फॅलॅपियो, गॅब्रिएल : (१५२३ – ९ ऑक्टोबर १५६२) सन १५२३ मध्ये इटालीत, मॉडेना प्रांतात गॅब्रिएल फॅलॅपियो यांचा जन्म झाला. गॅब्रिएल फॅलॅपियो हे त्यांच्या गॅब्रिएलो फॉलॉपियस, फॉलॉपियो, फॉलापियो किंवा फॅलॅपियस अशा लॅटिन नावाने ही ओळखले जात. समाजात उच्च कुलीन असले तरी त्यांचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या गरीब होते. खूप कष्ट करून त्याना शिक्षण घ्यावे लागले. १५४२ साली पैसे मिळवण्यासाठी मॉडेनातील चर्चमध्ये धर्मकृत्ये करणारा पुरोहित म्हणून त्यानी नोकरी केली. फॅलॅपियो यांनी यूरोपातील त्या काळातील उत्तमांतील एक, अशा फेरारा विद्यापीठात, वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले. गेलन आणि काप्री या वैद्यक तज्ज्ञांच्या ग्रंथांचा त्यांनी कसून अभ्यास केल्यावर त्यांना डॉक्टर ऑफ मेडिसीन पदवी मिळाली. अँटोनियो मुसा ब्रासावोला हे किंग्स फ्रान्सिस पहिले, चार्ल्स पाचवे, हेन्री आठवे या राजांचे ते वैद्यकीय सल्लागार होते. ते फॅलॅपियो यांचे गुरू होते. ब्रासावोला, ऑर्किड वनस्पतींच्या अभ्यासासाठी प्रसिद्ध होते. आवश्यकतेनुसार रुग्णाची श्वासनलिका उघडून जीव (Tracheotomy) वाचविण्याच्या शल्यक्रियेत ही वाकबगार होते. अँड्रीयस व्हेसॅलीयस या जगद्विख्यात फ्लेमिश शल्यतज्ञाकडून फॅलॅपियो यांना मार्गदर्शन मिळाले. पुढे विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापकाचे काम करून त्यांनी अनुभव मिळविला. १५४९ मध्ये त्यांना फेरारा विद्यापीठाने औषधी निर्माणशास्त्राचे  प्राध्यापकपद दिले. नंतर फॅलॅपियो यांना पिसा या इटालीतील सर्वोत्कृष्ट विद्यापीठातून शरीररचनाशास्त्रच्या प्राध्यापकपदाचे निमंत्रण मिळाले. त्यांची कीर्ती माहीत असलेल्या ड्युक ऑफ फ्लोरेन्स, कॉसिमो मेडिसी यांनी फॅलॅपियो यांची नेमणूक केली होती. त्यांना सन्मानपूर्वक शरीररचना शास्त्र आणि शल्यक्रियाशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून पादुआ विद्यापीठातून पाचारण करण्यात आले. याशिवाय वनस्पतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक आणि वनस्पती उद्यानाचा पर्यवेक्षक अशी पदे त्यांनी त्याच काळात स्वीकारली. सतत काम करून त्यांनी तीनही पदांना यथोचित न्याय दिला.

फॅलॅपियो यांचे सर्वात प्रसिद्ध शिष्य होते, हायरोनिमस फॅब्रिसियस. त्यांनी दे फॉर्मतो फीतो (‘ऑन फॉर्मेशन ऑफ फीटस’) हा पथदर्शक ग्रंथ लिहून माणसासह बऱ्याच प्राण्यांची अपरा , नाळ आणि भ्रूणवाढ यांच्या तुलनात्मक अभ्यासाचा पाया घातला. फॅलॅपियो यांचे शिष्य फॅब्रिसियस व त्यांचे शिष्य डॉ. विल्यम हार्वे अशी गुरुशिष्य परंपरा निर्माण करण्यात फॅलॅपियो यशस्वी झाले. फॅलॅपियो सोळाव्या शतकातील अत्यंत अभ्यासू, ज्ञानी, डॉक्टर आणि शरीररचना शास्त्रज्ञ होते.  त्यानी शोधलेल्या मानवी शरीररचनांवरून त्यांच्या ज्ञानाची आणि कुशलतेची कल्पना येते.

