फाल्कोव, स्टॅनले : (२४ जानेवारी १९३४) स्टॅनले फाल्कोव जेकब यांचे बालपण वेगवेगळ्या भाषा, वास आणि रीतीरिवाजांची सरमिसळ असलेल्या वातावरणात व्यतित झाले. पोलिश किंवा इटालियन ज्यूंच्या शहरी वस्तीतून ते व त्यांचे कुटुंबीय न्यू पोर्ट या ऱ्होड आयलंडमधल्या पुराणमतवादी इंग्लिश वस्तीत राहायला आले. तिथल्याच एका सार्वजनिक शाळेमध्ये ते जाऊ लागले. पण ती शाळा त्यांना फारशी आवडली नाही. कुठल्याही निकषाने त्यांना चांगला विद्यार्थी ठरवणे अवघड होते. शाळेची क्रमिक पुस्तके सोडली तर बाकीची पुस्तके वाचायला त्यांना फार आवडे. असेच एकदा त्यांच्या हातात वाचनालयातले पाउल डी क्रुफ यांनी लिहिलेले दि मायक्रोब हे पुस्तक पडले. या पुस्तकाने त्यांना सूक्ष्मजीव व त्यावरील संशोधन यात रस निर्माण झाला. लुई पाश्चर, रोबेर्ट कॉख, पॉल एहर्रलीच यांच्यासारख्या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या गूढ आणि साहसी जीवनामुळे ते भारावून गेले. नासलेल्या दूधातले आणि गवताच्या रसातले सूक्ष्मजीव त्यांनी आपल्या शाळेतल्या सूक्ष्मदर्शकाखाली निरखले आणि ते हुरळून गेले. अर्थात त्यामुळे त्यांचे गणितात नापास होणे किंवा रसायनशास्त्र वा जीवशास्त्रात कमी गुण मिळणे काही टळले नाही.
त्यांनी मैन विद्यापीठात पदवीसाठी प्रवेश घेतला. इथे रसायनशास्त्र व जीवशास्त्र यावर त्यांनी भरपूर प्रयोग केले व उन्हाळी सुट्टीत प्रयोगशाळेतल्या प्रशिक्षणासाठी न्यू पोर्ट येथील रुग्णालयात त्यांना क्लिनिकल सूक्ष्मजीवशास्त्रात काम करण्याची संधी दिली. प्रयोगशाळेतल्या तंत्रज्ञांना मदत, शवविच्छेदन, रोग निदान या सारख्या अनेक क्षेत्रात त्यांनी काम केले. तिथल्या अलीस शाफर सुझेट या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाने त्यांना जीवाणू एकमेकांपासून अलग करून ओळखायला शिकवले.
नंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी मिशिगन राज्याच्या विद्यापीठात प्रवेश घेतला. इथेच ॲलन कॅम्पबेल ह्या शिक्षकाने त्यांना सूक्ष्मजीवांचे जग हे रॉजर स्टेनियर व इतरांनी लिहिलेले एक पुस्तक भेट दिले, हे पुस्तक वाचून फाल्कोव यांना सूक्ष्मजीवांकडे बघायची एक नवीन दृष्टी मिळाली. फाल्कोव यांना मिशिगनमध्ये ताणतणावाचा सामना करावा लागला, त्यावर काही इलाज नव्हता त्यामुळे शिक्षण अर्धेच सोडून त्यांनी पुन्हा न्यू पोर्ट रुग्णालयातील नोकरी स्वीकारली. पोटातील रोगजंतू ओळखण्यासाठी त्यांनी काही जीवरासायनिक चाचण्यांचा शोध लावला, त्यावरील त्यांचे लेख संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाले.त्या लेखांमुळे ते ब्राऊन विद्यापीठाच्या स्टुअर्ट व हर्मन चेस यांच्या संपर्कात आले. या संशोधकांनी फाल्कोव यांच्या रोगजंतू व जनुकशास्त्राच्या अभ्यासाला चालना दिली व ब्राऊन विद्यापीठामध्ये फेलो म्हणून. स्टुअर्ट यांच्या हाताखाली काम करण्यासाठी फाल्कोव दाखल झाले. इथे ज्या चर्चा घडत त्यांनी फाल्कोव यांना विचार करायला आणि अधिकाधिक प्रयोग करायला प्रवृत्त केले. स्टुअर्ट यांच्या निवृत्तीआधी, पीएच्.डी. करण्यासाठी त्यांनी वॉल्टर रीड संशोधन संस्थेत लू बरोन यांच्या प्रयोगशाळेत प्रवेश घेतला. लू बरोन यांच्याकडे साल्मोनेला टायफी या जीवाणूचा एक स्ट्रेन होता, तो लक्टोज ही शर्करा आंबवू शकत होता, तसेच हा गुणधर्म तो इतर लक्टोज न वापरणार्या साल्मोनेला जीवाणूंना इतकेच नव्हे तर ईश्चरेशिया कोली किंवा शिगेला, सेराशिया यासारख्या पोटातील इतर जीवाणूंनाही हस्तांतरित करत असे. ही प्रक्रिया प्लास्मीडमुळे होत असावी असे फाल्कोव यांना वाटले व या कल्पनेवर अधिक काम करण्यासाठी बरोन यांनी त्यांना जुलिअस मार्मुर यांच्याकडे पाठवले.तिथे जीवाणूमधला डीएनए अलग कसा करावा, तो वितळवायाचा कसा वगैरे जनुकशास्त्राचे पायाभूत प्रयोग फाल्कोव करायला शिकले व हीच साधने वापरून नंतर प्लास्मिडमुळेच हा गुणधर्म दुसर्या जंतूंमध्ये शिरकाव करतो हे फाल्कोव यांनी सिद्ध केले.
