स्टर्टेव्हान्ट, आल्फ्रेड हेन्री : (२१ नोव्हेंबर १८९१ – ५ एप्रिल १९७०) आल्फ्रेड हेन्री स्टर्टेव्हान्ट यांचा जन्म अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील जॅक्सनव्हिल या गावात झाला. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी नैऋत्य अलाबामात सरकारी शाळेत प्रवेश घेतला.  १९०८ मध्ये त्यांनी कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. मोठा भाऊ एड्गर याने अमेरिकेतील इलिनॉय राज्यात त्यांना आनुवंशिकतेसारख्या आधुनिक विज्ञान विषयाकडे वळवले. आनुवंशिकतेच्या थोड्या अभ्यासानंतर आणि रेजीनाल्ड कृन्डल पनेट यांचे मेंडेलवादावरील लिखाण वाचून, आल्फ्रेडनी स्वतः पुढाकार घेऊन वडलांकडे असलेल्या घोड्याच्या वंशवृक्षाचा अभ्यास केला. त्या घोड्याची वंशावळ कागदावर चितारली. याच कृती त्यांनी कोलंबिया विद्यापीठात शिकताना स्वतःच्या कुटुंबासाठीही केल्या. थॉमस हंट मॉर्गन या ख्यातनाम प्रायोगिक प्राणीशास्त्रज्ञाने, कोलंबिया विद्यापीठात दिलेल्या एका व्याख्यान सत्रात, आल्फ्रेड विद्यार्थी म्हणून सहभागीही झाले होते.

एड्गरनी सुचविले की आल्फ्रेडनी केलेल्या घोड्याच्या वंशवृक्षाच्या अभ्यासातून, घोड्याच्या कातडीचा रंग आनुवंशिकतेने पुढील पिढ्यांना वारसा म्हणून कसा दिला जातो हे तपासावे. तसेच या वंशावळीची सर्व माहिती थॉमस हंट मॉर्गनना लिहून द्यावी. आल्फ्रेडनी एड्गरच्या सूचनेनुसार घोड्याच्या कातडीचा रंगाचा वारसा मेंडेलियन आनुवंशिकतेने कसा मिळतो यासंबंधी आपला अहवाल मॉर्गनना दिला. मॉर्गनना तो प्रयत्न उत्तम वाटला. बायॉलॉजिकल बुलेटीनमध्ये तो लेख छापूनही आणला. तसेच मॉर्गननी लवकरच स्वतःच्या छोट्याशा प्रयोगशाळेत काम करण्यासाठी आमंत्रण दिले.

आल्फ्रेडचे गुरु, मॉर्गन आणि आल्फ्रेड यांनी फळमाशी (Drosophila – ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर) या कीटकावर अनेक वर्षे प्रयोग केले. मॉर्गन यांची ही छोटीशी ४ x ६ मीटरची प्रयोगशाळा पुढे ‘फळमाशीचे दालन’ (fly room) या नावाने जगभरात प्रसिद्ध झाली. आल्फ्रेडना त्यांच्याबरोबर निवडलेल्या काल्व्हिन ब्लॅकमन ब्रिजेस आणि जोसेफ हर्मन मुलर यांच्यासह मॉर्गनचे तरूण सहकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या साहचर्यातून कालांतराने मॉर्गन यांच्या मार्गदर्शनाखाली आल्फ्रेडना पीएच्.डी. करता आली.

आल्फ्रेड यांचे बरेचसे काम पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील आहे. आर्थिक अडचणींवर मात करत आल्फ्रेडनी पीएच्.डी.चे काम संपवले. पीएच्.डी. नंतरही आल्फ्रेड कार्नेगी इन्स्टिट्यूट ऑफ वॉशिंग्टन यांच्यातर्फे संशोधक अन्वेषक या पदावर पण कोलंबिया विद्यापीठ संकुलातच कार्यरत राहिले. नंतर मुलर नवी नेमणूक स्वीकारून टेक्सास विद्यापीठात गेले परंतु ब्रिजेस आणि आल्फ्रेड कोलंबिया विद्यापीठातच राहिले. सात वर्षानंतर १९२८ मध्ये ते कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील अध्यापक गणात, पासाडीना, कॅलिफोर्निया येथे गेले. आयुष्याच्या अखेरपर्यंत आल्फ्रेड तेथेच आनुवंशिकताशास्त्राचे प्राध्यापक, संशोधक म्हणून काम करत राहिले. आल्फ्रेड इंग्लंड आणि जर्मनीमध्ये आमंत्रणावरून अतिथी अध्यापक म्हणून कार्नेगी एन्डाऊमेंट फॉर इंटरनॅशनल  पीसतर्फे व्याख्याने देण्यासाठी गेले होते.

आल्फ्रेडनी केलेले महत्वाचे संशोधन कार्य म्हणजे पेशीविभाजन होत असताना एखादे जनुक किंवा जनुके धारण करणारे गुणसूत्रखंड एका गुणसूत्राकडून अलग होऊन दुसऱ्या गुणसूत्राला चिकटू शकतात. वगळलेल्या किंवा भर पडलेल्या जनुकांमुळे अथवा जनुकाची जागा बदलल्यामुळे (position effect) जनुकांच्या आज्ञावलींनुसार प्रथिन निर्मितीवर परिणाम होऊ शकतो. अशा बदलांचे परिणाम दृश्य किंवा अदृश्य असू शकतात.

मेंडेल यांचा ‘सहलग्नता विसंयोजन’ नियम नेहमी पूर्णपणे लागू होत नसावा अशी कार्ल कॉरिन्स यांची समजूत होती. तिला पुष्टी देणारे पुरावे मॉर्गन आणि आल्फ्रेड यांनी एकत्र करायला सुरुवात केली. आल्फ्रेड यांनी दाखवून दिले की जनुके माळेतील मण्यांप्रमाणे एका रांगेत गुणसूत्रावर रचलेली असतात. आल्फ्रेडनी असा कयास बांधला की जी जनुके पिढ्यान् पिढ्या एकमेकांबरोबर राहतात आणि वंश परंपरेने एकत्रित पुढील पिढ्यांत जातात त्यांचे स्थान एकाच गुणसूत्रावर शेजारी असावे. एकाच गुणसूत्रावर, परंतु तुलनेने दूरस्थानी असणारी जनुके गुणसूत्र खंडित होऊन एकत्रित पुढच्या पिढीत जाण्याची शक्यता कमी, असा त्यांचा तर्क होता. त्यांचा हा सिद्धान्त त्यांनी फळमाशीवरील तीन घटकी – संकरच्या प्रयोगावरून सिद्ध केला. जी जनुके एकाच गुणसूत्रावर एकमेकांजवळ असतात ती बहुधा एकाच वेळी एकत्रितपणे पुढच्या पिढीत जातात. अशा जनुकांना सहलग्नता समूह (linkage group) म्हणतात.

आल्फ्रेड यांच्या कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीतील आनुवंशिकता शास्त्रातील संशोधक चमूत जॉर्ज बीडल, थिओडोसियस डॉब्झान्स्की, स्टर्लिंग इमर्सन, जॅक शुल्त्झ असे  विख्यात शास्त्रज्ञ होते. आल्फ्रेड यांनी त्यांचे गुरू मॉर्गन आणि सहाध्यायी, सहकारी बीडल, डॉब्झान्स्की, इमर्सन, शुल्त्झ, ब्रिजेस आणि मुलर यांच्याबरोबर डझनावारी संशोधनपर लेख अत्यंत प्रतिष्ठित जर्नल्समधून प्रकाशित केले. त्यांनी इतर सहकारी वैज्ञनिकांबरोबर व शिवाय अनेक स्वतंत्र पुस्तके लिहिली. घातक जनुकांवर (Lethal genes) काम केले असल्याने अणूयुद्धाच्या परिणामांची त्यांना जाणीव होती. अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्टस अँड सायन्सेस, नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे जॉन जे. कार्टी ॲवॉर्ड फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स, अमेरिकन सरकारचे नॅशनल मेडल ऑफ सायन्स देण्यात आले. फळमाशीची गुणसूत्रे आणि आनुवंशिकता, विशेषतः अर्धगुणसूत्री पेशीविभाजनातील लिंग सहलग्नता यासंबंधीच्या पथदर्शी संशोधनाबद्दलच्या कामाबद्दल हा सन्मान दिला गेला. १९८४ मध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याने सुरू केलेल्या मानवी जीनोम प्रकल्पाचा १५ फेब्रुवारी २००१ ला पहिला आराखडा नेचर या प्रतिष्ठित नियतकालिकात प्रकाशित झाला. तेव्हा अनेक ज्येष्ठ वैज्ञानिकांनी आल्फ्रेड स्टर्टेव्हान्ट, यांची आवर्जून आठवण काढली आणि कृतज्ञता व्यक्त केली.

ते पासाडीना, कॅलिफोर्निया  येथे कर्करोगाने निधन पावले.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.