गुडॉल, व्हॅलेरी जेन मॉरीस : (३ एप्रिल १९३४) लंडनच्या हॅम्पस्टेड भागात जेन गुडॉल यांचा जन्म झाला. जेन गुडॉल यांचे पूर्ण नाव, व्हॅलेरी जेन मॉरीस गुडॉल आहे. जेन या जवळच्या गावी अपलँडस् स्कूलमध्ये जात असत. जेन यांना प्राणी आवडत म्हणून वडलांनी त्यांना एक कापडी चिंपँझी खेळणे म्हणून दिले होते. जेन यांनी त्याला ज्युबिली असे नाव दिले होते. जेन यांना आफ्रिकेतील जंगल तसेच तेथील वन्य प्राण्यांचे खाद्य, सामाजिक वर्तन यांचे कुतूहल वाटे. शालेय शिक्षण अठराव्या वर्षी पूर्ण झाल्यानंतर किरकोळ नोकऱ्या करून जमवलेल्या भांडवलावर त्यांनी आफ्रिका गाठली. जगप्रसिद्ध जीवाश्म आणि मानववंशशास्त्रज्ञ लुई लिकी यांच्या संशोधनात जेन मदत करू लागल्या. लिकी यांनीच जेन यांना माणसाला सर्वांत जवळ असलेल्या प्राण्यावर म्हणजे चिंपँझीवर संशोधन करण्याची प्रेरणा दिली.
जेन आईबरोबर टांझानियात (पूर्वीचे टांगानिका) पोहोचल्या. गोम्बी अभयारण्यात लिकी यांनी अगदी प्राथमिक सोयी असलेले संशोधन केंद्र उभारायला साह्य केले. नॅशनल जिओग्राफिक आस्थापनेतील वन्यजीव छायाचित्रकार, ह्युगो व्हान लाविक यांनी जेन यांच्या कामाचे छायाचित्रण, स्थिरचित्रे आणि चित्रफिती करण्यासाठी पाठवून दिले.
केवळ सव्वीस वर्षांच्या आणि पूर्णतः अननुभवी असूनसुद्धा त्या दररोज वही आणि पेन घेऊन जंगलात निरीक्षणासाठी बसत. त्यांना दूरवर चिंपँझी दिसले तरी चिंपँझी अनोळखी व्यक्तीपासून दूर जात. चिंपँझीना या व्यक्तीपासून आपल्याला धोका नाही याची खात्री झाल्यावर त्यांच्यामधील अंतर कमी होऊ लागले.
एकदा जेन एकेक बेदाणा तोंडात टाकत जंगलातील मोकळ्या जागी काही तरी विचार करत बसल्या होत्या. डोळ्याच्या कोपऱ्यातून त्यांना एक चिंपँझी (डेव्हिड) आपल्याकडे रोखून पहात आहे असे लक्षात आले. तेव्हा जेन यांनी तळहातावर एक बेदाणा ठेऊन तो हात चिंपँझीकडे सरकवला. थोडा वेळ गप्प निरखत राहून चिंपँझीने त्यांच्या तळहातावरचा बेदाणा स्वतःचा हात लांब करून उचलला. या क्रियेने चिंपँझीचा विश्वास आपण प्राप्त करून घेतला आहे हे त्यांना समजले. एकदा त्या नोंदी करत बसल्या असताना एक चिंपँझी बालक दबकत, चालत त्यांच्याकडे आले. जेन हालचाल न करता पाहत राहिल्या. त्या बछड्याने एक हात लांबवला तर्जनी लांब करून त्यांच्या नाकाला टेकवली. एवढा स्पर्श करून तो बच्चा दूर पळाला. आपल्यापेक्षा वेगळा प्राणी पाहून उत्सुकता वाटलेल्या माणसाच्या मुलानेही असेच केले असते असे जेन यांना वाटले.
चिंपँझी पूर्णत: शाकाहारी असतात असा समज होता. चिंपँझी कीटक खातात. एवढेच नाही तर कोलोबस जातीची छोटी माकडे आणि इतर छोटे प्राणी संगनमताने कोंडी करून शिकार करून खातात असे जेन यांच्यामुळे समजले. चिंपँझींच्या गटात शारीरिक ताकदीप्रमाणेच आवाज मोठा असणे महत्त्वाचे असते. कारण शत्रूला पळवून लावण्यास मोठा आवाज उपयोगी पडतो. डेव्हिड नावाच्या लहानशा चिंपँझीचा आकार आणि आवाजही लहान होता. एकदा त्याला जेनच्या तंबूत बिस्किटांचा पत्र्याचा रिकामा डबा सापडला. तो घेऊन डेव्हिड बाहेर पळाला. डब्यावर हाताने ठोकत, उतारावर डबा घरंगळवत धावू लागला. स्वतःबरोबर सतत डबा बाळगणे आणि जंगलात घुमत राहील असा आवाज करत राहणे; यामुळे त्याला गटात पदोन्नती मिळाली. आता तो अधिकारक्रमात अव्वल गणला जाऊ लागला. डबा फुटून त्यातून घनगंभीर आवाज येणे बंद होईपर्यंत डेव्हिडचा अव्वल क्रमांक टिकला. नंतर मात्र त्याला पदावनती स्वीकारावी लागली. जेन या मानव असूनही गोम्बीतील चिंपँझींनी त्यांचा स्वतःच्या टोळीत समावेश केला होता. सुमारे दोन वर्षे जेन एका टोळीतील सर्वांत शेवटच्या क्रमांकावरच्या अतिदुबळ्या चिंपँझी-सदस्या होत्या.
