बरील, थॉमस जोनाथन (२५ एप्रिल, १८३९ – १४ एप्रिल, १९१६ ) थॉमस जे. बरील यांचा जन्म पिट्सफिल्ड, मॅसॅच्युसेट्स येथे झाला. लहानपणी थॉमस बरील त्यांच्या वडलांना शेती कामात मदत करत असत व हिवाळ्यात काही महिने शाळेत जात असत. पुढे रॉकफोर्ड माध्यमिक शाळेत शालेय शिक्षण संपवून इलिनॉईस स्टेट नॉर्मल युनिव्हर्सिटी येथून थॉमस यांनी पदवी प्राप्त केली. त्यांचे वनस्पतीशास्त्राचे शिक्षक डॉ. जे. ए. सेवाल यांच्यापासून त्यांना सतत प्रेरणा मिळत होती.

थॉमस यांना सुरुवातीला अर्बना पब्लिक स्कूलचे अधीक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. या काळातला बराचसा मोकळा वेळ त्यांनी तेथील वनस्पती अभ्यासण्यासाठी उपयोगात आणला. तीन वर्षानंतरच्या उन्हाळयात कोलोरॅडो येथील ग्रँड कॅन्यन व तेथील परिसर येथील संशोधन करण्यासाठी वनस्पतीतज्ञ म्हणून मेजर जॉन डब्ल्यू. पॉवेल यांच्यासोबत जाण्यासाठी थॉमस यांची निवड झाली. त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांना इलिनॉईस इंडस्ट्रियल युनिव्हर्सिटी (आताची युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉईस, शॅम्पेन, अर्बना) येथून बोलावण्यात आले व निसर्गाचा इतिहास व वनस्पतीशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. पुढे दोन वर्षांनंतर त्यांना वनस्पतीशास्त्र व उद्यानविद्येच्या प्राध्यापकपदी बढती देण्यात आली. पुढील ३३ वर्षे ते वनस्पतीशास्त्र व उद्यानविद्येच्या प्राध्यापकपदी राहिले मधली सहा वर्षे ते कॉलेज ऑफ सायन्सचे अधिष्ठाता होते आणि कॉलेजातून निवृत्त झाल्यानंतर ते तहहयात प्रोफेसर इमेरिटस म्हणून राहिले. युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉईस मधील बरीचशी झाडे त्यांनी स्वतःच्या हाताने लावली होती. तसेच त्यांनी वनस्पतीचे नैसर्गिक नमुने गोळा करण्यासाठी एक गट तयार केला होता.

थॉमस यांचे सर्वात मोठे योगदान वनस्पती रोगविज्ञानशास्त्रामध्ये होते. वेगवेगळ्या वनस्पतींची इलिनॉईसच्या वातावरणातील वाढ अभ्यासण्यासाठी त्यांनी वृक्षारोपणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. २० एकर जागेवर वृक्षारोपण केले, त्यामध्ये एकट्या सफरचंदाची १४०० वाणे होती. त्यातल्या त्यात रोगट वनस्पतींसंदर्भातील सूक्ष्मबुरशीच्या अभ्यासाबद्दल त्यांना विशेष आवड निर्माण झाली.

वर उल्लेख केल्याप्रमाणे थॉमस बरील यांना पिअर ब्लाईट या वनस्पती रोगाबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. त्यांना असे जाणवले की हा जिवाणूजन्य रोग आहे. प्राण्यांमध्ये जरी जिवाणूजन्य रोग हे सामान्यपणे आढळत असले तरी वनस्पतींमध्ये असे जिवाणूजन्य रोग ज्ञात नव्हते. त्यांनी वनस्पतींच्या ऊतींमध्ये जिवाणू असल्याचे सांगितले. थॉमस यांनी रोगट वनस्पतीमधील वनस्पतीद्रव्य हे निरोगी वनस्पतीमध्ये सोडून रोग प्रक्षेपित होतो हे दाखवून दिले. शेवटी त्यांनी हे सिद्ध केले की वनस्पतींमध्ये जिवाणुंमुळेच रोग झाला व तो जिवाणूसुद्धा त्यांनी ओळखला. तो जिवाणू होता मायक्रोको अमायलोवॊरस (Micrococcus amylovorus). त्याचे हे सर्व निष्कर्ष त्यांनी इलिनॉईस इंडस्ट्रियल युनिव्हर्सिटीच्या अहवालामध्ये आणि अमेरिकन नेचरलिस्ट्समध्ये प्रकाशित केले.

सुरुवातीला त्यांनी ज्वारी आणि मका यांच्यावर पडणार्‍या जिवाणूजन्य रोगाचा अभ्यास केला. नंतर त्यांनी स्वतःला वनस्पती वर्गीकरणाच्या कामात झोकून दिले आणि इलिनॉईसमधील क्रिप्टोजेनिक वनस्पतींबद्धल, म्हणजेच अशा वनस्पती की ज्यांचा उगम माहिती नाही, त्यावर एक पुस्तक प्रकाशित करायचे ठरवले. मात्र ते हे काम पूर्ण करू शकले नाहीत, कारण विद्यापीठाचा प्रभारी अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली व त्यामुळे प्रशासकीय कामातच त्यांचा बराचसा वेळ गेला. पण तरीही त्यांनी दोन प्रबंध लिहिले. दोन्हीही प्रबंध हे बुरशीच्या अभ्यासातील उत्तम साहित्य ठरले. थॉमस बरील यांनी विविध वनस्पतिरोगांवर प्रचंड संशोधन केले.

शिकागो विद्यापीठ, नॉर्थवेस्टर्न विद्यापीठ, इलिनॉईस विद्यापीठ यांनी त्यांना मानद डॉक्टरेट, एल. एल. डी. पदव्या प्रदान केल्या. वेगवेगळ्या वैज्ञानिक संस्थांकडूनही त्यांना बरेच सन्मान प्राप्त झाले. त्यात, नॅशनल बॅक्टेरिऑलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष, अमेरिकन मायक्रोस्कोपी सोसायटीचे अध्यक्ष होते. निवृत्तीनंतर ते शेंगवर्गीय (leguminous) वनस्पती आणि जिवाणू यांच्या सहजीवनावरील संशोधनात मग्न झाले.

थॉमस बरील यांच्याविषयी आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या जीवशास्त्राच्या प्रयोगशाळेत कंपाऊंड मायक्रोस्कोपचा वापर करणारे ते पहिल्या अमेरिकन वनस्पतीशास्त्रज्ञांमधील एक होते. तसेच अमेरिकन विद्यापीठामध्ये जिवाणूविषयक प्रयोगशाळा उभारणारे ते पहिले वनस्पतीतज्ञ होते आणि वनस्पतीच्या रोगाबद्दल सातत्याने लिहिणार्‍या  अशा दोन-तीन अमेरिकन लेखकांपैकी ते एक होते.

इलिनॉईस, अर्बाना येथे थॉमस बरील यांचे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.