इंगलमॅन, थिओडोर विल्हेल्म : (३० नोव्हेंबर, १८४३ ते २० मे १९०९) थिओडोर विल्हेल्म इंगलमॅन यांचा जन्म जर्मनीतील लिपझिग येथे झाला. थिओडोर यांना इंफ्युसोरिया (Infusoria) सारख्या पाण्यातील सूक्ष्मप्राण्यांच्या निरीक्षणात विशेष रस होता. त्यांनी वैद्यकीय आणि नैसर्गिक विज्ञानाचे शिक्षण जेना विद्यापीठात घेतले. पुढे त्यांचे शिक्षण हेडीलबर्ग, गॉटिन्जन आणि लिपझिग अशा विविध विद्यापीठात झाले. जेना विद्यापीठामध्ये विद्यार्थी असताना त्यांना शरीरशात्रज्ञ अल्बर्ट वॉंन बेझोल्ड आणि प्राणीशास्त्रज्ञ अर्नेस्ट हेकेल यांच्यापासून प्रेरणा मिळाली. हेडीलबर्गमध्ये त्यांची भेट प्रख्यात शरीरशास्त्रज्ञ हर्मन वॉंन हेल्महोल्ट्झ यांच्याशी झाली. परिणामस्वरूप थिओडोर यांना स्नायू आणि मज्जातंतू याच्या अभ्यासामध्ये रुची निर्माण होऊ लागली. एम. डी. पदवी प्राप्त करण्यासाठी त्यांचा कॉर्निआवरील प्रबंध प्रकाशित झाला. त्यामुळे फ्रान्सिस्कस कॉर्नेलीस डॉंण्डर्स यांच्यासारख्या नावाजलेल्या डच शरीरशास्त्रज्ञाचे लक्ष थिओडोर विल्हेल्म इंगलमॅन यांच्याकडे वेधले गेले व त्यांनी थिओडोर यांना त्यांचा सहाय्यक म्हणून काम करण्याचा प्रस्ताव दिला.
त्यामुळे थिओडोर युट्रेट विद्यापीठ, नेदरलँड येथे आले. तेथे सुरुवातीला डॉंण्डर्स यांचे सहायक म्हणून राहिल्यानंतर पुढे ते सहयोगी प्राध्यापक झाले व डॉंण्डर्सनंतर त्यांच्या जागी प्राध्यापक म्हणून त्याची निवड झाली. इंगलमॅन यांचे शरीरशास्त्रातील महत्त्वाचे योगदान म्हणजे स्नायूसंबंधीत संशोधन. त्यांनी सांगितले की, स्नायू आकुंचन पावताना स्नायूंमधील अँनिसोस्ट्रोपिक तंतूंच्या पट्ट्याचे आकारमान वाढते व आयसोट्रोपिक तंतूंच्या पट्ट्याचे आकारमान कमी होते. त्यांनी असा सिद्धांत मांडला की, या दोन तंतुपट्ट्यांमधील संवादामुळेच स्नायूंचे आकुंचन शक्य आहे. त्यांनी बेडकांवर केलेल्या प्रयोगात दाखवून दिले की हृदयाच्या स्नायूंचे आकुंचन हे हृदयाच्या स्नायूंमुळेच होते, बाह्य चेताप्रेरणेमुळे नाही. त्या काळी मात्र ते तसे मानले जात होते.
पुढे त्यांनी सायनस, अँट्रियम व व्हेंट्रीकल यांचे आकुंचन रेखाटण्यासाठी तसेच अरायथिमिया तपासण्यासाठी लॅडर डायग्रामचा उपयोग सुरू केला. त्यावेळी ऑक्सिजन हा वनस्पतींच्या व शेवाळाच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेमध्ये तयार होतो हे ज्ञात होते. इंगलमॅन यांनी असे सांगितले की ऑक्सिजन तयार होण्याचे प्रमाण हे हरितद्रव्य व प्रकाशाच्या गुणवत्ता व प्रमाणावर अवलंबून असते. त्यांना असे आढळून आले की जिवाणू हे स्पायरोगायरा या शेवाळाच्या हरितद्रव्याकडे आकर्षिले जातात. इंगलमॅन यांनी असे अनुमान काढले की शेवाळामधील प्रकाशसंश्लेषण करणार्या हरितद्रव्याने तयार केलेल्या ऑक्सिजनमुळे जिवाणू तिकडे आकर्षित होतात. हे निरीक्षण म्हणजे प्राणवायूच्या सकारात्मक प्रतिसादाच्या (Positive airotaxis) पहिल्या लिखित निरीक्षणांपैकी एक होते. त्यांनी त्यांचा प्रसिद्ध असा रंगसंगतीचा (Action Spectrum) प्रयोग केला ज्यामध्ये त्यांनी कार्ल झेस यांनी बनवलेल्या उपकरणाचा वापर केला. ते उपकरण म्हणजे एक सुधारित सूक्ष्मदर्शक यंत्र होते. यात एक प्रिझम बसवलेला होता ज्यायोगे लावलेल्या काचपट्टीवर सूक्ष्म रंगसंगती (Microscopic spectrum) तयार होत असे. त्या उपकरणामुळे प्रकाशाच्या वेगवेगळ्या तरंगलांबीमधील फरक व त्याची मोजदाद करता येत होती. अशा तऱ्हेने ते उपकरण म्हणजे एक मायक्रोस्पेक्टरोस्कोप होता. इंगलमॅनने क्लॅडोफोरा (Cladophora) नामक शेवाळाला या उपकरणाद्वारे प्रकाशित केले; वेगवेगळ्या तरंगलांबीचा प्रकाश वेगवेगळ्या भागावर पडू दिला. त्यानंतर त्यांनी ऑक्सिजनची गरज असणारे बॅसिलस टरमो (B. termo) नावाचे जिवाणू तेथे सोडले, आणि ते जिवाणू कुठल्या भागात एकत्रित होतात हे पहिले. पुढे हॉसर नावाच्या शास्त्रज्ञाने सांगितले कि बॅसिलस टरमो हा प्रोटियस (Proteus) नावाचा जिवाणू आहे. जिवाणूंच्या एकत्रीकरणामुळे त्यांना कळाले की कुठल्या भागात ऑक्सिजनचे प्रमाण जास्त आहे. त्यांनी असा निष्कर्ष काढला की, प्रकाशसंश्लेण क्रियेबाबत सर्वात जास्त क्रियाशील भागातच जास्त ऑक्सिजन असतो. हरितद्रव्याच्या ज्या भागात लाल आणि जांभळ्या रंगाचा प्रकाश पडत होता त्याच भागात जास्त प्रकाशसंश्लेण होत होते. त्यांनी बॅक्टेरिओक्लोरोफिल-a हे प्रकाश रंगसंगतीतील कुठली तरंग लंबी शोषून घेतो हे शोधून काढले. प्रकाशाच्या तीव्रतेनुसार जिवाणूंच्या हालचालीच्या वेगावर होणारा परिणाम त्यांनी शोधून काढला. यालाच फोटोकायनेसिस असे म्हणतात. जिवाणूंचा अंधाराला काय प्रतिसाद असतो? जिवाणू अंधारकडे जायला कसे घाबरतात हे त्यांनी शोधून काढले. यालाच ‘स्कोटोफोबिक प्रतिसाद’ असे म्हणतात. पुढे काही वर्षांनी अशाच प्रयोगाद्वारे त्यांनी अतिनील किरणांचा वापर करणार्या पर्पल बॅक्टेरिआचा शोध लावला.
इंगलमॅन यांच्या स्नायुसंबंधी आणि हृदयासंबंधित संशोधनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना वाखाणण्यात आले. त्यामुळे त्यांना फ्रेईबर्ग, झुरीक आणि जेना येथून प्राध्यापकीचा प्रस्ताव आला. पण युट्रेट विद्यापीठामधील शांत व उत्तम कार्यालयीन वातावरण, अनावश्यक प्रशासकीय कामाचा कमीत कमी ताण या कारणास्तव त्यांनी ते प्रस्ताव नाकारले. पुढे बर्लिन विद्यापीठातील सन्मानाची अशी प्रोफेसरशीपचा प्रस्ताव मात्र त्यांनी स्वीकारला.
एमा आणि थिओडोर इंगलमॅन हे उत्तम संगीतकार होते व हॉलंडमधील संगीत कारकिर्दीमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. क्लारा शुमन, अँटोन रुबीनस्टीन, हेन्री हर्जोजेंबेर्ग, हॅन्स वॉंन बलो या प्रख्यात संगीतकारांनी बर्याचदा इंगलमनच्या घरी भेट दिली आहे व त्या पती-पत्नी दोघांच्या चेंबर संगीत या संगीत प्रकारातील योगदानाची प्रशंसा केली आहे. जोहान्स ब्रह्मस यांनी तयार केलेला त्याचा तिसरा तंतुवादकांचा समूह (third string quartet) इंगलमॅनला समर्पित केला आहे.
वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/16143904/
- https://www.encyclopedia.com/science/dictionaries-thesauruses-pictures-and-press-releases/engelmann-theodor-wilhelm
- https://www.researchgate.net/publication/7617355_Contributions_of_Theodor_Wilhelm_Engelmann_on_phototaxis_chemotaxis_and_photosynthesis
समीक्षक : रंजन गर्गे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.