रूफिनी, ॲन्जेलो:  (१७ जुलै १८६४ – ७ सप्टेंबर १९२९) ॲन्जेलो रूफिनी यांचा जन्म इटालीतील अर्केता देल त्रोन्तो राज्यातील प्रितरे येथे झाला. रूफिनी यांचे शालेय शिक्षण इटालीतील आस्कोली, पिसेनो येथे झाले. त्यांनी इटालीतील बोलोन्या विद्यापीठात वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले. वैद्यकीय शिक्षण चालू असतानाच त्यानी एक छोटीशी ऊतीशास्त्र प्रयोगशाळा सुरू केली. त्यात अनेक प्रकारच्या प्राण्यांच्या ऊतींचे नमुने तपासून प्राणी शरीररचनांचा तुलनात्मक अभ्यास केला.

तेथील मुख्य डॉक्टर ऑगस्तो मरी यांनी रूफिनी यांची बोलोन्या विद्यापीठाच्या सूक्ष्मदर्शक प्रयोगशाळेचा मुख्य म्हणून नेमणूक केली. अनुभव घेऊन ते बोलोन्या विद्यापीठात ऊतीशास्त्र म्हणजे पेशीसमूहांच्या रचना आणि ऊतींची कार्ये याबद्दल शिकवू लागले. आर्थिक अडचणीमुळे रूफिनी यांना ग्रामीण भागात डॉक्टरी सेवेवर रूजू व्हावे लागले. पुढे लुसिग्नॅनो, अरेझ्झो येथे ते एका लहान इस्पितळाचे संचालक पद सांभाळू लागले. परंतु तेथेही सहा वर्षांच्या सेवाकाळात, स्वखर्चाने, छोटी प्रयोगशाळा स्थापून ऊतीशास्त्राचे संशोधन त्यांनी चालूच ठेवले. कालांतराने शोधनिबंध प्रकाशित करताना या परिश्रमांचा रूफिनी यांना फायदा झाला.

लुसिग्नॅनो, अरेझ्झोमधील सिएना विद्यापीठाशी संलग्न इन्स्टिट्यूट ऑफ ॲनाटॉमी येथे, अभ्यासात रस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ऊतीशास्त्रावर व्याख्याने दिली. नंतर रूफिनी यांना सिएना विद्यापीठात भ्रूणशास्त्र विषयाचे प्राध्यापक पद मिळाले. दोन वर्षांनी ते सिएना विद्यापीठात भ्रूणशास्त्र विषयाच्या प्रमुख प्राध्यापक पदावर विराजमान झाले. काही काळाने, ते पुन्हा बोलोन्या विद्यापीठात आले. तेथे ऊतीशास्त्र आणि शरीरक्रियाशास्त्र विषयाचे प्राध्यापक या पदावर त्यांची नेमणूक झाली. त्यांचे निधन होईपर्यंतचा दीर्घकाळ ते बोलोन्या विद्यापीठातच राहिले.

रूफिनी यांचे महत्त्वाचे संशोधन म्हणजे त्यांनी संवेदी चेतातंतूंच्या टोकाशी असलेल्या अतिसूक्ष्म पसरट बशीसारख्या भागांचे (mechanoreceptor corpuscles) अस्तित्व दाखवून दिले. या शोधाचे श्रेय म्हणून या संवेदी टोकाना रूफिनीच्या स्पर्शसंवेदी कणिका असे नाव दिले गेले. चेतासंस्थेचे भाग साधारणत: फिकट पांढऱ्या, करड्या रंगाचे, परिणामी सहज न दिसणारे असतात. यावर उपाय म्हणून त्यांनी ऑरिक (Auric) क्लोराईड, हे सुवर्ण संयुग वापरले. त्यामुळे संवेदी चेतातंतूंची टोके अधिक स्पष्ट दिसू लागली.

रूफिनी यांनी भ्रूणशास्त्राच्या ज्ञानातही प्रयोग आणि निरीक्षणे करून मोलाची भर घातली. बेडूक त्यांची अंडी शरीराबाहेर गोड्या पाण्यात घालतात. फलनानंतर त्यांची वाढ होते. बेडकांची फलित अंडी पाण्यातून मिळवणे आणि त्यांची वाढ अभ्यासणे तसे सोपे असते. रूफिनी यांनी बेडकांसारख्या उभयचर प्राण्यांच्या (amphibian) अंड्यांचा आणि त्यांत वाढणाऱ्या भ्रूणांचा अभ्यास केला. सुरुवातीला फलित अंड्यात एक पेशी नंतर तिचे विभाजन होऊन अनेक पेशी बनतात. याला कोरकपुटी म्हणतात. कालांतराने त्याच्या एका बाजूला एक सूक्ष्म छिद्र किंवा कोरक रंध्र (ब्लास्टोपोअर, blastopore) तयार होते. ते भविष्यात गुदद्वारात रूपांतरित होणार असते. भ्रूणपृष्ठावरील पेशी त्या सूक्ष्म कोरक रंध्रातून भ्रूणाच्या अंतर्भागात जाऊन त्याची अन्न नलिका तयार होते. या भ्रूणविकास प्रक्रियेला आद्यभ्रूणन (गॅस्ट्रुलेशन, gastrulation) म्हणतात.