फॅलॅपियो यांना स्त्रीबीजवाहक नलिकांची जोडी गर्भाशयाला जोडलेली असते हे ठाऊक होते. गर्भाशय जनावराच्या डोक्यासारख्या आकाराचा मानला तर स्त्रीबीजवाहक नलिकांची जोडी शिंगांप्रमाणे वाटते. या नलिकांचे अरुंद टोक गर्भाशयाकडे असते. दूरच्या टोकाचा भाग नरसाळ्यासारखा पसरट दिसतो. त्याच्या कंकणासारख्या परीघावर झालरीला असतात तशा झिरमिळ्या (Fimbriae) असतात. तुतारीप्रमाणे दिसणाऱ्या या नलिकांचा पृष्ठभाग गुळगुळीत व चमकदार असतो. त्यांनी सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वी अचूक निरीक्षण करून लिहून ठेवलेले स्त्रीबीजवाहक नलिकांचे वरील वर्णन अजूनही समर्पक आहे. या कामाचे श्रेय म्हणून मानवी स्त्री-जनन संस्थेतील स्त्रीबीजवाहक नलिकांना (फॅलोपियन Fallopian tubes) त्यांचे नाव दिले गेले.

फॅलॅपियो यांनी मानवी डोक्याच्या रचनेचा अभ्यास केला. बाह्यकर्णाच्या आत आणि मध्यकर्णाच्या सुरुवातीला असणाऱ्या कानाच्या पडद्याबाबत आणि कानाच्या आतील भागाबद्दल पूर्वी माहीत नसलेली अनेक निरीक्षणे फॅलॅपियो यांनी नोंदून ठेवली. कवटीच्या आठ हाडांपैकी एथमॉईड (ethmoid bone) या जोडीने असणाऱ्या हाडाचे आणि त्यातील पोकळ्यांचे अस्तित्व प्रथम त्यांच्या लक्षात आले. एथमॉईड डोळ्याच्या खोबणीत नाकाकडच्या बाजूला असते. ते गाळणीसारखे सच्छिद्र असते. असे त्याचे तपशीलवार वर्णन फॅलॅपियो यांनी लिहून ठेवले आहे.

फॅलॅपियो यांना लहान बालकात दुधाचे दात असतात. दंत कलिकेपासून दात तयार होतो. प्राथमिक संचातील दुधाचा दात नंतर तयार होणाऱ्या पक्क्या संचातील दाताकडून ढकलला जातो आणि पडतो. ती जागा द्वितीयक संचातील दात घेतो हे लक्षात आले. हे ज्ञान त्याकाळी नवे होते. मूत्राशयाच्या (युरीनरी ब्लॅडर- urinary bladder) भिंतीत स्नायूंचे तीन थर असतात हे प्रथम फॅलॅपियो यांच्याच दृष्टीस आले.

फॅलॅपियो यांनी परीघवर्ती चेतासंस्थेतील मेंदूला जोडलेल्या सातव्या क्रमांकाच्या चेतेचा शोध लावला. या मज्जातंतूचा म्हणजे आनन चेतेचा (फॅसियल नर्व्हचा facial nerve) उगम, शाखा, मार्ग, रचना इ. तपशील नोंदला. ही नलिका काना भोवतालच्या हाडातून कशी बाहेर पडते ते त्यांनी तपासले. ज्या नालिकेतून (canal) मधून आनन चेता बाहेर पडते त्या नलिकेला साहजिकच फॅलॅपियोची नलिका (Fallopian Canal) हे नाव देण्यात आले. फॅलॅपियो यांचे नाव त्यांनी शोधून काढलेल्या एका अस्थिरज्जूला (ligament) देण्यात आले आहे. जांघेच्या जवळील भागात धड आणि मांडी जोडली जाते तेथे नलिकेत हा अस्थिरज्जू असतो. त्यातून जाणारे स्नायुपुच्छ, धमन्या, नीला, रसवाहिन्या यांना आधार देणे हे काम हा फॅलॅपियो यांचा अस्थिरज्जू करतो. तो दुबळा आणि परिणामी शिथिल झाला तर अंतर्गल म्हणजे हर्निआ (hernia) होतो. डोळ्यातून नाकाकडे अश्रू वाहून नेणारी अश्रू नलिका (lacrymal duct)  फॅलॅपियो यांनीच प्रथम पाहिली. तिच्या रचनेबद्दल नोंद करून ठेवली.

