द्युबॉइस, यूजीन (Dubois Eugene) : (२८ जानेवारी १८५८ – १६ डिसेंबर १९४०). प्रसिद्ध डच शारीरविज्ञ आणि भूशास्त्रज्ञ. द्युबॉइस यांचा जन्म नेदर्लंड्समधील ईज्डेन येथे झाला. त्यांच्या आईचे नाव मारिआ फ्लोरिबेर्ता आणि वडीलांचे जीन जोसेफ होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण लिम्बुर्ग येथील शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी ॲम्स्टरडॅम विद्यापीठात वैद्यक शिक्षणासाठी प्रवेश घेतला. वैद्यकाचा अभ्यास करताना ते आर्टस्कूलमधील विद्यार्थ्यांना शरीरविज्ञान हा विषय शिकवित. इ. स. १८८४ मध्ये त्यांनी वैद्यक विषयाची पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी इ. स. १८८१ ते १८८७ या काळात तुलनात्मक शरीरविज्ञान या विषयाच्या अभ्यासाठी वेळ दिला. जर्मन जीवशास्त्रज्ञ कार्ल वोग्त यांची चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांच्यावरील ‘न्यु थिअरी ऑफ इव्होल्युशन’ ही व्याख्यानमाला ऐकूण द्युबॉइस यांनी या विषयाकडे स्वत:ला झोकून दिले. डार्विन यांच्या मताप्रमाणेच माणसाची उत्क्रांती विषुवव्रुत्तीय भागात झाली असावी, असे त्यांचे मत होते. माणूस हा गिब्बनच्या जवळचा असावा, असे त्यांचे मत होते. गिब्बन हा इंडोनेशियाच्या भागात असल्याने आपल्यालाही इंडोनेशियात जायला मिळावे, ही त्यांची इच्छा होती.
द्युबॉइस यांनी इ. स. १८८५ मध्ये पृष्ठवंशीय प्राण्यांच्या स्वरयंत्रात असलेल्या कंठातील पोकळीच्या उत्क्रांतीवर गृहितक मांडले. मानवी उत्क्रांती हा त्यांच्या आवडीचा मूळ विषय होता. अर्न्स्ट हॅकल यांच्याकडून त्यांना स्फूर्ती मिळाली होती. त्यांच्या मते, कपी आणि मानव यांच्यामध्ये काही प्रजात असावी. बेल्जियम येथील स्पाय शहराजवळ मिळालेल्या निअँडरथल मानवाच्या अवशेषांमुळे त्यांचा उत्साह वाढला होता. त्यांनी इ. स. १८८१ मध्ये आपल्या गावाच्या आसपास काहीकाळ व्यतीत करून मानवी कवट्यांचे काही जीवाश्म मिळविले. इ. स. १८८७ मध्ये ते मेडिकल कॉर्प्स ऑफ द रॉयल डच ईस्ट इंडीज या डच आर्मीत रुजू झाले. त्या निमीत्ताने त्यांना डच ईस्ट इंडीज कॉलनी म्हणजे आत्ताचे इंडोनेशिया येथे जाता आले. या ठिकाणी जातानाच मानवी उत्क्रांतीमधील हरविलेल्या दुव्यांचा शोध घ्यायचा, असा त्यांचा विचार सुरू होता. सुदैवाने या ठिकाणी मिळालेल्या पिथिकॅन्थ्रोपस इरेक्टस म्हणजेच ‘जावा मॅन’च्या शोधासाठी द्युबॉइस प्रसिद्ध झाले.
द्युबॉइस यांनी इ. स. १८८७ ते १८९५ या काळात सुमात्रा बेटावरील नद्यांच्या खोऱ्यांत आणि गुहांमध्ये जैविक अवशेषांचा शोध घेतला. मध्य जावामधील सांजीरन आणि पूर्व जावा भागातील ट्रिनिल या भागांतही त्यांनी या अवशेषांचा शोध घेतला. या शोधात त्यांना एका कवटीचा वरचा भाग, दंडाचे हाड आणि दात मिळाले (इ. स. १८९० ते १८९२). प्रारंभिक होमिनीडचे ते आद्य नमुने होते. त्यांच्या मतानुसार, हे अवशेष पिथिकॅन्थ्रोपस इरेक्टसचे असून हे अवशेष मानवसदृश कपी आणि माणूस यांच्यामधील खंडित अथवा हरविलेले दुवेच आहेत; परंतु त्यांच्या या मताला काही तज्ज्ञांचा विरोध होता. इ. स. १९२० नंतर या विषयावर अनुकूल अशी चर्चा सुरू झाली. आज या अवशेषाला होमो इरेक्टसचे अवशेष असे म्हणतात. हे अवशेष आफ्रिकेबाहेर मिळाल्यामुळे त्यांना विषेश महत्त्व होते.
द्युबॉइस हे इ. स. १८९७ ते १९२८ या काळात टेलर्स संग्रहालयात पुराजीवशास्त्राचे व्यवस्थापक होते. त्यामुळे त्यांना मिळालेले होमो इरेक्टसचे अवशेष त्यांनी भूशास्त्र विभागातच ठेवले. इ. स. १८९९ मध्ये द्युबॉइस भूशास्त्राचे प्राध्यापक झाले. इ. स. १८९७ मध्ये अॅम्स्टरडॅम विद्यापीठाने द्युबॉइस यांना सन्माननीय विद्यावाचस्पती ही पदवी प्रदान करण्यात आली. इ. स. १९१९ मध्ये रॉयल नेदर्लंड्स अकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसचे ते सभासद झाले. त्यांनी दी क्लायमेट्स ऑफ दी जिऑलॉजिकल पास्ट अँड देअर रिलेशन टू दी इव्हॅल्यूशन ऑफ दी सन, १८९५; कलेक्शन ऑफ पाम्फ्लेट्स बाय यूजीन द्युबॉइन, १९१८ इत्यादी पुस्तके लिहिली.
द्युबॉइस यांचे नेदर्लंड्समधील हेलन येथे निधन झाले.
संदर्भ :
- Gould, S. J., Eight little Piggies, New York, 1993.
- Shipman, Pat, The Man Who Found the Missing Link, New York, 2001.
- Srivastava, R. P., Morphology of the Primates & Human Evolution, New Delhi, 2009.
समीक्षक : वाळिंबे, सुभाष