टेमिन, हॉवर्ड मार्टिन : (१० डिसेंबर, १९३४ ते ०९ फेब्रुवारी, १९९४) अमेरिकेच्या पेनसिल्वेनिया राज्यातील फिलाडेल्फियामध्ये हॉवर्ड मार्टिन टेमिन यांचा जन्म झाला. हॉवर्ड यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण फिलाडेल्फियातील सरकारी शाळांत झाले. जीवशास्त्राच्या आवडीमुळे ते जॅक्सन लॅबॉरेटरी, बार हार्बर मेन आणि इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्च फिलाडेल्फिया येथे माध्यमिक शाळकरी विद्यार्थ्यांसाठीच्या उन्हाळी शिबिरांत भाग घेत असत. डेव्हिड बाल्टिमोरही या शिबिरांमध्ये विद्यार्थी म्हणून येत असत.
त्यांनी स्वार्दमोर विद्यापीठात जीवशास्त्र प्रमुख विषय असलेल्या अभ्यासक्रमात शिक्षण घेतले. पुढे कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पासाडीना, येथे अभ्यासासाठी प्रायोगिक भ्रूणशास्त्र हा विषय निवडला. कॅल्टेकमध्ये त्यांचा प्रा. मॅक्स डेलब्रुक आणि डॉ. मॅथ्यू मेसेलसनसारख्या विषाणुशास्त्राच्या शास्त्रज्ञांबरोबर परिचय झाला. प्रख्यात इटालियन शास्त्रज्ञ, प्रा. रेनातो दुल्बेको यांचे मार्गदर्शन मिळण्याची संधी होती म्हणून ते प्राणीविषाणूशास्त्राकडे वळले.
टेमिन यांनी राउस सार्कोमा विषाणूच्या (Rous sarcoma virus आरएसव्ही) जनुक संचाचा संक्रमित पेशींच्या जनुकांवर काय प्रभाव पडतो यावर संशोधन करून पीएच्.डी. मिळवली. वर्षभर ते दुल्बेको यांच्या प्रयोगशाळेतच पीएच्.डी.नंतरच्या अभ्यासवृत्तीवर राहिले. कॅल्टेकमधील हॅरी रुबिन या ज्येष्ठ पशुवैद्यकीय शास्त्रज्ञाने त्यांचे एक निरीक्षण टेमिनना सांगितले. ते म्हणजे एका आरएसव्हीपासून आठवड्याभरात कोंबड्यांच्या पेशींत हजारो आरएसव्ही तयार होतात. रुबिनने आणखी संशोधन करण्यासारखा हा विषय आहे हे सुचवून टेमिनचे लक्ष अर्बुदकारक आरएनए विषाणूंकडे वळविले. यामधून त्यांनी ‘राउस सार्कोमा व्हायरस’ या कोंबड्यांमध्ये अर्बुद निर्माण करणाऱ्या कर्करोगकारक विषाणूंवर, कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये संशोधन केले. नंतर युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन, मॅडिसनमधील मॅक् आर्डल मेमोरियल लॅबॉरेटरी ऑफ कॅन्सर रिसर्चमध्ये टेमिन विषाणूशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक पदी रुजू होण्यासाठी गेले.
अगदी जुजबी सोयी असलेल्या, संपूर्ण इमारतीसाठी गरम हवा खेळवणारे पाईपचे कोंडाळे असलेल्या, अडगळीच्या खोलीत टेमिननी प्रयोगशाळा स्थापली. तेथे त्यांनी जीवरसायन आणि ऊती संवर्धन क्षेत्रात संशोधन सुरू केले. त्यांच्याकडे फक्त दोन मदतनीस तंत्रज्ञ होते. तोकडे मनुष्यबळ आणि साधने असूनही पुढे नोबेल पारितोषिक मिळण्याच्या योग्यतेचे टेमिन यांचे बरेचसे संशोधन या प्रयोगशाळेत झाले. कालांतराने पदोन्नती मिळून टेमिन विषाणूशास्त्राचे सहप्राध्यापक आणि पुढे पूर्ण प्राध्यापक झाले. पुढे त्यांनी अमेरिकन कॅन्सर सोसायटीचे विषाणू कर्करोगशास्त्र आणि पेशी जीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक पद स्वीकारले. अखेरपर्यंत ते प्राध्यापक आणि संशोधक म्हणून विस्कॉन्सिन, मॅडिसनमध्येच कार्यमग्न राहिले.
आरएसव्हीमुळे प्राण्यांमध्ये कर्करोग कसा होतो याचे कारण शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आरएसव्ही विषाणूत आरएनए हे केंद्रकाम्ल असते. आरएनए एखाद्या अज्ञात पद्धतीने डीएनए निर्माण करते असा टेमिन यांचा अंदाज होता. टेमिननी असा अंदाज वर्तवला की आरएसव्हीमधील आरएनएपासून आश्रयी प्राणी पेशीला डीएनए तयार करण्यास भाग पाडतो. अशा पेशी सतत स्वतःचे डीएनए आणि आरएसव्ही विषाणूचे आरएनए निर्माण करील असे डीएनए, कोणत्याही नियंत्रणाला न जुमानता करतात. सतत पेशी विभाजन करतात. त्यामुळे पेशींची प्रचंड संख्यावाढ होते आणि अर्बुदे निर्माण होऊ शकतात. काही वेळा रक्तातील तांबड्या आणि श्वेतपेशींचे परस्पर प्रमाण बिघडून ल्युकेमिया हा रक्तकर्करोग होतो.