कार्नेजी मेलॉन संस्थेमध्ये पोस्ट डॉक्टरल फेलो असलेले डॉन ब्रेन्नर आणि स्टॅनले फाल्कोव यांनी सुमारे सात वर्षे न्यूक्लीईक आम्लांच्या संकरीकरणावर एकत्रित काम केले. दोन जनुकीय सारखेपणा असलेल्या जीवाणूपैकी एकाचे न्यूक्लीईक आम्ल किरणोत्सर्जीत अणूने लेबल केले व ते दुसर्या जीवाणूच्या सामान्य न्यूक्लीईक आम्लात मिसळले आणि एका ठराविक तापमानाला आणले तर आम्लाचे रेणू वितळतात आणि पुन्हा थंड झाले की एकत्र येऊन विविक्षित नागमोडी आकार धारण करतात. दोन्ही आम्लात जनुकीय सारखेपणा असल्यास ते एकत्र येऊन संकरित आम्ल तयार होते व या संकरित आम्लाचा विलयबिंदू मुळातल्या न्यूक्लीईक आम्लांच्या विलयबिंदूपेक्षा वेगळा असतो. मुळातल्या न्यूक्लीईक आम्लांमधला जनुकीय सारखेपणा जेवढा जास्त तेवढे जास्त तापमान संकरित दुपेडी आम्ल वितळण्यासाठी लागते. हे साधे तत्त्व वापरून माणसाच्या पोटातल्या जीवाणूंच्या न्यूक्लीईक आम्लांमधला सारखेपणा डॉन ब्रेन्नर, स्टॅनले फाल्कोव यांनी त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने मोजला. हे काम चटकन करता यावे यासाठी त्यांनी रायबो न्यूक्लीईक आम्लाचे छोटे प्रोब्स बनवले व हे प्रोब न्यूक्लीईक आम्लाच्या संकरीकरणासाठी वापरले. हीच प्रक्रिया पोटातल्या रोगजंतूचा जनुकीय सारखेपणा मोजण्यासाठी अजूनही वापरली जाते.
आर्थर साझ यांनी फाल्कोवना जॉर्जटाऊन विद्यापीठात वैद्यकीय विद्यार्थ्यांची काही व्याख्याने घेण्यास प्रवृत्त केले. व्याख्याने घेताना फाल्कोवना जाणवले की संशोधन करण्याइतकीच मजा शिकवण्यातही असते, मग ते प्रथम जॉर्जटाऊन वैद्यकीय विद्यापीठात व नंतर वॉशिंग्टन वैद्यकीय विद्यालयात शिकवू लागले. नायसेरीया या जीवाणूच्या प्रजाती प्रतिजैविक विरोधक कशा होतात हे त्यांनी या काळात शोधून काढले. नंतर ते रोगप्रक्रियेवर संशोधन करू लागले. अविकसित देशांतील रुग्णांत आढळणारी मारक हगवण ईश्चरेशिया कोलीच्या प्रजातीमुळे होते हे संशोधन किंवा प्लास्मिड्सच्या एकसमान नामकरणासाठी योजलेली पद्धत याच काळातली. १९८१मध्ये स्टानफोर्ड विद्यापीठात फाल्कोव प्रोफेसर म्हणून दाखल झाले. सध्या ते तिथे तहहयात मानद प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. जीवाणू मुळात मारक नसतात तर माणूस त्यांना तसे बनवतो या त्यांच्या सिद्धांतावर त्यांचा दृढ विश्वास आहे. कॉलरा, प्लेग व डांग्या खोकला यासारखे वेगवेगळ्या रोगांवर त्यांचे संशोधन अजूनही चालू आहे. या संशोधनासाठी त्यांना जी असंख्य पारितोषिके मिळाली त्यातील राष्ट्रीय विज्ञान पदक पुरस्कार सर्वात प्रतिष्ठेचा समजला जातो. फाल्कोव यांचे असंख्य लेख नेचर रिव्ह्यू, सेल, नेचर मेडिसिन, रेण्वीय सूक्ष्मजीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्राचा वार्षिक रिव्ह्यू यासारख्या प्रख्यात संशोधन पत्रिकांत समाविष्ट करण्यात आले आहेत.
संदर्भ :
- http://www.annualreviews.org/doi/pdf/10.1146/annurev.micro.62.081307.162931
- http://usatoday30.usatoday.com/news/health/2009-01-11-falkow-profile_N.htm
- https://med.stanford.edu/…/stanley–falkow-to-receive-national-medal-of-science.html
- https://www.youtube.com/watch?v=0RZkgWnLXuI
- Brenner DJ, Fanning GR, Johnson KE, Citarella RV, Falkow S. 1969. Polynucleotide sequence relationships among members of the Enterobacteriaceae. J. Bacteriol. 98:637–50
समीक्षक : रंजन गर्गे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.