बाळ, दत्तात्रय वामन : ( २५ ऑगस्ट १९०५ – १ एप्रिल १९९९ )

द. वा. बाळ यांचे पुस्तक

दत्तात्रय वामन बाळ यांचा जन्म दापोली तालुक्यातील लाडघर येथे झाला. दापोली मधील शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी बाळ मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात आले. रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून प्राणीशास्त्रातील पदवी आणि नंतर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. रॉयल इन्स्टिट्यूटचे नामांतर आता विज्ञान संस्था असे झाले आहे. त्यानंतर इंग्लंडमधील लिव्हरपूल विद्यापीठातून त्यानी मत्स्यविज्ञानातील पीएच्.डी. मिळवली. पीएच्.डी. करत असताना दुसऱ्या महायुद्धामुळे त्यांना खडतर प्रसंगांचा सामना करावा लागला.

इंग्लंडहून परतल्यावर १९४४ ते १९४७ या कालावधीत त्यांनी रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राणीशास्त्र विभागप्रमुखाची जबाबदारी सांभाळली. १९४७ ते १९५१ च्या दरम्यान त्यांनी मत्स्य आणि मत्स्यविज्ञान सर्वेक्षण अधिकारी म्हणून भारत सरकारच्या अन्न आणि शेतकी मंत्रालयात ते रुजू झाले. त्यानंतर मात्र पुन्हा त्यांनी रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे प्राणीशास्त्र विभागप्रमुखाचे पद स्वीकारले. १९५६ ते १९६४ या कालावधीत डॉ. बाळ रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे संचालक होते. विद्यार्थी ते संचालक अशी पस्तीस वर्षे त्यांचा विज्ञान संस्थेशी संबंध आला होता. सागरी विज्ञान आणि मत्स्यशास्त्र या दोन्ही विषयात त्यांनी संशोधन व लेखन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी संशोधनातून पदव्युत्तर व सुमारे ४० विद्यार्थ्यांनी पीएच्.डी. पदवी मिळवली  आहे.

मुंबईच्या किनारपट्टीवर असणाऱ्या मत्स्य साठ्यांची सखोल माहिती त्यांनी संशोधनाने उपलब्ध करून दिली. यामुळे भारत सरकारच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेत सागरी मत्स्यविषयक धोरण राबवणे आणि विकास आराखडा तयार करणे शक्य झाले. केंद्रीय समुद्री मत्स्यकीय संशोधन संस्थेच्या सागरी मत्स्य सर्वेक्षण विभागाची रचना केल्यामुळे आजमितीला सरकारला मत्स्यविषयक धोरणे राबवणे सोपे झाले आहे.

इंडियन सायन्स काँग्रेसच्या १९५४ साली झालेल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी मत्स्यविज्ञान विषयक संस्थेच्या उभारणीची मागणी केली. महाराष्ट्राचा सागरी किनारा आणि मत्स्योद्योगाची परंपरा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या लक्षात आणून दिल्याने मुंबईमध्ये १९६१ साली केंद्रीय मत्स्यविज्ञान शिक्षण संस्थेची (सी.आय.एफ.ई – सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन) स्थापना झाली. या संस्थेच्या संस्थापक-संचालक पदी त्यांची १९६१ साली नेमणूक झाली. ही संस्था आता मत्स्यविज्ञान शिक्षण देणाऱ्या भारतातल्या एकमेव विद्यापीठामध्ये परिवर्तित झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या औरंगाबाद येथील विज्ञान संस्थेची पायाभरणी दत्तात्रय बाळ यांच्यामुळेच झाली आहे. सरकारी केंद्र आणि राज्य स्तरावर अनेक समित्यांचे त्यानी सदस्यत्व भूषवले आहे. बाळ यांच्या विद्यार्थांमुळे मत्स्यवैज्ञानिकांची पुढची पिढी तयार झाली. स्वातंत्र्योतर भारतात मत्स्यविज्ञान आणि सागरी विज्ञान या विषयांची मुहूर्तमेढ करणारे म्हणून बाळांचे कार्यमोठे आहे. मरीन फिशरीजवरील डी. व्ही. बाळ व के. व्ही. राव यांचे पुस्तक टाटा मॅकग्रॉ हिल या ख्यातनाम प्रकाशकानी प्रसिद्ध केले आहे. १९९३ साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने द. वा. बाळ व नंदिनी देशमुख यांचे महाराष्ट्रातील सागरी मत्स्यसंपत्ती  हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. १९८६ साली कोकणातील जैतापूर येथे भरलेल्या एकविसाव्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाचे दत्तात्रय बाळ अध्यक्ष होते.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा