हॉल पीटर गॅविन : (२० नोव्हेंबर १९५१ ते ९ जानेवारी २०१६) पीटर गॅविन हॉल यांचे शिक्षण सिडनी विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय विद्यापीठ येथे झाले तर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून पीएच्.डी. पदवी मिळवली. मेलबोर्न विद्यापीठात हॉल हे दोन वर्षे शिकवत होते. नंतर ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय विद्यापीठाच्या गणित व त्याचे उपयोग या केंद्रामध्ये हॉल २७ वर्षे प्राध्यापक होते. तेथे कार्यरत असतानाच त्यांची कॅलिफोर्निया विद्यापीठातही नेमणूक झाली होती. दहा वर्षे ते एआरसी लॉरिएट स्नातक (ARC Laureate Fellow) म्हणून कार्यरत होते.
संभाव्यता क्षेत्रातील सीमा सिद्धांत, अवकाशी प्रक्रिया आणि प्रसंभाव्य भूमिती क्षेत्रांत त्यांचे विपुल संशोधन आहे. तसेच अप्राचलीय घनता फल आकलन (nonparametric density function estimation), सनाश्रयण किंवा प्रतिपगमन आणि वर्गीकरण (regression and classification), पराकोटी मूल्य सिद्धांत (extreme value theory), अयुतिज आणि दोष समस्यांचे मोजमाप (deconvolution and measurement error problems), मिश्र वितरणासाठी अप्राचलीय अनुमान (nonparametric inference for mixed distributions), फलीय आधारसामग्री विश्लेषण (functional data analysis), अनुभवजन्य संभव (experiential probability) आणि बूटस्ट्रॅप अशा संख्याशास्त्रातील विविध क्षेत्रात त्यांचे लक्षणीय योगदान आहे.
संभाव्यता सिद्धांत व संख्याशास्त्र याचे हॉल हे अभ्यासू लेखक होते. त्यांचे ६०६ शोधनिबंध प्रसिद्ध झाल्याची नोंद आहे. जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित कॉप्स अध्यक्ष पारितोषिक मिळालेल्या उत्तर अमेरिकेबाहेरील तीन व्यक्तींमध्ये हॉल यांचा समावेश आहे. हॉल यांचा बूटस्ट्रॅप विश्वास अंतराळ यांची सैद्धान्तिक तुलना हा संख्याशास्त्राचे वार्षिक यामध्ये प्रसिद्ध झालेला शोधनिबंध संख्याशास्त्रातील महत्त्वाच्या शोधांचा संग्रह यामध्ये पुन्हा प्रसिद्ध करण्यात आला. हॉल यांनी लिहिलेली महत्त्वाची पुस्तके : Martingale Limit Theory and its Application; Rates of Convergence in the Central Limit Theorem; Introduction to the Theory of Coverage Processes आणि The Bootstrap and Edgeworth Expansion.
हॉल यांच्या सन्मानार्थ मेलबोर्न विद्यापीठाच्या गणित आणि संख्याशास्त्र विभागाच्या इमारतीचे पीटर हॉल असे नामकरण करण्यात आले.
हॉल यांना ऑस्ट्रेलियन गणिती सभेकडून पदक आणि केंब्रिज विद्यापीठाकडून रोलो डेव्हिडसन पारितोषिक मिळाले तर ऑस्ट्रेलियन संख्याशास्त्रीय सभेचे पिटमन पदक, ऑस्ट्रेलियन विज्ञान अकादमीचे हन्नन पदक, जॉर्ज स्झेकर पदक आणि गाय रौप्य पदक असे अनेक महत्त्वाचे सन्मान मिळाले. त्याशिवाय ऑस्ट्रेलियन विज्ञान अकादमी, अमेरिकन संख्याशास्त्रीय मंडळ, लंडनची रॉयल सोसायटी आणि ऑस्ट्रेलियन सामाजिक विज्ञान अकादमी या संस्थांमध्ये हॉल यांची अधिछात्र म्हणून निवड झाली होती.
संदर्भ :
समीक्षक : विवेक पाटकर