चिंपँझींचा व्यक्ती म्हणून जेन यांनी अभ्यास केला. दोन प्रौढ व्यक्तींचे एकमेकांशी, आई आणि मुलाचे, भावंडांचे आपसात, प्रौढ व्यक्तींचे गटात- सामाजिक वर्तन, चिंपँझींच्या दोन गटांचे जमिनी क्षेत्रावर मालकी अधिकार राखतानाचे वर्तन, अशा बाबींचे निरीक्षण आणि नोंदी जेन यांनी ठेवल्या. चाणाक्ष डेव्हिड, कपटी माईक, धीट गटप्रमुख गोलिॲथ, दांडगा हम्फ्रे, माणसाच्या मुलांवर माया करणारी गिगी मावशी, फ्लो माता आणि तिची मुले – फिगन, फेबन, फ्रॉइड, फिफी, आणि फ्लिंट, जेन यांना टोळीतून हाकलून काढणारा फ्रोडो या चिंपँझींचे वर्णन जेन यांनी केले आहे. जेन यांची हजारो टिपणे युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटाने अभ्यासकांसाठी जपून ठेवली आहेत. जेन निरीक्षणे करत असलेल्या गटातील चिंपँझींना त्यांच्या नावाने ओळखत.
जेन यांच्या नोंदींमुळे प्राणीशास्त्र, प्राणीवर्तनशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र अशा ज्ञानशाखांना विश्वासार्ह माहितीचा मोठा खजिनाच उपलब्ध झाला. देशोदेशीचे अनेक विद्यार्थी चिंपँझींचा आणि त्यातून मिळू शकणाऱ्या मानव पूर्वजांचा अभ्यास करण्यासाठी जेनकडे येऊ लागले.
चिंपँझीं झाडाच्या छोट्या फांदीचा हत्यार म्हणून उपयोग करतात. जेन यांच्या संशोधनाने हत्यार वापरणारा आणि बनवणारा प्राणी म्हणजे माणूस ही माणसाची व्याख्या अपुरी आणि संदिग्ध ठरली. वारुळात डहाळी अलगद खुपसून त्यावरील मुंग्या खाण्याची युक्ती लहान चिंपँझी मोठ्या चिंपँझींचे निरीक्षण करून शिकतात.
जेन यांना विज्ञानातील वा अन्य कोणत्याच ज्ञानशाखेमधील पदवी नव्हती. तरीही त्यांच्या प्रभावशाली, मूलगामी, क्रांतिकारी संशोधन कार्याचे महत्त्व केंब्रिज विद्यापीठाने लक्षात घेतले. त्यांच्या गुणवत्तेला झुकते माप देऊन पारंपरिक निकषांवर अडून न राहता, थेट पीएच्.डी.साठी प्रवेश दिला.
रॉबर्ट हिन्ड यांच्या मार्गदर्शनाखाली जेन यांनी ‘स्वतंत्र राहणाऱ्या चिंपँझीचे वर्तन’ या शीर्षकाचा प्रबंध सादर केला. केंब्रिज विद्यापीठाने त्यांना प्राणीवर्तनविज्ञान शाखेतील पीएच्.डी. दिली. केवळ संशोधन करून, पीएच्.डी. मिळवण्याचे हे उदाहरण दुर्मीळ आहे. टांझानिया मुक्त विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट दिली. आतापर्यंत पाचही खंडांतील सुमारे पंचेचाळीस विद्यापीठांनी त्याना मानद डॉक्टरेट पदव्या दिल्या आहेत.
टांझानियातील गोम्बी अभयारण्य येथे प्रथम पोहोचलेल्या जेन यांनी सलग पंधरा वर्षे तेथेच वास्तव्य केले. क्वचित प्रवासासाठी बाहेर गेलेला काल सोडला तर त्या सतत चिंपँझींच्या सहवासात होत्या. माणसांप्रमाणे दीर्घ, पन्नास वर्षे जगणाऱ्या चिंपँझींमध्ये राग, लोभ, मैत्री, वैर अशा भावना असतात. एखादा चिंपँझी मेला तर त्याचे कुटुंबीय, गटमित्र, अतिशय दुख्खी होतात, दीर्घ काल विमनस्क राहतात. मातेच्या निधनामुळे त्यांना दु:ख होऊन पिलांचा अतिशोकामुळे मृत्यू होतो हे त्यांनी नोंदवले. चिंपँझी एकमेकाना बिलगतात, पाठीवर थोपटतात. गुदगुल्या करतात, हाताने स्पर्श करून आश्वस्त करतात.
