कॉर्टी, अल्फान्सो : (२२ जून १८२२ – २ ऑक्टोबर १८७६) अल्फान्सो कॉर्टी यांचे पूर्ण नाव अल्फान्सो जॅक्मो गॅस्पार कॉर्टी असे होते. त्यांचा जन्म एकेकाळच्या सार्वभौम साम्राज्यातल्या, इटालीच्या वायव्येकडील सार्डिनीया येथे झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण इटालीतील, पविया येथे झाले असावे. तेथेच त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. बार्तोलोमिओ पॅनिझ्झा यांनी त्यांना सूक्ष्मदर्शक कसा वापरावा हे शिकवले. त्या काळी पॅनिझ्झा पविया येथील मानवी शरीररचना शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय कॉलेजमधील प्राध्यापक होते. मॉरो रूस्कॉनी शिक्षणाने डॉक्टर आणि आवड म्हणून प्राणीशास्त्रज्ञ होते. त्यांच्याकडून कॉर्टी यांनी शरीरविच्छेदनातील कौशल्य मिळविले.

रूस्कॉनी यांच्यामुळे कॉर्टी यांना प्राण्यांच्या तुलनात्मक शरीररचना अभ्यासाची आवड निर्माण झाली. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा विरोध असूनही ते व्हिएन्ना विद्यापीठात जाऊन वैद्यकीय अभ्यास करत राहिले. तसेच वेगवेगळ्या दवाखान्यांत वैद्यकीय सेवा देत राहिले. त्याच काळात जोसेफ हिर्टल यांच्याकडे त्यांनी मानवी शरीररचनेचा आणखी तपशीलवार अभ्यास केला. त्यांना हिर्टल यांच्या मार्गदर्शनाखाली, एम. डी. ही पदव्युत्तर पदवी मिळाली. एम. डी. साठी त्यांनी सादर केलेल्या प्रबंधाचे शीर्षक होते ‘द सिस्तिमाते वासोरम साम्मोसॉरी ग्रीसी’ (De systemate vasorum Psammosauri grisei). हा प्रबंध घोरपडीच्या रक्ताभिसरण संस्थेच्या रचनेबद्दल होता. प्रबंधातील सर्व आकृत्या त्यांनी स्वतःच काढल्या होत्या.

एकोणिसाव्या शतकातील कॉर्टी या जीवशास्त्रज्ञानी मानवी शरीरातील इंद्रियाची सूक्ष्म रचना शोधून काढण्यात मदत केली. खरेतर त्यांच्या संशोधन कामाची सुरुवात सरीसृप वर्गातील (सरपटणाऱ्या) प्राण्यांच्या रक्ताभिसरणापासून झाली. परंतु नंतर त्यांचा कल मानवी शरीराचा अभ्यास करण्याकडे झुकला.

त्यांचे सर्वात प्रसिद्ध काम म्हणजे कानाचा आतील गोगलगायीच्या शंखासारखा भाग- कर्णावर्त रचना (कॉक्लिआ cochlea). कर्णावर्ताच्या आंतरपृष्ठ पेशींवर सूक्ष्म रोमक असतात. ध्वनिलहरीमुळे त्यांच्याभोवती असलेल्या द्रवामध्ये झालेल्या बदलामुळे पेशीच्या तळाशी जोडलेल्या चेतापेशीमध्ये आवेग निर्माण होतात. हे आवेग श्रवण केंद्रात पोहोचले की आपल्याला ऐकू येते. हे कॉर्टी यांच्या संशोधनामुळे समजले.

ते प्राण्यांच्या शरीरातून अभ्यासासाठी अवयव, त्यांचे छोटे तुकडे किंवा काप काढून घेत. ते कारमिन या रंगद्रव्याने रंगवत. अशा छेदाच्या सूक्ष्मदर्शकाखाली केलेल्या निरीक्षणातून त्या अवयवाच्या व पेशींचा अभ्यास केला जात असे.

जोसेफ हिर्टल यांचे काम त्यांच्या नंतर कॉर्टी यांनी करावे अशी हिर्टल यांची इच्छा होती. तशी जबाबदारी त्यांच्याकडे येणारही होती. परंतु सार्डिनीया आणि ऑस्ट्रियात युद्ध सुरु झाल्यामुळे तेथील काम कॉर्टीना सोडून द्यावे लागले. ते झुरीकमार्गे व्हिएन्नामधून तुरीन येथे परत आले. नंतर बर्न या स्वित्झर्लंडच्या राजधानीत आले. तेथे प्रख्यात शरीर क्रियाशास्त्रज्ञ, गुस्ताव गॅब्रिएल व्हॅलेन्टीन यांनी त्यांना सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने समजलेल्या सूक्ष्म रचनेचा अभ्यास वेळोवेळी प्रकाशित करा असा सल्ला दिला. कॉर्टी यांचा त्याकाळातील जेम्स पॅजेट, रिचर्ड ओवेन, थॉमस व्हार्टन जोन्ससारख्या अग्रगण्य सूक्ष्मशरीररचना अभ्यासकांशी संपर्क होता. जानेवारी पुढे, कॉर्टी दक्षिण-मध्य जर्मनीत, वुर्झबर्ग येथे आल्बर्ट कॉलायकर यांच्याकडे ऊतीशास्त्र शिकण्यासाठी आले. दोन महिन्यात त्यांनी या ज्ञानशाखेत सैद्धांतिक प्राविण्य आणि प्रायोगिक कृतींचे कौशल्य मिळवले.