रूफिनीच्या स्पर्शसंवेदी कणिका

ही सारी निरीक्षणे रूफिनी यांनी त्यांच्या फिजिओजेनिया (‘Fisiogenia’) म्हणजे शरीरनिर्मिती या पुस्तकात लिहून ठेवली आहेत. फिजिओजेनियामधील मजकूर इटालियन आणि इंग्रजी भाषेत आहे. पुस्तकात चौसष्ट आकृत्या आहेत. बेडकांसारख्या उभयचर प्राण्यांच्या अंड्यापासून, त्यांत वाढणाऱ्या भ्रूणाचा क्रमशः विकास कसा होत जातो त्याचे सविस्तर, सचित्र वर्णन या पुस्तकात आहे.

आपले संशोधन या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांना माहीत व्हावे अशी रूफिनी यांची इच्छा होती. म्हणून त्यानी संवेदी चेतातंतूंच्या टोकाशी असलेल्या अतिसूक्ष्म पसरट भागांबद्दल चार्ल्स शेरींग्टन यांना कळवले. शेरींग्टन आणि रूफिनी सतत सात वर्षे पत्रसंपर्कात असत. चार्ल्स शेरींग्टन स्वतः चेतापेशींवरील त्यांच्या कामासाठी १९३२ चे शरीरक्रियाशास्त्र आणि वैद्यकशास्त्र विषयाचे नोबेल पुरस्कार विजेते होते. चेताशास्त्र, जीवाणूशास्त्र, ऊतीशास्त्र, विकृतीशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय होते. शेरींग्टन द रॉयल सोसायटीचे सुरुवातीस अध्यक्षही होते.

रूफिनी यांनी शेरींग्टन यांना स्वतःच्या कामाची माहिती पत्राद्वारे कळविली होती. तेव्हा त्याबरोबर अकरा काचपट्ट्यांवर मांजरीच्या चेतातंतूनी युक्त असे शारीरिक नमुनेही पातळ कापांच्या रूपांत पाठवले होते. या नमुन्यांमुळे  रूफिनी यांच्या कामाचे स्वरूप जास्त स्पष्ट झाले. या कामाने प्रभावित झालेल्या शेरींग्टन यांनी रूफिनी यांची शिफारस केली. त्यामुळे रूफिनी यांचे शोधनिबंध आणि तत्सम लिखाण जर्नल ऑफ फिजीऑलॉजीमध्ये प्रसिद्ध झाले. मांजराच्या चेतातंतू आणि स्नायू एकत्र येण्याच्या जागेची सूक्ष्मरचना आणि या रचनेचे महत्त्व हे त्या जर्नल ऑफ फिजीऑलॉजीच्या अंकातील शोधनिबंधाचे शीर्षक होते. याच विषयावर इटालियन भाषेत मॉनितर झुऑलॉजिको इतालिआनो या वैज्ञानिक नियतकालिकात त्यांचा लेख प्रकाशित झाला. रूफिनी यांच्या मूलभूत संशोधन कामामुळे चेतासंस्था आणि स्नायुसंस्था ऐच्छिक हालचाल घडविण्यासाठी एकात्मिक पद्धतीने आणि सुसूत्रपणे कसे काम करतात हे स्पष्ट झाले.

रूफिनी यांना द अकादमिया नासिओनेल देइ्या क्वारन्तातर्फे सुवर्ण पदक दिले गेले. द रॉयल सोसायटीनेही त्यांच्या उत्कृष्ट अध्यापन कौशल्याचे आणि वैज्ञानिक निरीक्षण शक्तीचे खास पदक देऊन कौतुक केले. बोलोन्यामध्ये एका संशोधन संस्थेला त्यांच्या सन्मानार्थ रूफिनी इन्स्टिट्यूट ऑफ हिस्टॉलॉजी अँड एम्ब्रियॉलॉजी हे नाव देण्यात आले.

रूफिनी यांचे इटालीतील बारागाझ्झा, कास्तिग्लिओन देइ्या पेपोली येथे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा