गाजूसेक, डॅनिएल कार्लटन : (९ सप्टेंबर १९२३ – १२ डिसेंबर २००८) न्यूयॉर्कमध्ये गाजूसेक यांचा जन्म झाला. अगदी लहानपणापासून त्यांना विज्ञानाची आवड होती. त्यांची इरीन मावशी न्यूयॉर्कमधल्या थॉम्सन वनस्पतीविज्ञान केंद्रात काम करत होती. कीटकांवर ती संशोधन करायची. पाच वर्षांचा कार्लटन मावशीबरोबर कीटकांचे, वनस्पतींचे निरीक्षण करीत बागेतून चक्कर मारत असे. खडक उलटा करून त्याखालील छोट्या वनस्पती व प्राणी बघण्याचा त्याला छंद होता. बघितलेल्या सजीवांवर मावशी टीका टीप्पणी करायची. मावशीबरोबर तिच्या संस्थेत तो कधीतरी सहलीला जायचा. मावशीच्या संस्थेत उन्हाळी सुट्टीत तेरा वर्षांचा असतानाच तो जॉन आर्थर यांच्या प्रयोगशाळेत रसायनशास्त्रात प्रकल्प करू लागला, छोट्या डॅनिएलच्या प्रयोगशाळेतल्या नोंदवहीत त्यांनी बनवलेल्या अनेक रसायनांची कृती व परिणाम लिहिलेले होते. यातील २,४, डाय क्लोरो फिनॉक्सिॲसेटिक आम्ल हे रसायन उत्तम तणनाशक म्हणून नावाजले गेले. गाजूसेक यांच्या नोंदवहीतल्या निरीक्षणांमुळे संस्थेला या रसायनाचे पेटंट घेता आले. अशा तर्‍हेने लहानपणीच त्यांना विज्ञानाची गोडी लागली व मावशीसारखे वैज्ञानिक व्हायचे त्यांनी ठरवले.

रॉचेस्टर विद्यापीठातून त्यांनी जीव-भौतिकशास्त्राची पदवी मिळवली. त्यानंतर हावर्ड विद्यापीठातून वैद्यकशास्त्र शिकून ते डॉक्टर झाले. लिनस पाउलिंग व मॅक्स डेल्ब्रूकबरोबर कॅलिफोर्नियाच्या तांत्रिकी संस्थेत (कॅलटेक) तर जॉन एनडर्सबरोबर हार्वर्ड विद्यापीठात संशोधन करण्याची संधी त्यांना मिळाली. हे तिन्ही शास्त्रज्ञ भविष्यात नोबेल पुरस्कार विजेते ठरले. सैन्यात नोकरी करीत असताना साऊथ कोरीयात सैनिकांना होणारा अंतर्गत रक्तस्त्राव व ताप संसर्गजन्य आहे व पक्षी या रोगाचा प्रसार करतात हे त्यांनी शोधून काढले. अमेरिकन रोग नियंत्रण केंद्राने या संशोधनाची दखल घेऊन त्यांना नोकरीसाठी पाचारण केले पण त्यांनी ती नाकारली आणि ऑस्ट्रेलियात मेलबर्न येथे वॉल्टर आणि एलिझा हॉल वैद्यकीय संशोधन संस्थेत फ्रंक बर्नेट या संशोधकाबरोबर काम करण्यासाठी गाजूसेक रवाना झाले. तिथे मुलांची वाढ, वर्तन आणि रोग यावरील अभ्यासाची मुहूर्तमेढ डॉक्टर गाजूसेक यांनी रोवली. या अभ्यासासंदर्भात काम करण्यासाठी बर्नेट यांनी गाजूसेक यांना न्यू गिनी बेटावर मोर्सबी बंदरात धाडले. मोर्सबी बेटावर फोरे नावाची आदिवासी जमात राहत असे. भाषा येत नसतानाही गाजूसेक यांनी या जमातीतल्या लोकांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. इथे त्यांना आदिवासींना सतावणार्‍या कुरू नावाच्या एका चमत्कारिक रोगाची माहिती मिळाली व ते या रोगावर संशोधन करू लागले.