फ्रान्सिस क्रिक यांनी प्रस्थापित केलेल्या रेण्वीय जीवशास्त्रातील मूलभूत सिद्धांताप्रमाणे डीएनएतील माहितीनुसार आरएनए बनते हे ठाऊक होते. परंतु या मध्यवर्ती कल्पनेच्या विरुद्ध क्रिया म्हणजे आरएनएपासून डीएनए निर्मिती अशक्य आहे, असे अनेक आघाडीच्या वैज्ञानिकांनाही वाटे.
टेमिन यांनी वैयक्तिक हेटाळणीकडे लक्ष न देता संशोधन चालू ठेवले. हॉवर्ड टेमिन आणि डेव्हिड बाल्टिमोर यांनी आपल्या आरएनएपासून डीएनए निर्मिती होत असावी या अंदाजाला पुष्टी देणारे पुरावे प्रकाशित केले. त्यांना काही विषाणूत, विरुद्ध प्रतिलेखन करणारे (reverse transcriptase enzyme) विकर सापडले होते. त्यातून विषाणूतील आरएनएपासून आश्रयी प्राणी पेशीत सामावले जाईल असे डीएनए कसे तयार होते ते कळले. परिणामी आश्रयी प्राणीपेशी स्वतःचे डीएनए आणि आरएसव्ही विषाणू आरएनए निर्माण करील असा डीएनए कसा तयार करतात याचा उलगडा झाला.
अर्बुदकारक विषाणू आणि पेशीतील जनुकीय द्रव्य यांतील आंतरक्रिया – विशेषतः विरुद्ध प्रतिलेखन विकराच्या शोधाबद्दल हॉवर्ड टेमिन यांना नोबेल पुरस्कार दिला गेला. १९७५ सालचा शरीरक्रियाशास्त्र आणि वैद्यक विषयाचा, हा पुरस्कार टेमिनचे सहअध्यायी, सहकर्मी, आणि स्वतंत्रपणे हाच शोध लावणारे डेव्हिड बाल्टिमोर आणि या दोघांचे प्राध्यापक, रेनातो दुल्बेको ह्या तिघांना समान विभागून मिळाला.
आरएनएपासून डीएनए निर्मिती होऊ शकते हे पथदर्शी काम केल्यानंतर पुढेही दीर्घ काळ टेमिन युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन, मॅडिसन, येथे अध्यापक आणि संशोधक या नात्याने कार्यमग्न राहिले.
प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकांत टेमिन यांनी अनेक प्रबंधिका (मोनोग्राफ्स) आणि शोधनिबंध, लेख प्रकाशित केले. बायोकेमिस्ट्री, बायोफिजिक्स रिसर्च कम्युनिकेशन, व्हायरॉलॉजी, कॅन्सर रिसर्च, प्रोसीडिंग्ज ऑफ यूएस नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस – अशा प्रकाशनांचा त्यात समावेश होतो. एकंदर चौदा जर्नल्सच्या प्रकाशनात त्यांची मदत होई. जर्नल ऑफ सेल्युलर फिजिऑलोजी, प्रोसीडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस (PNAS), युएसए अशा विख्यात वैज्ञानिक नियतकालिकांच्या संपादकीय विभागात ते काम करीत. टेमिन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या विषाणू विभागाचे सदस्य होते.
टेमिन यांचे संशोधन सर्वज्ञात झाल्यावर त्यांना अनेक सन्मान, पुरस्कार, पदके मिळाली. त्यापैकी विशेष उल्लेख करण्यासारखी म्हणजे – वॉरेन ट्रायएनियल प्राईझ; पॅप ॲवार्ड ऑफ पॅपॅनीकोलौ इन्स्टिट्यूट, मायामी, फ्लोरिडा; एम. डी. अँडरसन हॉस्पिटल अँड ट्युमर इन्स्टिट्यूट, ह्युस्टन; टेक्सासचे द बर्टनर ॲवार्ड ; नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस – द युएस स्टील फाउंडेशन ॲवार्ड इन मॉलेक्युलर बायॉलॉजी; अमेरिकन केमिकल सोसायटी ॲवार्ड इन एन्झाइम केमिस्ट्री; ग्रिफ़्युएल प्राईझ – असोसिएशन डेव्हलपमेंट रिसर्च कॅन्सर, विलेजुएफ, फ्रान्स; अमेरिकन असोसिएशन फॉर कॅन्सर रिसर्चचे – जी.एच.ए. क्लाऊस ॲवार्ड. ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे (NIH) अनेक जनुकीय उपचार गटांचे सल्लागार आणि नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, यूएसएचे सदस्य होते. त्यांना बहुमानाचे अल्बर्ट लास्कर बेसिक मेडिकल रिसर्च ॲवार्ड मिळाले होते. अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्टस अँड सायन्सेसचे, तसेच नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, यूएसएचे ते सदस्य होते. ते जागतिक आरोग्य संघटनेचे सुद्धा सल्लागार होते. टेमिन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ युवा वैज्ञानिकांना नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटतर्फे हॉवर्ड टेमिन ॲवार्ड देण्यात येते.
विस्कॉन्सिन, मॅडिसन, अमेरिका येथे त्यांचा ॲडिनोकार्सिनोमा या धूम्रपानाशी संबंध नसणाऱ्या फुप्फुस कर्करोगाने मृत्यू झाला.
संदर्भ :
- https://www.nobelprize.org/prizes/medicine/1975/temin/biographical/
- https://www.nobelprize.org/uploads/2018/06/temin-lecture.pdf
- https://en.wikipedia.org/wiki/Howard_Martin_Temin
- https://royalsocietypublishing.org/doi/10.1098/rsbm.1995.0028
- https://www.nature.com/articles/2261211a0
समीक्षक : मोहन मद्वाण्णा