फॅलोपियन नलिकेच्या भिंतीत असणारा स्नायू अनैच्छिक असल्याचे समजल्यानंतर त्याचे  ‘फॅलोपियन स्नायू’ हे नाव वापरणे बंद केले गेले. त्यांच्या पूर्वीच्या व्हेसॅलियस या नामांकित शल्य विशारदाना माहीत असलेल्या स्नायूंबद्दलच्या ज्ञानात त्यांनी भर घातली. व्हेसॅलियस यांचे दे ह्युमानी कॉर्पोरा फॅब्रिका अर्थात मानवी शरीर रचना हे पुस्तक जगभर मान्यता पावलेले होते. त्याच धर्तीवर फॅलॅपियो यांनी ‘ऑबझर्वेशन्स ॲनाटॉमिक’ (Observationes Anatomice) हा ग्रंथ १५६१ मध्ये प्रकाशित केला. प्रत्यक्ष विच्छेदन करून त्यांनी पूर्वी केलेली तज्ञांची निरीक्षणे चुकीची आहेत हे दाखवून दिले. बाह्य कर्णाचे नीट निरीक्षण करण्यासाठी धातूच्या चकचकीत पृष्ठभागाचा वापर करता येईल हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कानात उजेड पाडता येईल असे छोट्या आरशासारखे उपकरण प्रथमच वापरायला सुरुवात केली. कानाच्या विकारांचे निदान करण्यास आणि त्या विकारांवर उपचार करण्यासाठी त्यांचे ऑरल स्पेक्युलम (Aural speculum) हे उपकरण उपयोगी ठरले.

व्रण (ulcer) आणि अर्बुद (गाठ/ tumor) या विषयावर त्यांनी एक ग्रंथ लिहून प्रकाशित केला. शल्यक्रियाशास्त्र विषयावर आणि हिप्पोक्रिटसने लिहिलेल्या डोक्याच्या जखमा या पुस्तकावर त्यांनी स्वतःची टिपणेही प्रकाशित केली. त्याकाळात फॅलॅपियो यांचे लैंगिकता या विषयावर निर्विवाद प्रभुत्व आहे असे मानले जाई. कंडोम या गर्भानिरोधानासाठी वापरण्याच्या साधनाबद्दल त्यांनी लिहिले आणि सिफिलीससारख्या गुप्त रोगांपासून बचाव करण्यासाठी कंडोम वापरावे याची शिफारस केली. अकराशे पुरुषांना अशी साधने वापरण्यास उद्युक्त करून त्यांनी आपले प्रतिपादन किती खरे आहे याचा आढावा घेतला. त्यांचे हे काम त्यांच्या हयातीत प्रकाशित झाले नाही. पुढे व्होल्चर कॉयटर या त्यांच्या विद्यार्थ्याने हे लिखाण प्रकाशात आणले. फॅलॅपियो यांच्या अन्य विषयांवरील नोंदींसह प्रसिद्ध केलेल्या या इटालियन पुस्तकाचे नाव होते, लेक्शन्स गॅब्रिएलिस फॅलोप्पी.

फॅलॅपियो यांना फुप्फुसाचा क्षय रोग झाला आणि त्यांची कार्यक्षमता कमी होत गेली. शेवटी वयाची चाळीशी पूर्ण होण्याआधीच त्यांचा पादुआ इटाली येथे मृत्यू झाला.

संदर्भ :

 समीक्षक : मोहन मद्वाण्णा