कुरू रोगाचा रुग्ण

कुरू रोगावर संशोधन करत असताना त्यांच्या लक्षात आले की मोर्सबी बंदरावरील फोरे ही जमात शेजारच्या अंगा या जमातीप्रमाणे नव्याने मानवमांस भक्षण करू लागली होती. मिशनरी लोकांनी हे गैर आहे असे सांगेपर्यंत त्यांनी ही प्रथा चालू ठेवली. कुरू हा रोगही या जमातीत नव्याने उदयाला आला होता. जमातीतल्या बायका व लहान मुले मुख्यतः या रोगाला बळी पडत असत. एप्रिल १९५७ पर्यंत फोरे जमातीत कुरूची लागण झालेले २८ रुग्ण व १३ मृत्यु त्यांना आढळले. जून महिन्यापर्यंत मृत्यूंची संख्या दोनशेच्यावर पोहोचली होती. लागण झालेला कोणताही रोगी बरा झाला नाही. कुरूची लक्षणेही विचित्र होती. कुरूचे रुग्ण रोगाच्या सुरुवातीला चित्कारित, धक्के खात, सारखे धडपडत, भांडत, हळूहळू त्यांच्या मेंदूच्या पेशी ह्रास पावत असत. हा रोग अनुवांशिक आहे की संसर्गजन्य आहे की मानसिक आहे हे ठरवायचे गाजूसेक यांनी ठरवले. त्यासाठी मृत रोग्यांच्या मेंदूचे भाग संशोधनासाठी त्यांनी अमेरिकेत राष्ट्रीय आरोग्य संस्थेकडे (NIH) पाठवले. १९६३ साली हे भाग चिंपांझी वानरांना टोचण्यात आले. १९६५ साली या वानरांना कुरू झाल्याचे निदर्शनाला आले. याचाच अर्थ हा रोग अतिशय सावकाश पसरणारा व अपारंपारिक लक्षणांचा होता. नवीन प्रकारच्या विषाणूमुळे हा रोग होत असावा असे अनुमान गाजूसेक यांनी काढले. हे संशोधन प्रख्यात नेचर या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले.

मानवमांस भक्षण करणारी अंगा ही जमात कुरू झालेल्या वानरांच्या मेंदूची रचनाही बरीचशी स्क्रापी रोगाने दगावणार्‍या मेंढ्यासारखी होती. हे रोगजंतू कुरू रोगाने दगावलेल्या रोग्यांच्या मांसभक्षणामुळे निरोगी माणसाच्या शरीरात शिरतात हे नंतर सिद्ध झाले. पण इतर विषाणूप्रमाणे उष्णता, परिवर्तन घडवून आणणारी रसायने, अतिनील किरणे यांना कुरूचे जंतू मुळीच दाद देत नसत. त्यामुळे हे रोगजंतू नवीन प्रकारचे असावेत असे मानले जाऊ लागले. १९७४ साली स्टॅनले प्रुसिनर या शास्त्रज्ञाने प्रथिनाने बनलेल्या व सावकाश लागण करणार्‍या या अपारंपारिक संसर्गजन्य रोगजंतूचे नाव प्रीऑन असे ठेवले. १९७६ साली कुरू ह्या एका वेगळ्या संसर्गजन्य रोगाची लागण करणार्‍या रोगजंतूचा शोध लावल्याबद्धल गाजूसेक यांना अशाच प्रकारच्या अपारंपारिक हेपटायटीस-बी विषाणूवर संशोधन करणारे ब्लूमबर्ग यांच्यासह विभागून नोबेल पुरस्कार मिळाला.

गाजूसेक यांनी सुमारे १५० शोधनिबंध प्रसिद्ध केले होते आणि त्यापुढे कुरूच्या विषाणुने होणारे रोग व मानववंशशास्त्र यावर लिहिलेले त्यांचे अजून ४५० शोधनिबंध विविध वैज्ञानिक संशोधन पत्रिकांनी प्रसिद्ध केले. Acute Infectious Hemorrhagic Fever आणि Mycotoxicoses in Union of Soviet Socialist Republics ही त्यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत.

न्यू गिनी बेटावर काम करत असताना गाजूसेक यांनी एका आदिवासी मुलाला दत्तक घेतले व त्याच्या संवर्धनाची, शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. एकेक करत अशा पॅसीफिक बेटांवरून दत्तक घेतलेल्या मुलांची संख्या छप्पन्न झाली. या सार्‍या मुलांचे पालकत्व गाजूसेक यांनी पत्करले व स्वतःच्या अमेरिकेतील घरात या मुलांचे पालनपोषण केले, त्यांना उच्च शिक्षण दिले. यातील कित्येक मुले आज आपापल्या देशात नावाजलेले संशोधक किंवा शासकीय प्रशासक आहेत.

ट्रोम्सोमध्ये त्यांचे देहावसान झाले. आयुष्याच्या अंतापर्यंत ते काम करीत राहिले.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.