मलेशियातील प्रमुख शहर, देशाचे प्रशासकीय केंद्र आणि संघीय प्रदेश. लोकसंख्या ९१,९०० (२०१८). हे शहर मलेशिया द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात, क्वालालुंपुर या देशाच्या राजधानीपासून दक्षिणेस २५ किमी.वर वसलेले आहे. हे शहर वसविण्यापूर्वी मलेशियाची प्रशासकीय कार्यालये क्वालालुंपुरच्या आसमंतात विखुरलेली होती. दाट लोकवस्ती आणि वाढत्या वाहतूक कोंडीमुळे वेगवेगळ्या कार्यालयांतर्गतच्या संपर्कात, तसेच प्रशासकीय कामात अडथळा येत होता. ही अडचण दूर व्हावी म्हणून शासनाने सर्व कार्यालये एकाच ठिकाणी येतील या उद्देशाने हे शहर वसविले.

पुत्रजया शहर हे नियोजनबद्ध नगररचना असलेले शहर आहे. १९९५ पासून या शहराच्या विकासास सुरुवात झाली. देशाचे पहिले पंतप्रधान तुंकू अब्दुल रहमान पुत्र अल हज यांच्या नावावरून या शहरास पुत्रजया (पुत्र = मुलगा आणि जया = विजय) हे नाव देण्यात आले आहे. १९९९ मध्ये पंतप्रधान कार्यालय पुत्रजया येथे हलविण्यात आले; परंतु देशाची राजधानी क्वालालुंपुर येथेच ठेवण्यात आली असून संसदेची दोन्ही सभागृहे आणि पहिला राजप्रासाद तेथेच आहेत. २००१ मध्ये शहरास संघीय प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. पुत्रजया शहराचा विस्तार हळूहळू वाढत असून तेथे संघीय न्यायालय, दुसरा राजप्रासाद आणि इतर अनेक प्रशासकीय इमारती उभारल्या जात आहेत.

पूर्वीच्या रबर आणि तेल माड मळ्यांच्या जागेवर ‘उद्यान नगरी’ (गार्डन सिटी) म्हणून या शहराची उभारणी करण्यात आली आहे. तेथे विस्तृत असे नागमोडी वळणांचे मानवनिर्मित सरोवर असून बराचसा प्रदेश वनस्पती उद्यानांसाठी आणि आर्द्रभूमीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान कार्यालयाजवळील सरोवराच्या किनाऱ्यावर पुत्र मशीद (मस्जिद पुत्र) आहे. शहराच्या स्थापनेपासूनच क्वालालुंपुरच्या दक्षिणेस विस्तारलेल्या उच्च तंत्रज्ञानाधारित दळणवळण संशोधन व विकासक्षेत्राचा पुत्रजया शहर एक भाग बनला आहे. पुत्रजया शहर अनेक लोहमार्ग व रस्त्यांनी महत्त्वाच्या ठिकाणांशी जोडलेले आहे. शहरापासून जवळच क्वालालुंपुर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

समीक्षक : वसंत चौधरी