वैज्ञानिक शिस्तीचा भाग म्हणून अभ्यास विषय असलेल्या चिंपँझींना त्यांनी क्रमांक द्यायला हवे होते. नावे नाही. अभ्यासविषय असलेल्या चिंपँझींमध्ये भावनिक गुंतवणूक असता कामा नये हा संकेत त्यांनी धुडकावून लावला. माणसाच्याच स्वार्थी आणि अज्ञानमूलक कृत्यांतून चिंपँझी जातच नष्ट होत चालली आहे. आफ्रिकेत वीस लाखांवरून त्यांची संख्या आता केवळ दीड लाखांवर आली आहे.
जेन यांनी आपल्या अनेक दशकांच्या अभ्यासावर आधारित तीस पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी इन द शॅडो ऑफ मॅनची अठ्ठेचाळीस भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. द चिंपँझींज् ऑफ गोम्बी: पॅटर्नस् ऑफ बिहेवियर्स रीझन फॉर होप; माय लाईफ विथ द चिंपँझींज्, द टेन ट्रस्टस्: व्हॉट वी मस्ट डू तो केअर फॉर द ॲनिमल्स वी लव्ह; थ्रू अ विंडो, हार्वेस्ट फॉर होप; आफ्रिका इन माय ब्लड ही पुस्तके देखील लोकप्रिय आहेत. लहान मुलांसाठी जेन यांची अकरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
जेन यांनी लिहिलेले संशोधनपर लेख वानरशास्त्रज्ञ, कपितज्ज्ञ मानवी उत्क्रांतीशास्त्र अभ्यासकांना उपयुक्त ठरले आहेत. जर्नल ऑफ व्हायरॉलॉजी; नॅशनल जिओग्राफिक; कॉन्झरव्हेशन बायॉलॉजी; अमेरिकन जर्नल ऑफ प्रायमेटॉलॉजी; सायन्स; नेचर; PLOS–पॅथोजेन्स; प्रोसीडिंग्स ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, बिहेवियरल इकॉलॉजी अँड सोशिओबायॉलॉजी; करंट अँथ्रॉपॉलॉजी; ॲनिमल बिहेवियर इ. नियतकालिकांत, मासिकांत प्रकाशित झाली आहेत.
जेन यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. त्यापैकी प्रमुख म्हणजे मेडल ऑफ टांझानिया, नॅशनल जिओग्राफिक सोसायटीतर्फे हबर्ड मेडल, जपानमधील सर्वोच्च सन्मानदर्शक क्योतो पुरस्कार. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधनासाठीचा स्पेनच्या राजकुमारातर्फे दिला जाणारा ॲस्तुरियास अवॉर्ड आणि जीवशास्त्राचे बेंजामिन फ्रँकलिन मेडल, अहिंसेसाठीचा महात्मा गांधी पुरस्कार आदी बहाल करण्यात आले. डेम कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर असा किताब, टायलर प्राईझ एन्व्हायरॉनमेंटल अचीव्हमेंट, फ्रांसचे पंतप्रधान, डॉमिनिक दे विलेपीन यांच्याकडून लीजन द हा सन्मान, युनेस्कोचे सुवर्णपदक, टेम्पलटन प्राईझ मिळाले. जेन यांनी कॅलिफोर्निया येथे जेन गुडॉल इन्स्टिट्यूटची स्थापना केली. सध्या या संस्थेचे मुख्य कार्यालय वॉशिंग्टन डी.सी. मध्ये आहे.
जेन यांच्या जीवनकार्यावर आधारित चाळीसपेक्षा जास्त लघु चित्रपट निघाले. मिस गुडॉल अँड द वाइल्ड चिंपँझींज्; जेन गुडॉल अँड द वाइल्ड डॉग्स ऑफ आफ्रिका; लायन्स ऑफ सेरेन्गेटी; ॲनिमल माइन्ड्स इत्यादी. त्यातील काही नॅशनल जिओग्राफिक सोसायटी, बीबीसीसारख्या काही मातब्बर संस्थांनी किंवा त्यांच्या मदतीने तयार केल्या गेल्या आहेत.
जेन आज वयाच्या सत्त्त्याऐंशीव्या वर्षीसुद्धा जेन गुडॉल इन्स्टिट्यूटच्या विविध उपक्रम आणि प्रकल्प या विषयी माहिती द्यायला, पर्यावरण रक्षणात युवकांना सामील करून घ्यायला वर्षाचे तीनशे दिवस प्रवास करतात. जगभरातील युवा संघटित होऊन जेन यांनी सुरू केलेल्या ‘रूट्स अँड शूट्स’ मोहिमेला साथ देईल याची त्यांना खात्री वाटते.
संदर्भ :
- https://www.britannica.com/biography/Jane-Goodall
- https://www.janegoodall.org/our-story/where-in-the-world-is-jane/
- https://www.c-span.org/video/?288835-1/hope-animals-world video clip 1:16:26
- https://www.whyarewehere.tv/people/jane-goodall/
समीक्षक : मोहन मद्वाण्णा