समाजाच्या उत्पन्नापेक्षा व्यक्तिगत उत्पन्नाशी व्यक्तीची उपभोग प्रवृत्ती निगडित असते, असे सापेक्ष उत्पन्न गृहीतकामध्ये प्रतिपादन केले आहे. जर समाजातील सर्वांचे उत्पन्न विशिष्ट प्रामाणात वाढले, तर एक व्यक्तीचे निरपेक्ष उत्पन्न वाढेल; मात्र त्याचे सापेक्ष उत्पन्न स्थिर राहील. त्यामुळे सरासरी उपभोग क्षमता कमी न होता स्थिर राहील.
उपभोक्त्याचे वर्तणूक हे ‘प्रदर्शन परिणाम’ आणि ‘रॅचेट परिणाम’ यांआधारे स्पष्ट होते, असे ड्यूसेनबरी म्हणतात. प्रदर्शन परिणाम म्हणजे, आपल्या संपर्कातील वरच्या उत्पन्न गटातील व्यक्तीच्या राहणीमानाचे अनुकरण होय. रॅचेट परिणाम म्हणजे, दातेरी चाकाची गती नियंत्रित करणारी छोटी पट्टी, जी चाकाला पुढे जाऊ देते; मात्र मागे फिरू देत नाही. जेव्हा व्यक्तीचे उत्पन्न वाढते, तेव्हा उच्च उत्पन्न गटातील व्यक्तीच्या उपभोगाशी ती स्पर्धा करते. समाजाची उपभोग खर्च करण्याची पातळी वरची असेल आणि उपभोक्ता निम्न उत्पन्न गटातील असेल, तर तो उपभोक्ता त्याच्या उत्पन्नाचे जास्त प्रमाण उपभोगासाठी वापरतो.
ड्यूसेनबरी यांनी स्पष्ट केले की, जरी व्यक्तीचे उत्पन्न कमी झाले, तरी उपभोग फारसा कमी होत नाही. उत्पन्न जास्त असताना जी उपभोग पातळी असते, तिच पातळी कायम ठेवण्याचा प्रयत्न लोक करतात. जास्त उत्पन्न असताना असणाऱ्या राहणीमानाची पातळी कमी करणे व्यक्तीला कठीण जाते. उत्पन्न कमी झाले, तरी राहणीमाणाची पातळी तिच ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच आपले उत्पन्न कमी झाले हे इतरांना समजू नये, असे त्या व्यक्तीला वाटत असते. म्हणून या गृहीतकानुसार उत्पन्न कमी झाले, तरी उपभोग त्या प्रमाणात कमी होत नाही. यालाच रॅचेट परिणाम असे म्हणतात. अमेरिकेच्या अर्थव्यवस्तेतील उपभोग-उत्पन्न संबंधाविषयी सायमन कुझनेट्स यांनी शोधून काढलेल्या निष्कर्षांना ड्यूसेनबरी यांच्या स्पष्टीकरणाने पाठबळच मिळते.
प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जे. एम. केन्स यांनी सापेक्ष उत्पन्न गृहितकाच्या आधी आपले निरपेक्ष उत्पन्न गृहितक मांडले होते. त्यामध्ये त्यांनी व्यक्तीचा उपयोग त्याच्या निरपेक्ष उत्पन्नावर अवलंबून असतो, असे प्रतिपादन केले आहे. तसेच त्यांनी उपभोगाचा मानसशास्त्रीय सिद्धांतसुद्धा मांडला आहे. या सिद्धांतानुसार उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ झाली की, उपभोगात वाढ होते; मात्र उत्पन्नातील वाढीपेक्षा उपभोगातील वाढीचे प्रमाण कमी असते. उत्पन्न आणि उपभोग यांमध्ये धन संबंध असतो. अर्थात, उत्पन्न वाढल्यास उपभोग खर्च वाढतो आणि उत्पन्न कमी झाल्यास उपभोग खर्च कमी होतो, असे केन्स यांनी प्रतिपादन केले आहे.
प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ सायमन कुझनेट्स यांनी इ. स. १८६९ ते इ. स. १९३८ या कालावधीतील अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील उत्पन्न-उपभोग यांच्यातील संबंधाची पाहणी केली. त्यांना असे आढळून आले की, उत्पन्नात पुरेशी वाढ होऊनसुद्धा सरासरी उपभोग क्षमता स्थिर राहीली आहे. केन्स यांच्या युक्तीवादाच्या विरुद्ध हा अनुभव आला होता. कुझनेट्स यांच्या या अनुभवाला ‘उपभोगाचे कोडे’ असे म्हणतात. हे कोडे सोडविण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्या वेळी जेम्स एस. ड्यूसेनबरी यांचे सापेक्ष उत्पन्न गृहीतक, फ्रॅन्को मोडिग्लिआनी यांचे जीवनचक्र गृहितक आणि मिल्टन फ्रिडमन यांचे कायम उत्पन्न गृहीतक हे तीन मध्यवर्ती उपभोग सिद्धांत मांडण्यात आले होते.
संदर्भ :
- Ahuja, H. L., Modern Economics, New Delhi.
- Duesenberry, James S., Income, Saving and the Theory of Consumer Behavior, Cambridge, 1949.
- The Review of Income and Wealth, Vol. 17, New Jersey, 1971.
भाषांतरकार : सुनील ढेकणे
समीक्षक : मुकुंद महाजन