जागतिक राजकीय, आर्थिक, व्यापार, विज्ञान इत्यादी संदर्भांतील घडामोडींचे विश्लेषण करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक साप्ताहिक. द इकॉनॉमिस्ट  या साप्तहिकाची स्थापना सप्टेंबर १८४३ मध्ये इंग्लंडमध्ये झाली. ब्रिटिश उद्योगपती आणि बँक व्यावसायिक जेम्स विल्सन हे या प्रकाशन व्यवसायाचे मूळ संस्थापक होते. हा अंक दर आठवड्याच्या गुरुवारी सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान छापायला घेतला जातो आणि शुक्रवारी तो प्रसिद्ध होऊन सर्वत्र वितरित केला जातो. जुलै २००७ पासून या साप्तहिकाची श्राव्य आवृत्तीसुद्धा (ऑडिओ एडिशन) लंडन येथून प्रसारित केली जाते. मुद्रित आवृत्तीच्या वाचक वर्गात प्रामुख्याने औद्योगिक, व्यापारी क्षेत्रातील अधिकारी वर्ग, संशोधक, पत्रकार, विद्यार्थी, राजकीय मुत्सद्दी व धोरणकर्ते यांचा समावेश आहे. एका सर्वेक्षणानुसार सुमारे दोनशे देशांमध्ये हे साप्तिाहिक वाचले जाते. वेबसाइटवर वाचणाऱ्यांची संख्या सुमारे पन्नास लाख इतकी आहे. साप्ताहिकाच्या मुद्रित आवृत्तीला पूरक म्हणून आता दैनंदिन विश्लेषणही उपलब्ध केले जाते. यातही दृक व श्राव्य असे विभाग आहेत. लंडनच्या बरोबरीने जगात एकूण वीस ठिकाणी द इकॉनॉमिस्टची संपादकीय कार्यालये आहेत. भारतात नवी दिल्ली व मुंबई येथे आहेत. भारतात वितरित होणारी आशियाई आवृत्ती असून ती सिंगापूरहून मुद्रित-वितरित होते. वर्षभरामध्ये साप्तहिकाचे ५१ अंक प्रसिद्ध होतात. वर्षातील शेवटचा अंक जोड अंक म्हणून वितरित होतो. सुरुवातीस या साप्तहिकाचा खप अगदी मर्यादित होता. या खपाच्या अधिकृत आकडेवारीनुसार इ. स. १८७७ मध्ये या साप्तहिकाचा खप ३,७००; इ. स. १९२० मध्ये ६,०००; १९६० मध्ये ३०,०००; १९७० मध्ये १ लाख आणि २०१६ मध्ये सुमारे १३ लाख इतका होता.

द इकॉनॉमिस्टच्या प्रत्येक अंकात मुख्यत: आर्थिक, राजकीय घडामोडींचे विश्लेषण, व्यापार-वित्त-बँकिंग क्षेत्रातील वार्ता, गुंतवणूक-रोजगार यांतील कल, विविध घटना-घडामोडींचा साप्ताहिक आढावा, विज्ञान-तंत्रज्ञानाचा मागोवा, धोरणात्मक-टिकात्मक-विश्लेषणात्मक लेख, पुस्तक परीक्षणे, मुलाखती, सांख्यिकी माहितीचे विश्लेषण, कल दिग्दर्शन, मृत्यूलेख इत्यादींबाबत मजकूर असतो. लेखांवर लेखकाचे नाव न छापण्याची प्रथा द इकॉनॉमिस्टने आतापर्यंत पाळली आहे. लेख बहुधा साप्ताहिकाच्या प्रतिनिधींनी वा संपादकीय विभागातील अभ्यासकांनी लिहिलेले असतात. साप्तहिकात अमेरिकेतील बातम्या व घडामोडी यांवर भर असला, तरी त्यामध्ये यूरोप, चीन, जपान, आशिया, अफ्रिका, दक्षिण अमेरिका अशा सर्व विभागांनाही उचित स्थान मिळते. जगातील बँकिंग क्षेत्र, व्यवस्थापनशास्त्रातील नवे प्रवाह, जागतिक अर्थव्यवस्था यांचा नियमितपणे आढावा येथे घेतला जातो. आर्थिक उदारमतवाद, जागतिकीकरण, मुक्त व्यापार अशी भूमिका द इकॉनॉमिस्टने घेतली आहे. उजव्या किंवा डाव्या बाजूकडे न झुकता मध्यममार्गी विचारसरणी या प्रकाशनाने अनुसरली आहे. जागतिक परिस्थितीचा सम्यक आढावा, अद्ययावत वार्तांकन, वस्तूनिष्ठ विश्लेषण, सोपी व ओघवती भाषा, समतोल दृष्टीकोन अशा गुणांमुळे द इकॉनॉमिस्ट हे साप्ताहिक जगभर वाचले जाते.

संदर्भ :

  • तळवलकर, गोविंद, वैचारिक व्यासपीठे, पुणे, २०१३.
  • Edwards, Ruth Dudley, The Pursuit of Reason : The Economist, 1843-1993, London, 1995.

समीक्षक : पी. बी. कुलकर्णी