व्हेरोलिओ, कस्टॅन्झो : (१५४३ – १५७५) कस्टॅन्झो व्हेरोलिओ इटालीतील बोलोन्यामध्ये जन्मले. कस्टॅन्झो व्हेरोलिओ हे त्यांचे इटालियन नाव, ‘काँस्टॅन्टियस व्हेरोलियस (Constantius Varolius) असे, लॅटीन धर्तीवरही प्रचलित आहे. त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल विशेषतः लहानपणाबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. कस्टॅन्झो व्हेरोलिओ हे गिउलियो सीझर अरॅन्झियो या शरीररचना शास्त्रज्ञाचे विद्यार्थी. तर गिउलियो अरॅन्झियो त्यांच्यापेक्षाही ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित अशा, आंद्रियास व्हेसेलीयस यांचे शिष्य होते.
अशी पार्श्वभूमी असलेल्या व्हेरोलिओ यांनी वैद्यकीय पदवी मिळवली आणि ते डॉक्टरी व्यवसाय करण्यास पात्र ठरले. वैद्यकीय पदवीशिवाय त्यांनी तत्त्वज्ञानात पीएच्.डी. मिळवली होती. त्याकाळी विज्ञान वा अन्य विषयाच्या जोडीने तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणे हा प्रघातच होता. या दोन्ही उच्च पदव्या प्राप्त करून घेण्यासाठी त्यांना गिउलियो अरॅन्झियो यांचे मार्गदर्शन मिळाले होते.
दुसऱ्या शतकातील गेलन (सन 129 -210) नावाच्या ग्रीक तत्त्ववेत्याच्या काळापासून कवटीमध्ये वरून खाली समांतर छेद घेऊन मेंदूचा अभ्यास करण्याची पद्धत होती. व्हेरोलिओ यांना मेंदूतील महत्त्वाची केंद्रे मेंदूच्या तळाशी असावीत असा विश्वास होता. त्यांनी विच्छेदनापूर्वी मेंदू कवटीतून सुटा केला आणि मेंदूचे विच्छेदन तळापासून करण्यास प्रारंभ केला. ही पद्धत अधिक चांगली व समजण्यास सोपी ठरली. कर्पर चेता पाहण्यासाठी ही सर्वोत्तम पद्धत आहे. अजूनही हीच पद्धत मेंदू विच्छेदन करण्यास प्रचलित आहे. या पद्धतीच्या सहाय्याने व्हेरोलिओ यांनी अनुमस्तिष्क सेतूचे (pons Verolii) स्थान निश्चित केले. जेंव्हा अनुमस्तिष्क सेतूचे कार्य ठरवण्याचा प्रश्न होता त्यावेळी मज्जारज्जूतील मध्यभागी असलेली मज्जा पुलाखालून वाहणार्या पाण्याप्रमाणे वाहते असे वाटल्याने हे नाव प्रचलित झाले. व्हेरोलिओ यांना अनुमस्तिष्क सेतू लहान मेंदूचा भाग असावा असे वाटले. हा भाग संशोधनानंतर मस्तिष्क स्तंभाचा भाग आहे हे आता सिद्ध झाले आहे.
मेंदू विच्छेदनाच्या नव्या पद्धतीनंतर व्हेरोलिओ यांनी मस्तिष्क चेता नेमक्या कोठे जातात हे शोधून काढले. उदा., दृष्टी चेता या त्यांच्या पुस्तकामध्ये दृष्टी चेतांचा शेवट कोठे होतो हे जवळजवळ अचूकपणे दाखवले. मज्जारज्जूमध्ये चार चेतापथ असतात. पुढील दोन पथ संवेदी चेतासाठी (sensory) व मागील दोन लहान मेंदूच्या (cerebellar) संवेदादांसाठी.
बोलोन्या विद्यापीठाच्या संचालक मंडळाने व्हेरोलिओ यांच्यासाठी एक खास पद निर्माण केले. त्यांनी व्हेरोलिओ यांची शल्यविशारद म्हणून नेमणूक केली. तसेच त्यांचे प्रभुत्व असलेला शरीररचनाशास्त्र विषय शिकवण्याची जबाबदारीही व्हेरोलिओ यांच्यावर सोपवली. शल्यक्रिया करून रोग्याच्या पित्तनलिकेतील, पित्ताशयातील पित्तखडे काढणे यात व्हेरोलिओ निपुण झाले. या खास कौशल्यासाठी ते यूरोपभर प्रख्यात झाले. यूरोपातील अतिप्राचीन काळात, रोममध्ये स्थापन झालेल्या सॅपिएन्झा विद्यापीठात, ते काही काळ शिकवत होते असा अंदाज आहे. परंतु अधिकृत लेखी नोंद अद्याप सापडलेली नाही. मॅन्डोसियो या इतिहासकाराच्या निवेदनानुसार रोममधील पोप, ग्रेगरी तेरावे यांचे वैयक्तिक वैद्यकीय सल्लागार म्हणून राहण्याचा मान व्हेरोलिओ यांना मिळाला.
मेंदूची रचना समजण्यासाठी स्वतः शोधलेल्या, खालून वर जाण्याच्या मेंदू विच्छेदन पद्धतीची ही त्यांनी नोंद करून ठेवली. व्हेरोलिओ यांनी स्वतः लाकडावर कोरीव काम केलेले मेंदूची रचना दाखवणारे तीन फलक सापडले आहेत. त्यापैकी एक खाली दाखवला आहे.
![](https://marathivishwakosh.org/wp-content/uploads/2022/09/varali-1.jpg?x35034)
चित्र रेखाटन कौशल्यात हे फलक थोडे कमी पडत असले तरी ते मेंदूची रचना स्पष्ट दाखवतात. अभ्यासासाठी ते उपयुक्त आहेत. हे फलक ठशाप्रमाणे वापरून मेंदूच्या आकृत्या छापता येत. मेंदूप्रमाणेच व्हेरोलिओ यानी संवेदी, प्रेरक आणि मिश्र या तीनही प्रकारच्या कर्पर चेतांचाही (cranial nerves) अभ्यास केला. व्हेरोलिओ यांनी लहान आतड्याचा शेवटचा भाग म्हणजे, शेषांत्र (ileum) आणि मोठ्या आतड्याचा सुरुवातीचा भाग म्हणजे सीकम यांच्यामध्ये एक झडप असते ह्याचा शोध लावला. या झडपेमुळे अन्न एकाच दिशेने जाते. ती दिशा म्हणजे लहान आतड्यातून – शेषांत्रातून मोठ्या आतड्याकडे – जाणारी दिशा. एकदा मोठ्या आतड्यात गेलेले अन्न उलट दिशेने, लहान आतड्यात येऊ शकत नाही.
व्हेरोलिओ यांनी अभ्यासलेला आणखी एक मुद्दा म्हणजे लिंग ताठरता. गेलन या तत्त्ववेत्त्याच्या काळात म्हणजे दुसऱ्या शतकात या मुद्याबद्दल मिळालेले ज्ञान लुप्त झाले होते. ते व्हेरोलिओ यांनी पुन्हा स्वतंत्रपणे मिळवले. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वी व्हेरोलिओ यांना वाटले होते की लिंगातील स्नायूचे आकुंचन हे लिंग ताठरतेचे कारण असते. नंतर अधिक माहिती मिळाल्यावर ते मत चुकीचे निघाले. पण लिंगस्नायूऐवजी, लिंग धमन्यामध्ये रक्त तात्पुरते साठल्याने काही काळापुरती लिंग ताठरता येते.
व्हेरोलिओ यांनी आपल्या अल्प आयुष्यात आवडीच्या शरीररचनाशास्त्र या विषयावर ॲनाटॉमिए दे कॉर्पोरीस नामक पुस्तक लिहिले आहे. तसेच दे नर्विस ऑप्टिसि हे त्यांचे मुख्यतः मेंदू रचनेबद्दलचे पुस्तक प्रकाशित झाले. या खेरीज ॲनाटॉमिए लिब्री-४ या शीर्षकाचे त्यांचे पुस्तक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले.
वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी रोममध्ये त्यांचा मृत्यू झाला.
संदर्भ :
- http://galileo.rice.edu/Catalog/NewFiles/varolio.html
- http://faculty.washington.edu/chudler/hist.html#1500
- http://edit16.iccu.sbn.it/scripts/iccu_ext.dll?fn=11&res=9141
- https://www.encyclopedia.com/science/dictionaries-thesauruses-pictures-and-press-releases/varolio-costanzo
समीक्षक : मोहन मद्वाण्णा