप्रिय नाविक संज्ञा असून ती ४०° ते ५०° अक्षवृत्तांच्या दरम्यान असलेल्या वादळी सागरी प्रदेशांसाठी वापरतात. ही संज्ञा बहुदा दक्षिण गोलार्धाच्या संदर्भात वापरतात. या प्रदेशांत जवळजवळ पूर्णपणे अखंड असा महासागराचा पट्टा आहे. उत्तर व दक्षिण गोलार्धातील ४०° ते ५०° या अक्षवृत्तीय क्षेत्रांत प्रचलित वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. ही क्षेत्रे उत्तर गोलार्धापेक्षा दक्षिण गोलार्धात अधिक विकसित झाली आहेत; कारण उत्तर गोलार्धातील या पट्ट्यातील महासागरी प्रदेशांत या वाऱ्यांच्या वाहण्यावर उत्तर अमेरिका, यूरोप आणि आशिया या भूखंडांच्या अडथळ्यांच्या मर्यादा पडतात; परंतु दक्षिण गोलार्धातील या पट्ट्यातील महासागरी प्रदेशांत असे भूखंडीय अडथळे नसल्यामुळे गरजते चाळीस वारे जोरदार गतीने व पुष्कळदा झंझावती वा सोसाट्याच्या गतीने वर्षभर वाहतात. या अक्षवृत्तीय पट्ट्यात प्रथम प्रवेश करणाऱ्या खलाशांनी त्यांना हे नाव दिले. हे वारे दक्षिण पॅसिफिक महासागरात विनाअडथळा भयानक वेगाने गरजल्यासारख्या गर्जना करीत वाहतात. म्हणून त्यांना ‘गरजते चाळीस’ असे म्हणतात. त्यापुढील ५०° अक्षवृत्तीय पट्ट्यातील वाऱ्यांना ‘खवळलेले पन्नास’, तर ६०° अक्षवृत्तीय पट्ट्यातील वाऱ्यांना ‘किंचाळणारे साठ’ ही नावे दिली आहेत. गरजते चाळीस वारे स्थिर (निश्चल) नसतात; कारण चक्री वादळांमुळे त्यांच्यात खंड पडतो वा व्यत्यय येतो. उबदार हवेची हालचाल, पृथ्वीचे परिवलन आणि भूभागाचा अडथळा नसणे हे तीन मुख्य घटक या वाऱ्यांच्या निर्मितीस कारणीभूत ठरलेले आहेत.

गरजते चाळीस या पट्ट्यात हवेचा दाब नेहमी अधिक असतो. याच भागामध्ये उपोष्ण कटिबंधीय उच्च वातावरणीय दाब असलेली क्षेत्रेही आढळतात. येथपासून ते थेट ६०° दक्षिण अक्षवृत्तीय उपध्रुवीय क्षेत्रापर्यंत हवेचा दाब कमी होत जातो. अंटार्क्टिक वृत्ताजवळ कमी वातावरणीय दाबाचे क्षेत्रच निर्माण झालेले आढळते. त्यामुळे ३५° ते ६०° दक्षिण अक्षवृत्तीय पट्ट्यात वारे पश्चिमी व वर्षभर जोराने वाहणारे असतात. त्यांची सरासरी गती ताशी ३० ते ५० किमी. असते. याच मध्य कटिबंधीय प्रदेशात अनेक अभिसारी चक्रवात (चक्री वादळे) निर्माण होतात आणि ते पश्चिमेकडून पूर्वेकडे जातात. त्यांच्यामुळे वाऱ्यामध्ये उलटसुलट बदल झाले, तरी प्रचलित वाऱ्यांची दिशा पश्चिमच राहते. वसंत आणि शरद ऋतूत कधीकधी हे वारे अधिक प्रबळ आणि वादळी स्वरूपाचे बनून त्यांचा वेग ताशी २०० किमी. पर्यंत वाढलेला आढळतो. त्यामुळे शतकानुशतके या वाऱ्यांचा परिणाम जहाज वाहतुकीच्या मार्गांवर झालेला आढळतो. ३५° ते ६०° दक्षिण या अक्षवृत्तीय पट्ट्यात महासागराचे जलपृष्ठ जवळजवळ अखंड आहे. त्यामुळे वाऱ्याच्या गतीत विशेष फरक होत नाही. वाऱ्याची गती व मार्ग स्थिर राहतात; परंतु हे वारे एकाच रेषेत स्थित न राहता ऋतुनुसार ते उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकतात. दक्षिणी उन्हाळा ऋतूत या वाऱ्यांचा पट्टा दक्षिण ध्रुवाकडे, तर दक्षिणी हिवाळ्यात तो उत्तरेस विषुववृत्ताकडे सरकतो. उत्तर गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यातील वारे ऋतुमानानुसार गती व दिशा बदलतात; मात्र दक्षिण गोलार्धात याच अक्षवृत्तीय पट्ट्यातील वारे हिवाळ्यात व उन्हाळ्यात दिशा व गती बदलत नाहीत. उलट ते सतत पश्चिमेकडून पूर्वेकडे जोरदार गतीने वाहतात. या वाऱ्यांमुळे या क्षेत्रातून पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारी जहाजे अधिक वेगाने जाऊ शकतात. मध्ययुगातच ही गोष्ट नाविकांच्या लक्षात आली होती. त्यामुळे त्यांनी दक्षिण गोलार्धातील सतत द्रुतगती पश्चिमी वाऱ्यांच्या या ४०° ते ५०° दक्षिण अक्षवृत्तीय पट्ट्याला हे नाव दिले. अलीकडच्या काळात पृथ्वी प्रदक्षिणेसाठीच्या प्रवासासाठी तसेच वेगाच्या बाबतीत नवीन विश्वविक्रम करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या शीडजहाज शर्यतींसाठी स्पर्धक गरजते चाळीस या वाऱ्यांचा उपयोग करून घेताना आढळतात.

या अक्षवृत्तीय पट्ट्यात प्रतिव्यापारी वारे वाहत असून येथे चक्रवातांच्या मालिकेबरोबर वर्षभर झंझावती वारे वाहत असतात. वातावरणाच्या खालच्या स्तरातील ढगांनी आकाश आच्छादिलेले असते. हवा अतिशय थंड व दमट असते. पाऊस व हिमवृष्टी मोठ्या प्रमाणात होत असतात. क्वचितप्रसंगी दक्षिणेकडून आलेले मोठे हिमनग इतस्तत: फिरत असतात. या भागातील प्रवास मोठ्या जहाजांच्या बाबतीतही धोकादायक ठरू शकतो. उत्तर अटलांटिक महासागरातील ४०° ते ५०° अक्षवृत्तीय पट्ट्यासही कधीकधी ‘गरजते चाळीस’ म्हटले जाते.

समीक्षक : वसंत चौधरी