गेमलेआ, निकोलाय फ्योदरेरिच : (१७ फेब्रुवारी १८५९ – २९ मार्च, १९४९) निकोलाय फ्योदरेरिच गेमलेआ यांचा जन्म रशियन साम्राज्यातील ओदेसा येथे झाला. गेमलेआ त्यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण ओदेसा येथील नोवोरोसिस्की विद्यापीठातून (सध्याचे ओदेसा विद्यापीठ) पूर्ण केले. तेथे विद्यार्थीदशेत असतांना जीवशास्त्राकडे त्यांचा ओढा अधिक होता. इल्या मेचनिकाव्ह हे त्यांचे शिक्षक होते. सुट्टीत ते स्ट्रासबर्ग येथे गेले असतांना होप्पे-सेलर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जैवरसायनशास्त्राचा अभ्यास केला. नंतर त्यांनी सेंट पीटर्सबर्ग सैनिकी वैद्यकीय अकादमीमधून (सध्याची एस. एम. किरो सैनिकी वैद्यकीय अकादमी) डॉक्टर झाले. डॉक्टर म्हणून ते ओदेसा येथे परतले आणि त्यांनी आपल्या घरातच जिवाणूशास्त्राची प्रयोगशाळा उभी केली.
पाश्चर यांनी जेव्हा रेबीजचा रुग्ण लस देऊन बरा केला तेव्हा गेमलेआ यांना त्या विषयात रुची निर्माण झाली. रेबीज हा रोग पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे होणारा विषाणूजन्य रोग आहे. या रोगाला हायड्रोफोबिया असे देखील म्हणतात. ओदेसा डॉक्टर संघटनेने रेबीजच्या लसीकरणाचे तंत्र समजून घेण्यासाठी त्यांना पाश्चर यांच्या प्रयोगशाळेत पाठवले. त्यांचे सातत्य, उत्सुकता, वैद्यकीय ज्ञान आणि सूक्ष्मजीवशास्त्रीय तांत्रिक प्रशिक्षण यामुळे रेबीज लसीकरणाचे तंत्र त्यांनी आत्मसात केले. पाश्चर यांच्या या तंत्राला अनेक शास्त्रज्ञांचा जरी विरोध असला तरी त्यांचा पाश्चर यांच्याशी असलेला सहवास, सर्जनशील सहकार्य आणि वैयक्तिक मैत्री जास्तीच घनिष्ट होत गेली. इंग्लंडमध्ये या लसीकरण तंत्राला विरोध झाला तेव्हा पाश्चर यांनी गेमलेआ यांनाच त्यांचे समर्थन करण्याची विनंती केली होती. रेबीजच्या विरोधात तयार केलेली लस गेमलेआ यांनी स्वतःलाच टोचून घेतली आणि ती सुरक्षित असल्याचा दावा केला.
पॅरिसनंतर जगातील जिवाणूशास्त्राची दुसरी प्रयोगशाळा ओदेसा येथे इल्या मेचनिकाव्ह आणि गेमलेआ यांच्या प्रयत्नाने प्रस्थापित करण्यात आली. या ठिकाणी रेबिजचे लसीकरण पाश्चरपद्धतीने यशस्वीरित्या करण्यात आले. गेमलेआने यात काही मूलभूत अशा सैद्धांतिक आणि प्रयोगिक सुधारणा केल्या आणि मोठ्या प्रमाणात हे लसीकरण केले.
जिवंत विषाणूचे द्रावण तयार करतांना गेमलेआच्या असे लक्षात आले की रेबीज लशीची परिणामकरकता ही त्याच्यातील विषाणुंच्या संख्येवर अवलंबून आहे. जेवढी संख्या जास्त तेवढी परिणामकारकता जास्त. म्हणून त्यांनी कुत्र्याच्या मेंदूच्या पेशी कमी प्रमाणात वाळवून त्यापासून लस तयार केली. त्यांनी असाही शोध लावला की लस टोचल्यावर मिळणारी रोगप्रतिकारक शक्ती ही दीर्घकाळ टिकणारी नसते. त्यांच्या असेही लक्षात आले की रोग्यात प्रत्यक्ष रोगाची लक्षणे दिसू लागल्यावर किंवा संक्रमणाच्या सुप्त कलावधीत (म्हणजे जंतूंचा शरीरात प्रवेश झाल्यापासून ते लक्षणे दिसेपर्यंतचा कालावधी. रेबीजमध्ये हा कालावधी १४ दिवसांचा असतो) ही लस टोचली तर ती परिणामशून्य ठरते.
रेबीजच्या लशीचे अपयश शोधून काढण्यासाठी त्यांनी सैद्धांतिक आणि प्रायोगिक पातळीवर सखोल संशोधन केले, त्याची कारणमीमांसा केली आणि तीव्रतर पद्धती विकसित केली. या पद्धतीला पाश्चरने संमती दिली आणि गंभीर स्वरूपाच्या रोग्यांमध्ये ती पद्धती वापरायला सुरुवात देखील झाली. गेमलेआचे लकवा रेबीज (Paralytic Rabies) च्या क्षेत्रातील कार्य वाखाणण्यासारखे आहे. पाश्चरने आपल्या एका पत्रात Keen ‘appreciation for your rare services’ असा गेमलेआच्या कामाचा उल्लेख केला आहे.
सन १९८० साली गेमलेआ याने सैबेरियन प्लेग म्हणजेच अँथ्रॅक्स या रोगासाठी लस तयार केली. १८८७ साली त्यांनी आजारी पक्ष्यांच्या आतड्यातून व्हिब्रिओचे जीवाणू शोधून काढले. त्याला त्यांनी मेचनिकाव्ह जीवाणू असे नाव दिले. या जिवाणूच्या अभ्यासातूनच पुढे कॉलरावर बरेच वर्ष संशोधन झाले. १८८३ साली मेचनिकाव्ह यांनी रोगप्रतिकारक शक्तीसाठी शरीरातील परपदार्थ भक्षण सिद्धांत (Phagocytosis) मांडला होता. या सिद्धांताचा आधार घेऊन गेमलेआने अँथ्रॅक्ससाठी रोगप्रतीकरक शक्ती कशी कार्य करते याचा अभ्यास सुरू केला. अँथ्रॅक्स लसीचे विविध प्राण्यांवर प्रयोग केल्यावर असे लक्षात आले की लसीकरण झाल्यावर येणारा ताप आणि शरीरात तयार होणारी प्रतिपिंडे यांचा एकमेकांशी संबंध आहे.
सूज आणि मानवी शरीरात जंतूंचा नाश कसा होतो या घटनांचा त्यांनी पाश्चर यांच्या प्रयोगशाळेत अभ्यास केला. त्यांचा असा विश्वास होता की शरीरात जंतूंचा प्रवेश झाल्यावर दोन घटक कार्यरत होतात. एक म्हणजे शरीरातील नैसर्गिक द्रवपदार्थांच्या मार्फत मिळणारी रोगप्रतिकारशक्ती (Humoral) आणि दुसरी आहे पेशींच्या मार्फत मिळणारी रोगप्रतिकारशक्ती (Cellular). या संशोधनामुळे रोगप्रतिकारशक्तीसंबंधी नवीन संकल्पना उदयाला आली.
साधारण ६ वर्षे फ्रांसमध्ये पाश्चर यांच्या प्रयोगशाळेत घालवल्यावर गेमलेआ रशियात परतले. त्यांनी कॉलरावर संशोधन सुरू केले. त्यांनी ‘The etiology of Cholera from the point of view of Experimental Pathology’ या विषयात डॉक्टरेट मिळवली. कॉलरा हे त्यांच्या संशोधनाचे महत्त्वपूर्ण अंग बनले. या विषयावर त्यांनी Foundations of general Bacteriology नावाचे पुस्तक लिहिले. कर्करोगाचा उगम विषाणूत असतो असे गृहीतक त्यांनी या पुस्तकात प्रथमच मांडले. पुढे मेचनिकाव्ह यांनी या गृहीतकाचे समर्थन केले.
कॉलरा रोग हा व्यक्ती-व्यक्तीतील संपर्काद्वारा पसरतो असा समज गेमलेआ यांनी चुकीचा ठरवला. त्याच्या प्रसाराचे खरे कारण अस्वच्छतेत आहे, साचलेल्या पाण्यात आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. यासाठी त्यांनी दाट वस्तीतील स्वच्छतेचे निरीक्षण केले. कॉलऱ्याच्या रोगप्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम यशस्वी करून १९२० साली त्यांनी रशिया कॉलरामुक्त केला.
गेमलेआ यांचे जिवाणूशास्त्रातील सर्वात ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण संशोधन म्हणजे ब्युबॉनिक प्लेगच्या विरोधात त्यांनी दिलेला लढा. १९०२ साली ओदेसा येथे प्लेगच्या महामारीचा उद्रेक झाला. या रोगप्रसाराचे त्यांनी सैद्धांतिक पातळीवर कारण शोधून काढले. नंतर त्यांनी त्यावर काही प्रयोगिक उपायदेखील शोधून काढले. हा भयंकर रोग आटोक्यात आणण्यासाठी त्यांचे हे उपाय महत्त्वपूर्ण ठरले. ब्युबॉनिक प्लेगच्या रोगपरिस्थितीविज्ञानाचा त्यांनी अभ्यास केला आणि हा रोग करड्या रंगाच्या उंदरावरच्या पिसवांमुळे फैलतो हे सिद्ध केले. प्लेगच्या निर्मूलनाची मोहीम त्यांनी रशियात राबवली. उंदरांचा विनाश विषाचा वापर करून तसेच पॅराटायफॉइड प्रजातीच्या जंतूंचा वापर करूनदेखील करता येईल असा त्यांनी सल्ला दिला होता.
सन १८७४ साली जी. एन. मिंख या वैद्याने टायफसच्या रोग्याचे रक्त स्वतःच्या शरीरात टोचून घेतले आणि हा रोग संसर्गजन्य असल्याचे सिद्ध केले. हा रोग उवांमार्फत पसरतो हे त्याने सिद्ध केले. उवांचा नाश कोरड्या उष्णतेने शक्य असून रसायनाने शक्य नाही, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी टायफस रोग आटोक्यात आणण्यासाठी रशियात धुरी देण्याच्या कार्यक्रमास आरंभ केला. १९१२-१९२८ या काळात रशियात देवी या रोगाचा उद्रेक झाला. देवी लसीकरण संस्थेचे ते निदेशक या नात्याने त्यांनी देवीची लस शुद्ध स्वरुपात मिळवण्याच्या पद्धती विकसित केल्या. गेमलेआ यांनी १८८६ साली सांगून ठेवले होते की, जिवाणू गाळणीतून गाळले जाणारे विषाणू हे विविध रोगांना करणीभूत असतात.
गेमलेआ हे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबायोलॉजी अँड एपिडेमिऑलॉजीचे दोन वर्षे निदेशक होते. सध्या ही संस्था त्यांच्या नावाने ओळखली जाते. सेकंड मॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीनच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे ते प्रमुख होते; ते ऑल युनियन सोसायटी ऑफ मायक्रोबायोलॉजी, एपिडेमिऑलॉजी अँड इन्फेक्शनिस्ट या संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष होते.
त्यांनी ३५० च्यावर शोधनिबंध प्रसिद्ध केले. १०० च्यावर मूलभूत संशोधने आणि जंतूंचे सखोल असे विश्लेषणात्मक अभ्यास केले.
त्यांना लेनिन ऑर्डर, ऑर्डर ऑफ द रेड बॅनर ऑफ लेबर आणि स्टेट स्टॅलिन प्राइज देऊन सन्मानित करण्यात आले होते. ॲकॅदमी ऑफ सायन्स ऑफ युएसएसआर आणि युएसएसआर ॲकॅदमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे ते सदस्य होते.
त्यांचा मॉस्को येथे मृत्यू झाला.
संदर्भ :
- https://www.encyclopedia.com/science/dictionaries-thesauruses-pictures-and-press-releases/gamaleya-nikolay-fyodorovich
- https://en.wikipedia.org/wiki/Nikolay_Gamaleya#:~:text=3%20Further%20reading-,Biography,
- https://prabook.com/web/nikolay.gamaleya/737886
समीक्षक : मुकुंद बोधनकर