मिलर, ऑस्कर : ( १२ एप्रिल, १९२५ – २८ जानेवारी, २०१२) ऑस्कर ली मिलर (ज्युनिअर) यांचा जन्म नॉर्थ कॅरोलिना राज्यातल्या गस्तोनिया या शहरात झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ऑस्कर मिलर यांनी अमेरिकेच्या आरमार दलात तीन वर्षे काम केले. त्यानंतर कृषी विज्ञानात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी उत्तर कॅरोलिना स्टेट विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे कृषीविज्ञानाचे पदवीपर्यंतचे व पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे वनस्पती अनुवांशिकशास्त्रात पीएच्. डी. चे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी मिनेसोटा विद्यापीठात प्रवेश घेतला. पीएच्. डी. पूर्ण करून ओक रिज राष्ट्रीय प्रयोगशाळेत त्यांनी संशोधन सहाय्यक म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली आणि वनस्पती रेण्वीयजीवशास्त्र विषयात काम केले. १९६० च्या दशकात डीऑक्सिन्युक्लीईक अम्लाचे कार्य माहिती झाले होते. पण लहान आकाराचे गुणसूत्र आणि त्याच्याहुन कितीतरी हजारपटींनी लहान असलेले जनुक मानवी डोळ्यांना दिसावे तरी कसे? पण ती कल्पना ऑस्कर मिलर यांनी साकार केली. पेशीच्या केंद्रकामध्ये गुणसूत्र अतिशय छोटी गुंडाळी (supercoil) करून बसलेले असते. त्याची संरचना तपासण्यासाठी ती गुंडाळी गुंता होऊ न देता हलक्या हाताने सोडवणे आवश्यक होते. हे घडवून आणणारा उत्कृष्ट प्रशालक (detergent) शोधणे मुश्किल काम होते पण चिकाटी न सोडता मिलर यांनी कित्येक वर्षांनंतर असा आदर्श प्रशालक निर्माण केला आणि इतक्या उच्च दर्जाचे तंत्र विकसित केले की आज सुद्धा त्यात कणभर बदल घडवून आणणे भल्याभल्यांना जमलेले नाही. नुसती गुणसूत्राची रचना पाहणे हा त्यांचा हेतू नव्हता तर त्यावरचे रायबो न्यूक्लीईक अम्ल बनवीत असलेले जनुक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरून पहाण्यात त्यांना रस होता. त्यांनी त्यासाठी विकसित केलेल्या तंत्राला ‘क्रोमॅटीन स्प्रेडतंत्र’ (chromatin spread Technique) असे नाव आहे.

क्रोमॅटीन स्प्रेड तंत्र

वरील इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या सहाय्याने घेतलेल्या फोटोमध्ये आपल्याला बारीक सुतासारखे सरळ झालेले डीएनएचे बनलेले गुणसूत्र व त्यावरील क्रिसमस ट्री सारखे दिसणारे रायबोन्यूक्लीईक आम्ल बनवणारे जनुक अशा दोन्ही गोष्टी दिसतात. रायाबोसोमल रायबोन्यूक्लीईक आम्ल बनवणारी कित्येक जनुके आपल्या गुणसूत्रांवर असतात आणि एका जनुकाशी संपर्क करून अनेक रायबोसोम्स एकाच वेळी एकाच प्रकारचे रायाबोसोमल रायबोन्यूक्लीईक अम्ल बनवीत असतात. रायबोसोम्स जसे जनुकांवर पुढेपुढे सरकतात तसे तयार झालेले रायाबोसोमल रायबोन्यूक्लीईक अम्ल बाजूला पसरताना दिसते. संश्लेषणाच्या सुरुवातीला रायाबोसोमल रायबोन्यूक्लीईक अम्लाची साखळी लहान असते पण पुढेपुढे जाणार्‍या रायबोसोम्स भोवती वाढत किंवा पसरत जाणारी रायबोन्यूक्लीईक अम्लाची साखळी नजरेस पडते म्हणून या तंत्राला ‘क्रोमॅटीन स्प्रेड तंत्र’ असे नाव पडले. हे तंत्र अक्षरश: हजारो संशोधकांनी वापरले. रेण्वीय जीवशास्त्राची ही सुरुवात मानली जाते.

वर्जिनिया विद्यापीठाच्या कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या शिक्षक वर्गात ते एक प्रोफेसर म्हणून सामील झाले. मिलर यांचे संशोधन विज्ञान, पेशी विज्ञान, पेशी जीवशास्त्र यांसारख्या विख्यात संशोधन पत्रिकांत प्रसिद्ध झाले आहे.

मिलर यांना अनेक फेलोशिप्स मिळाल्या. जर्मनी येथील मॅक्स प्लांक संस्था, कॅलटेक संस्था तसेच कॅलिफोर्निया विद्यापीठात त्यांची व्हीजीटिंग प्रोफेसर म्हणून नेमणूक झाली होती. कॉमनवेल्थच्या रेण्वीय जीवशास्त्र विभागात ते ज्येष्ठ फुलब्राइट स्कॉलर म्हणून प्रख्यात होते. १९९५ मध्ये सत्तर वर्षांचे असताना ते जेव्हा वर्जिनिया विद्यापीठातून निवृत्त झाले तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ ऑस्करफेस्ट नामक एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. वर्जिनिया समाजाने त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला. प्रोफेसर इमेरीटस म्हणून ते निवृत्त झाले तरीही प्रथम वर्षाच्या मुलांना आपला प्रख्यात रेण्वीय जीवशास्त्र हा विषय शिकवणे त्यांनी सोडले नाही. पियानो वाजवायला किंवा कविता करायला त्यांना आवडत असे.

वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे