झिणझिणा पाकट (टॉर्पिडो सायनुस्पर्सिसी)

कास्थिमत्स्य (Chondrichthyes) वर्गातील चपट्या आकाराच्या माशांना पाकट (Ray fish) असे म्हणतात. शरीरामध्ये विद्युत निर्मिती करणाऱ्या पाकट माशास झिणझिणा पाकट किंवा झिणझिण्या असे म्हणतात. टॉर्पिडिनिफॉर्मिस (Torpediniformes) या गणातील पाकट माशांच्या समूहात झिणझिणा पाकट माशाचा समावेश होतो. पाकट माशांना गल्फ टॉर्पिडो (Gulf torpedo), मार्बल इलेक्ट्रिक रे (Marbled electric ray), क्रॅम्पफिश (Crampfish) आणि नम्बफिश (Numbfish) अशीही नावे आहेत. झिणझिणा पाकट माशाचे शास्त्रीय नाव टॉर्पिडो सायनुस्पर्सिसी (Torpedo sinuspersici) असे आहे.

टॉर्पिडिनिफॉर्मिस या गणामध्ये टॉर्पिडिनिडी (Torpedinidae), नार्सिनिडी (Narcinidae), नार्किडी (Narkidae) आणि हिप्निडी (Hypnidae) या कुलांचा समावेश होतो. या चारही कुलांमध्ये मिळून पाकट माशाच्याएकूण ६९ प्रजाती आहेत. पश्चिम हिंदी महासागर ते दक्षिण आफ्रिकेपर्यंत झिणझिणा पाकट विपुल प्रमाणात आढळतात. तसेच सोमालिया, तांबडा समुद्र आणि अरबी समुद्र येथेही ते प्रामुख्याने आढळतात. तुरळकपणे श्रीलंका, लक्षद्वीप आणि अंदमान बेटांच्या किनाऱ्यावर प्रवाळाच्या संगतीने १५० मीटर खोलीपर्यंत ते दिसतात. त्यांची वाढ ६० सेंमी. पर्यंत होते.

‘Torpere’ या लॅटिन भाषेतील ‘कठीण होणे किंवा अचेतन करणे’ अशा अर्थाच्या शब्दापासून टॉर्पिडो ‘Torpedo’ हा शब्द तयार झाला आहे. पाकट मासे हाताळल्यास किंवा चुकून त्याला स्पर्श झाल्यास जोराचा विजेचा धक्का बसतो. परिणामत: स्पर्श झाल्याच्या ठिकाणी झिणझिण्या येतात, तसेच तो भाग संवेदनाहीन होतो.

झिणझिणा पाकट (टॉर्पिडो सायनुस्पर्सिसी) : पश्च भाग

झिणझिणा पाकटाच्या शरीराची लांबी ३० सेंमी. ते २ मी. असते. याचा पृष्ठभाग गडद लाल, विटकरी ते काळ्या रंगाचा असून त्यावर परस्परात गुंतलेले पांढऱ्या किंवा फिकट सोनेरी रंगांचे पट्टे किंवा वर्तुळे असतात. त्यामुळे पाकट मासा चटकन ओळखता येतो. शरीर जाड व लवचिक असून त्वचा मऊ, गुळगुळीत व सुरकुतलेली असते. खवले पट्टिकाभ शल्क (Placoidscales) प्रकारचे असल्याने त्वचेवर दिसून येत नाहीत. सांगाडा कूर्चेने बनलेला (कास्थी) असल्याने मासे हाताला नरम लागतात. पृष्ठपर (Dorsal fins) मोठाले गोलाकार तसेच कोनाकार असतात. नार्सिनिडी कुलातील काही माश्यांमध्ये पृष्ठपर अविकसित असतात. पुढील रुंद बाजूला गोलाकार अंसपक्ष/स्कंध पर (Pectoralfins) असतात. डोके व विशाल स्कंध परांची जोडी मिळून डोक्याच्या खालच्या भागात स्कंध चकती (Pectoral disc) तयार झालेली असते. स्कंध परांच्या खालील बाजूला घेवड्याच्या बी सारख्या आकाराची विद्युत् अवयवांची (Electricorgans) जोडी असते. स्कंध चकतीच्यामधे विद्युत अवयव असतात. त्यांची रचना जटील स्नायूंपासून झालेली असते. नार्सिनिडी कुलातील माशांचे मुस्कट (Snout) विस्तृत, रुंद व मोठे असते. इतर कुलातील माशांचे मुस्कट तुलनेने लहान असते. स्कंध चकतीच्या खालच्या बाजूला तोंड (मुख), नाकपुड्या (Nostrils) आणि कल्ला विदराच्या (Gill slits) पाच जोड्या असतात. दणकट स्नायूमय शेपटाला पुच्छपर (Caudal fin) असते.

पाकट माशांमध्ये ८ ते २२० व्होल्ट एवढा विद्युत प्रवाह (Electric current) निर्माण करण्याची क्षमता आहे. प्रजातिनिहाय ही क्षमता भिन्न असते. याचा उपयोग भक्षाला अचेतन करणे तसेच संरक्षण यांसाठी केला जातो. टॉर्पिडिनिडी कुलातील पाकट मोठ्या भक्ष्यांना विद्युत प्रवाहाने अचेतन करून गिळंकृत करतात, तर नार्सिनिडी कुलातील पाकट छोट्या भक्ष्यांवर जगतात. या दोन्ही कुलातील पाकट संरक्षणासाठी विद्युत् प्रवाहाचा वापर करतात, परंतु नार्सिनिडी कुलातील पाकट पोषणासाठी विद्युत प्रवाहाचा वापर करतात अथवा नाही हे अद्याप नेमके ज्ञात नाही.

समुद्रात सुमारे १,००० मीटर (३,३०० फूट) खोलीवर पाकट मासे आढळतात. सहसा एकाच ठिकाणी बसलेले व इतर माशांप्रमाणे स्कंध परांचा वापर न करता शेपटीच्या साहाय्याने मंद हालचाल करताना आढळतात. त्यांचे पोषण छोटे मासे व झिंग्यांसारख्या अपृष्ठवंशीय संधिपाद प्राण्यांवर होते. वाळूखाली किंवा खडकाच्या वर किंवा खाली लपून ते भक्ष्याची वाट पाहतात. भक्ष्य दृष्टिक्षेपात आल्याबरोबर स्वनिर्मित विद्युत झटक्याचा उपयोग करून त्याला अचेतन करून पकडतात.

लहान झिणझिणा पाकट एकावेळी दोन पिलांना जन्म देतात; तर अटलांटिक महासागरातील झिणझिणा पाकट एकावेळी ६० पिलांना जन्म देतो. अंड्यांतून सरळ पिले बाहेर येतात. पिले काही काळ मादीच्या गर्भाशयात असतात.

वाळूखाली लपलेला झिणझिणा पाकट

पाकट माशांमध्ये डोळे आकाराने लहान असून ते डोक्याच्या वरच्या बाजूला असतात. यांची दृष्टी बेताचीच असली तरी ही उणीव इतर संवेदनांच्या वापराने भरून काढली जाते. पाकट आणि स्केट माशांच्या तुलनेत इतर कुलातील अनेक प्रजातींमध्ये विद्युत अवयव शेपटीच्या भागात असतात. मात्र झिणझिणा पाकटाचे विद्युत अवयव डोक्याच्या खालच्या बाजूला असतात. सभोवतालच्या पाण्यात अस्थिरता निर्माण झाली की हे मासे विद्युत अवयवांतून विद्युत निर्मिती करतात. मेंदूतील विद्युत भागांकडून (Electric lobes) येणारे चार मध्यवर्ती चेतातंतू (Central Nerves) विद्युत अवयवांवर नियंत्रण ठेवतात. मेंदूतील इतर भागांपेक्षा विद्युत भागांचा रंग वेगळा असतो. मेंदूतील प्रत्येक विद्युत भागांकडून विद्युत अवयवांकडे जाणाऱ्या मध्यवर्ती चेतातंतूचे सतत विभाजन व पुनर्विभाजन होत असते. स्कंध चकतीच्या आत विजेरी घटाप्रमाणे (Battery) रचना असून ती खालच्या भागाला जोडलेली असते. स्कंध चकतीतील विजेरी घट मधमाश्यांच्या पोळ्यांप्रमाणे षट्कोणाकृती स्तंभांपासून तयार झालेले असतात. प्रत्येक षट्कोणाकृती स्तंभांमध्ये ७० ते १४० लक्ष जीलेटिनच्या पट्ट्या असतात. सागरी माशांमध्ये हे विजेरी घट समांतर (Parallel circuit), तर गोड्या पाण्यातील माशांमध्ये एकसर (Series) जोडणीमध्ये जोडलेले आढळतात. ज्यामुळे सागरी मासे गोड्या पाण्यातील माशांच्या तुलनेत अति उच्च व्होल्टची निर्मिती करू शकतात. अशा विजेरीघटाच्या साहाय्याने सामान्यत: एक पाकट मोठ्या भक्ष्याला ५० ते २०० व्होल्ट तीव्रतेच्या विद्युत प्रवाहाने गलितगात्र करू शकतो. इतक्या तीव्रतेच्या विद्युत प्रवाहाने मोठी विद्युत उपकरणे संचलित केली जातात.

प्राचीन काळात ग्रीक लोक या माशांचा उपयोग प्रसूती व शल्य चिकित्सेच्या वेदनांची तीव्रता कमी करण्यासाठी तसेच संधिवात व डोकेदुखीवर करत असल्याचे उल्लेख आढळतात. टॉर्पिडो माशांचे विद्युत अवयव हे सुधारित स्नायू पेशींनी बनलेले असल्याने या माशांचा उपयोग चेताजीवशास्त्राच्या (Neurobiology) अभ्यासात केला जातो. झिणझिणा पाकट माशाचे आयुर्मान साधारण १६ ते २८ वर्षांचे असते.

पहा : पाकट (प्रथमावृत्ती नोंद), रे मासे (प्रथमावृत्ती नोंद), विद्युत अंगे (प्रथमावृत्ती नोंद).

संदर्भ :

  • https://www.britannica.com/animal/electric-ray
  • https://en.wikipedia.org/wiki/Gulf_torpedo
  • https://en.wikipedia.org/wiki/Electric_ray

समीक्षक : नंदिनी देशमुख