एरिझरी, राफेल : (१९७१ -) प्युरेतो रिको या देशात जन्मलेले, आणि आता अमेरिकन नागरिक असलेले गणितज्ञ एरिझरी हार्वर्ड येथील टी. एच. चान सार्वजनिक आरोग्य शाळेत जीवसंख्याशास्त्र आणि संगणितीय जीवशास्त्र विभागात, तसेच दाना-फार्बर कर्करोग संस्थेत प्राध्यापक आहेत.

एरीझरी यांनी रिओ पिद्रास येथील प्युरेतो रिको विद्यापीठातून त्यांची गणितातील स्नातक पदवी मिळवली आणि बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून संख्याशास्त्रातील पीएच्.डी. मिळवली. त्यांच्या प्रबंधाचे काम संगीतातील ध्वनी संकेतासाठी संख्याशास्त्रीय प्रारूप यावर होते. नंतर एरीझरी ब्लूमबर्ग सार्वजनिक आरोग्य शाळेत जीवसंख्याशास्त्र विभागात सहाय्यक म्हणून रुजू झाले आणि पुढे त्यांची तेथेच प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली.

त्यांच्या संशोधनाचा भर मुख्यत: जनुकीय विज्ञान (Genetics) व संगणितीय जीवशास्त्र यावर असून त्यांनी व्यष्टी रचनेची पूर्व प्रक्रिया आणि विश्लेषण, जनुकीय आधार सामग्री आणि जैवसंवाहक (Bio-conductor) अशा विषयांवर काम केले आहे. एरीझरी हे जैवसंवाहक प्रकल्पाचे संस्थापक व नेत्यापैकी एक आहेत. सध्या ते निदान उपकरणाचा विकास आणि जैविक खुणांचा शोध यामध्ये संशोधन करत आहेत. एफ्फी (Affy) सारख्या खुल्या स्रोत संगणक आज्ञावालींच्या विकासात एरीझरी यांची कळीची भूमिका आहे या संगणक आज्ञावालींचा वापर जैविक खूणा-शोधन या जनुकीय विश्लेषणासाठी महत्त्वाचा असून मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

संख्याशास्त्रीय सभांच्या अध्यक्षांच्या समितीने एरीझरी यांना तिचे अत्यंत सन्माननीय कॉप्स पदक मोर्टीमर स्पिगील्मन परितोषिक, अमेरिकन संख्याशास्त्रीय संस्थेचे नोएथेर तरुण हुशार संशोधक पारितोषिक, अमेरिकन संख्याशास्त्रीय संस्थेचे अधिछात्र आणि जीवशास्त्रातील योगदानासाठी बेंजामिन फ्रँकलीन पारितोषिक असे सन्मान प्राप्त झाले.

एरीझरी यांचे अनेक शोधलेख प्रसिद्ध झाले असून त्यांचा संदर्भ म्हणून जगभराचे अभ्यासक, संशोधक करीत असतात. त्यांची Data Analysis for the Life Sciences with R आणि Bioinformatics and Computational Biology Solutions Using R and Bio-conductor (Statistics for Biology and Health) हे इतर चार लेखकांसह लिहिलेले व अलीकडील Introduction to Data Science: Data analysis and Prediction-Algorithms with R (Chapman and Hall/CRC data science series) ही पुस्तके महत्त्वाची मानली जातात.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर