अनालेस : एक लॅटिन खंडित महाकाव्य. त्याची निर्मिती रोमन कवी क्विंटस एन्निअस यांनी इ.स.पू. दुसऱ्या शतकात केली. हे महाकाव्य म्हणजे एक इतिहासग्रंथच आहे. या महाकाव्याचा लॅटिन साहित्यावर फार मोठा प्रभाव दिसतो. या महाकाव्याची रचना लॅटिन भाषेत केलेली असून यात एकूण १८ खंडांचा समावेश आहे. या महाकाव्यावर ग्रीक काव्यात्मक परंपरेचा विशेषत: होमरच्या काव्याचा प्रभाव आहे. या महाकाव्याचे उपयोजन सहा गणयुक्त काव्यपंक्तीचे असून लॅटिन काव्यात प्रथमच एनिअस यांनी त्याची निर्मिती केली. त्यामुळे हे महाकाव्य त्या काळात अधिक प्रभावी ठरले आणि लॅटिन महाकाव्यांकरिता एक मानक म्हणून प्रस्थापित झाले. रोमन राज्याचा आरंभीचा इतिहास हा या महाकाव्याचा विषय आहे. हा इतिहास मुख्यत: ग्रीक नोंदीवर व रोमन इतिहासकार क्विंटस फॅबियस पिक्टो यांच्या कार्यावर आधारित असल्याचे म्हटले जाते. प्रारंभीच्या काळात या महाकाव्याकडे महत्त्वाचे सांस्कृतिक कार्य म्हणून पाहिले गेले. पुढे इ.स. चौथ्या शतकाच्या आसपास यातील काव्य दुर्मीळ झाले आणि पुढे मध्ययुगात त्याचे हस्तलिखित नामशेष झाले. नवनिर्मितीच्या काळात या महाकाव्याविषयीची उत्सुकता पुन्हा जागृत झाल्यामुळे वेगवेगळ्या संदर्भातील उद्धृतांमधून या काव्याची पुनर्रचना करण्यात आली.

या महाकाव्यामध्ये रोमचा  राष्ट्रीय इतिहास, तेथील राज्यकर्त्यांचा इतिहास, युद्धजन्य परिस्थिती, प्रत्यक्ष युद्ध, पौराणिक कथासंदर्भ यांचा समावेश आहे. या महाकाव्याच्या १८ खडांतील पहिल्या सात खडांमध्ये पौराणिक आणि ऐतिहासिक घटना-प्रसंगांचा समावेश आहे तर उर्वरित खडांमध्ये समकालीन घटनांबद्दल लेखन केले आहे. इ.स.पू. ११८४ मधील ट्रोझन युद्धसमाप्तीपर्यंतचा काळ, इ.स.पू. ५३५-५०९ मधील रोमचा शेवटचा राजा लुसियस टारकिनिअस सुपरबस याचा काळ, रोमचा प्रजासत्ताक ते इ.स.पू. २८१-२७१ मधील पिर्रिक युद्ध होईपर्यंतचा काळ, पहिले प्युनिक युद्ध, दुसरे मॅसेडोनियन युद्ध, अँटीओकस तिसरा याच्या विरुद्ध रोमच्या मोहिमेचा तपशील, रोमन सेल्युसिड युद्ध, अटोलियन युद्ध अशा अनेक युद्धांचा व ऐतिहासिक घटनांचा समावेश या महाकाव्यात आहे. या महाकाव्याची रचना कालक्रमानुसार असून त्रिकांमध्ये विभागलेली आहे. तसेच ही रचना एककेंद्री व सममितीय आहे. हे काव्य म्हणजे त्याकाळच्या भाषेचा व कवीच्या नैतिकतेचा एक साक्षेपच आहे. उपरोधता, मार्मिक आणि चटकदार म्हणी ही या महाकाव्याची वैशिष्ट्ये सांगता येतील.

संदर्भ :