कॉर्टी यांनी दृष्टिपटलाच्या (retina) संवेदी पेशी-शंकू आणि दंड पेशी दृष्टिचेतना  जोडलेल्या असतात हे दाखवले. पूर्वी ए. एच. हॅसल यांनी अशा जोडणीचा अंदाज वर्तवला होता. परंतु प्रत्यक्ष निरीक्षणाने पुष्टी देणे कॉर्टी यांच्या सूक्ष्मदर्शकीय कौशल्यामुळे शक्य झाले. कॉर्टी यांनी बेडकांच्या भ्रूणांच्या अन्नमार्गातील अपिस्तर ऊतींच्या पेशीवर बारीक केस (रोमक – cilia) असतात. ते अन्नमार्गात असणारे पदार्थ बाहेर फेकण्यास मदत करतात हे शोधून काढले. स्नायूपेशी निर्माण होण्यापूर्वी अन्नमार्गाचा क्रमसंकोच शक्य नसताना टाकाऊ घन पदार्थ कसे विसर्जित केले जात असतील याचे ज्ञान त्यांच्या शोधापूर्वी कोणालाच नव्हते. फिजिकॅलिश मेडीझीनेश्केन जेशेलशॅफ्ट या वैज्ञानिक नियतकालिकात कॉर्टी यांचे संशोधन प्रकाशित झाले.

वुर्झबर्ग येथे असतानाच कॉर्टी यांनी मानवी कर्णावर्ताच्या शंखाच्या आकाराच्या भागाचा अभ्यास केला असावा. परंतु त्याला पूर्णत्व आले ते त्यांनी ताजे कर्णपटलाचे नमुने कार्माइन रंगद्रव्याची क्रिया करून सूक्ष्मदर्शकाखाली पाहण्याचे तंत्र श्रोडर व्हॅनडर कोल्क आणि पीटर हार्टिग यांच्या मार्गदर्शनाखाली नेदरलँड्समधील युट्रे येथे आत्मसात केले. या तंत्रास ऊती रसायन विज्ञान (Histochemistry) असे म्हणतात. आजही ऊतीग्रहण (Biopsy) केलेल्या ऊतीवरून रोगनिदान हे विकृतीविज्ञानातील एक महत्त्वाचे तंत्र आहे.

सव्वाशे वर्षांपूर्वीच्या काळात फारसे प्रगत सूक्ष्मदर्शी तंत्रज्ञान, रंगद्रव्य तंत्रज्ञान नसताना कानाच्या आतील भागाचे इतके सूक्ष्म निरीक्षण, विवेचन कॉर्टी यांनी केले हे फारच विलक्षण आहे. कॉर्टी यांनी मानवी आंतरकर्णाच्या बारकाईने केलेल्या अभ्यासाचा भौतिकी शास्त्रज्ञांना फायदा झाला. जर्मन भौतिकी तज्ज्ञ, हेल्महोल्त्झ यांनी या निरीक्षणांवर आधारित श्रवणाची संस्पंदन (resonance) उपपत्ती मांडली.

कॉर्टी यांनी त्यांचे काम पॅरीसमध्ये पूर्णत्वास नेले. या कामाला लगेच प्रसिद्धी मिळाली. परिणामी त्यांना सोसिएती दे बायॉलॉजी दे पॅरीस (Societe de Biologie de Paris) चे सदस्यत्व मिळाले. नंतर थोड्या काळाने पॅरीस मेडिकल सोसायटी आणि व्हेरीन डॉइशर अझर्ते अँड नॅचर फोर्श्चर यांचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. कॉर्टी यांची इम्पिरीयल लिओपोल्डियन कॅरॉलिनियन अकॅडमीचे सदस्य म्हणून निवड झाली. त्यानंतर त्यांच्या आयुष्याला अचानक एक कलाटणी मिळाली. ते इटालीला तुरीनमध्ये जमीन जुमल्याच्या कामांसाठी गेले आणि तेथेच दीर्घकाळ अडकले. उर्वरित आयुष्यात विज्ञान क्षेत्रात त्यांच्याकडून मोठी कामगिरी झाली नाही. एका हत्तीबद्दल त्यांनी केलेली निरीक्षणे कॉलायकर यांच्याकडे लिहून पाठवली होती. ती पुढे प्रकाशित झाली. हत्तीसारख्या महाकाय प्राण्याच्या पेशी माणसासारख्या तुलनेने लहान प्राण्याच्या पेशींपेक्षा वेगळ्या नसतात हे त्यांनी नोंदून ठेवले आहे.

त्यांचे कॉर्व्हीनो सान किरीको येथे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर कॉलायकर यांनी त्यांच्या सन्मानार्थ आणि स्मरणार्थ कर्णावर्त या आंतरकर्णातील शंखासारख्या भागाला ‘ऑर्गन ऑफ कॉर्टी’ असे नाव देण्याचे सुचवले.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा