ठेवीदारांच्या अथवा आपल्या संस्थेतील सभासदांच्या वतीने वित्तीय बाजारात भागरोखे (शेअर्स), कर्जरोखे (डिवेंचर) खरेदी करणारी, तसेच नाणेबाजारातील साधनांमध्ये पैशांची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणारी एक संस्था अथवा संघटना. भारतीय भागरोखे बाजारात संस्थात्मक गुंतवणूकदारांचे महत्त्व वाढत आहे. भागरोखे बाजारामध्ये व्यक्तिगत किरकोळ गुंतवणूकदाराबरोबरच संस्थात्मक गुंतवणूकदारदेखील गुंतवणूक करीत आहेत. जेव्हा भागरोखे बाजाराचा ‘इंडेक्स मेकर्स’ (निर्देशांक ठरविणारा एक घटक) म्हणून संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात भागरोखे व कर्जरोखे खरेदी केले जातात, तेव्हा भागरोखे बाजाराचा निर्देशांक वरती गेलेला दिसतो. याउलट, जेव्हा संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात भागरोखे व कर्जरोखे यांची विक्री होते, तेव्हा भागरोखे बाजारांचा निर्देशांक खाली आलेला दिसतो. २००८ मध्ये झालेल्या अमेरिकेतील सबप्राईम क्रायसेसमुळे आलेल्या महामंदीमुळे मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी स्वत:कडे बाळगलेल्या भागरोखे, कर्जरोखे आणि परस्पर साहाय्य निधी (म्यूच्युअल फंड) यांची विक्री केल्यामुळे निर्देशांकाची घसरण झालेली होती.
काही संस्थात्मक गुंतवणूकदारांना मतांचा अधिकार असल्यामुळे त्यांचा प्रभाव महामंडळाच्या अथवा कंपन्यांच्या व्यवस्थापणावरती पडत असतो. ते सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या भागरोखे बाजारातील गुंतवणुकीविषयक हालचालींवर अवलंबून असतात. त्या दृष्टीनेही संस्थात्मक गुंतवणूकदारांना खूप महत्त्व आहे. व्यवहारतोल, विनिमय दर इत्यादींवरतीदेखील संस्थात्मक गुंतवणूकदारांचा प्रभाव पडत असतो. एकूण स्थूल अर्थशास्त्रीय चलावरती संस्थात्मक गुंतवणूकदारांचा प्रभाव लक्षात घेता ही ‘संस्थात्मक गुंतवणूकदारांची संकल्पना, त्यांचे वर्गीकरण, त्या गुंतवणूकदारांमध्ये समाविष्ट असणाऱ्या संस्था, संघटना अथवा व्यक्ती इत्यादींविषयी माहिती असणे आवश्यक असते.
सर्वसाधारणपणे संस्थात्मक गुंतवणूकदारांचे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि देशी संस्थात्मक गुंतवणूकदार असे वर्गीकरण करण्यात येते. संस्थात्मक गुंतवणूकदारामध्ये बिगर बँकींग वित्तीय संस्थात्मक व्यवस्थापण कंपन्या, गुंतवणूक बँका, विमा कंपन्या, परस्पर साहाय्य निधी कंपन्या, निवृत्ती वेतन निधी (पेन्शन फंड), भविष्य निर्वाह निधी (प्रोव्हिडंट फंड), देणगी निधी (एन्डॉमेंट फंड) इत्यादींचा समावेश होतो.
बिगर बँकिंग वित्तीय संस्था (नॉन बँकिंग फायनॅन्शियल इन्स्टिट्यूशन्स) : ज्या बँका नाहीत; परंतु बँकांप्रमाणे अथवा अधिकोषांप्रमाणे काम करतात, त्यांना बिगर बँकिंग वित्तीय संस्था असे म्हणतात. उदा., युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (युटीआय), भारतीय औद्योगिक विकास बँक (इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया – आयडीबीआय), गृहनिर्माण विकास वित्तीय महामंडळ (हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कार्पोरेशन – एचडीएफसी), भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ, भारतीय औद्योगिक विकास बँक, भारतीय औद्योगिक पत व गुंतवणूक महामंडळ (इंडस्ट्रीयल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) इत्यादी.
विमा कंपन्या (इन्शुरन्स इडस्ट्रीज) : यामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ (लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन – एलआयसी), सर्वसाधारण विमा महामंडळ (जीआयएस) आणि खाजगी कंपन्यांनी सुरू केलेल्या विमा व्यवसायांचा समावेश होतो.
परस्पर साहाय्य निधी : भांडवल बाजारात भागरोखे अथवा कर्जरोखे यांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवश्यक तितके ज्ञान व्यक्तिगत सामान्य गुंतवणूकदारांचे असते असे नाही. त्यामुळे त्यांची गुंतवणूक त्यांच्या परस्पर साहाय्य निधी या संस्थेमार्फत भांडवल बाजारात भागरोखे अथवा कर्जरोखे खरेदी करण्यासाठी वापरण्यात येते. परस्पर साहाय्य निधीमध्ये तज्ज्ञ व्यवस्थापक असतात. त्यांच्या वतीने गुंतवणूक केली जाते. भारतात परस्पर साहाय्य निधीची सुरुवात १९६४ मध्ये युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाने सुरू केलेल्या यूएस-६४ या योजनेच्या युनिटची विक्री करून झाली. १९८७ नंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी परस्पर साहाय्य निधी योजना सुरू केल्या. त्यातील एसबीआय परस्पर साहाय्य निधी हा पहिला निधी आहे. १९९२ नंतर खाजगी क्षेत्रात परस्पर साहाय्य निधीची स्थापन करण्यात आली. कोठारी पायोनिअर (आता फ्रँकलीन टेम्पटेन म्यूच्युअल फंड) हा पहिला खाजगी क्षेत्रातील परस्पर साहाय्य निधी आहे. त्यानंतर अनेक परस्पर साहाय्य निधींची स्थापना झाली आहे. परस्पर साहाय्य निधी ज्या संस्थेच्या अथवा कंपनीच्या मालकीचा असतो, तिला मत्ता व्यवस्थापन कंपनी असे म्हणतात. अशा कंपनीची नोंद सेबीकडे केल्यानंतर त्यांना भांडवल बाजारात भागरोखे, कर्जरोखे इत्यादींची खरेदी करता येते.
परस्पर साहाय्य निधीमध्ये गुंतवलेले पैसे व त्याद्वारे मिळणारे युनिट आणि त्याचे मूल्य हा एक महत्त्वपूर्ण भाग असून त्याची माहिती असणे आवश्यक असते. परस्पर साहाय्य निधीतील गुंतवणूक ही सर्व लोकांची अथवा संस्थांची एकत्रित करून त्यांच्या साहाय्याने निधी व्यवस्थापक योग्य परतावा मिळवून देणाऱ्या भागरोख्यांमध्ये करीत असतात. खरेदी केलेल्या भागरोख्यांची बाजारातील किमतीतून प्रशासकीय व आनुषंगिक मान्य असणारे खर्च वजा केल्यानंतर जे मूल्य शिल्लक राहते, त्याला निव्वळ मत्ता मूल्य असे म्हणतात. निव्वळ मत्ता मूल्याला युनिटच्या संख्येने भागले असता प्रत्येक युनिटचे निव्वळ मत्ता मूल्य आपल्याला समजून येते. भागरोख्याच्या किमती व निव्वळ मत्ता मूल्य यांचा संबंध असतो. भागरोख्यांच्या किमती वाढल्या की, निव्वळ मत्ता मूल्य वाढते. याउलट, भागरोख्याच्या किमती कमी झाल्या की, निव्वळ मत्ता मूल्य कमी होते. आज भारतीय भांडवल बाजारात परस्पर साहाय्य निधी कंपन्यांमार्फत भांडवल बाजारामध्ये लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे.
सुरक्षितता अथवा बचाव निधी (हेज फंड) : हा परस्पर साहाय्य निधीसारखाच भाग असतो; परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या अथवा संस्था समान आपल्या उद्दिष्टांसाठी एकत्र आलेल्या असतात. अधिक परतावा देणाऱ्या; परंतु जोखमीच्या प्रतिभूतीमध्ये, विदेशी विनिमयामध्ये या कंपन्या अधिक गुंतवणूक करतात. मोठी रक्कम गुंतवू शकणारे, ‘अधिक जोखीम अधिक फायदा’ या तत्त्वाचा आधार घेऊन गुंतवणूक करणारे काही मर्यादित गुंतवणूकदार कंपन्या या बचाव निधीमध्ये सहभागी होतात. या बचाव निधींना कमी विक्री (शॉर्ट सेलींग) अथवा उत्पन्न (डेरिव्हेटीव) व्यवहार करता येत असल्याने ते स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतात अथवा होणाऱ्या नुकसानापासून लांब राहू शकतात. त्यामुळे या फंडाला सुरक्षितता अथवा बचाव निधी असे म्हणतात.
देणगी निधी (एन्डॉमेंट फंड) : काही सेवाभावी संस्था (उदा., तिरुपती देवस्थान, शिर्डी साईबाबा ट्रस्ट इत्यादी), काही शाळा अथवा विश्वविद्यालये (उदा., केंब्रिज विद्यापीठ इत्यादी) यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर देणग्या जमा होत असतात. अशा देणग्यांचा भागरोखे बाजारात गुंतवणुकीसाठी वापर केला जातो. अशा देणग्यांद्वारे जमा झालेल्या निधीला देणगी निधी असे म्हणतात.
निवृत्ती वेतन निधी व भविष्य निर्वाह निधी : निवृत्ती वेतन निधी व भविष्य निर्वाह निधी यांची रक्कम काही ठराविक प्रमाणात भागरोखे बाजारात गुंतविण्यास परवानगी दिली आहे.
अशा प्रकारे काही संस्था अथवा गुंतवणूक बँका भांडवल बाजारामध्ये आपली गुंतवणूक करीत असतात. त्यामुळे त्यांना ‘संस्थात्मक गुंतवणूकदार’ असे म्हटले जाते.
संदर्भ : गोविलकर, वि. मा., अर्थजिज्ञासा, पुणे, २०१८.
समीक्षक : श्रीराम जोशी