वाडिया, दाराशॉ नौशेरवान : (२५ ऑक्टोबर १८८३ – १५ जून १९६९) दाराशॉ नौशेरवान वाडिया यांचा जन्म सूरत येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण सूरतला आणि उच्च शिक्षण वडोदरा येथे झाले. शिक्षणानंतर जम्मूच्या प्रिन्स ऑफ वेल्स महाविद्यालयात (आताचे महात्मा गांधी मेमोरिअल महाविद्यालय) प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. तेथे विद्यार्थ्यांना शिकवत असताना स्वत:चा भूशास्त्राचा व्यासंग तसेच हिमालयातील खडक, खनिजे आणि जीवाश्मांवरील संशोधन त्यांनी सुरू ठेवले. विद्यार्थ्यांसाठी भारतीय प्रस्तरविज्ञान या महत्त्वाच्या विषयासाठी पाठ्यपुस्तक उपलब्ध नव्हते. त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक ते पाठ्यपुस्तक लिहिले. काश्मिरच्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलेले हे पाठ्यपुस्तक प्रत्यक्षात संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांनी वापरले.
नंतर ते भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागात रुजू झाले. तेथेही त्यांचे संशोधन मुख्यत्वे हिमालयातील क्षेत्राशीच संबंधित होते. वायव्य हिमालयातील काश्मिर–हझारा भूभागातील घड्यांच्या पर्वतांवरचे त्यांचे तपशीलवार आणि विस्तृत काम हे हिमालयाच्या संरचनेविषयीचे बहुमूल्य योगदान समजले जाते. हिमालयातील शिवालिक पाषाणसंघात पृष्ठवंशीय प्राण्यांचे जीवाश्म त्यांना सापडले. तेव्हां ते नेमके कोणत्या विलुप्त जातीचे आहेत हे ठरविण्यात कसर राहू नये म्हणून इंग्लंडला जाऊन, ब्रिटिश म्युझियमच्या जीवाश्मालयातील पृष्ठवंशीय जीवाश्मांचा अभ्यास त्यांनी केला. शिवाय यासाठी त्यांनी जर्मनी, ऑस्ट्रिया आणि झेकोस्लोव्हाकिया या देशातील निवडक संस्थांमधे जाऊन, तेथील वैज्ञानिकांशीही चर्चा करून त्या जीवाश्मांवरील संशोधनात अधिक अचूकता आणली.
श्रीलंकेच्या ब्रिटिश सरकारने वाडिया यांची नियुक्ती श्रीलंकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचे प्रमुख म्हणून केली. त्या विभागाची घडी नीट बसवून आणि सहकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन ते भारतात परतले. नंतर त्यांनी काही काळ स्वतंत्र भारताच्या भूमीसर्वेक्षण विभागाचे संचालकपद तर काही काळ खाणी आणि खनिज ब्यूरोचे संचालकपद भूषविले. स्वातंत्र्योत्तर काळात होमी भाभा यांच्या नेतृत्वाखाली नव्याने निर्माण झालेल्या अणुऊर्जा आयोगाने अनेकदा वाडियांचे मार्गदर्शन घेतले. त्यांच्याच सूचनेवरून बिहार, राजस्थान आणि केरळ येथील आण्वीय खनिजांचे खाणकाम सुरू झाले आणि अणुभट्टीसाठी इंधनही उपलब्ध झाले.
गोव्याची राष्ट्रीय समुद्रविज्ञान आणि हैद्राबादची राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्था यांच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. भारताचे भूशास्त्रीय सल्लागार असताना त्यांनी राष्ट्रीय खनिज धोरण तयार केले हॊते. हिमालयातील पाषाणसमूहात दडून बसलेल्या भूशास्त्रीय रहस्यांविषयी वाडियांना विलक्षण कुतुहल होते. त्यांच्या प्रेरणेमुळेच १९६८ मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी स्थापन झाली. त्यांच्या सन्मानार्थ संस्थेचे वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी असे पुनर्नामकरण झाले.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्त्वपूर्ण सन्मान त्यांना मिळाले होते. फेलो ऑफ रॉयल सोसायटी ऑफ इंग्लंड हा बहुमान प्राप्त झालेले ते पहिले भारतीय भूशास्त्रज्ञ होते. भारत सरकारने पद्मविभूषण सन्मान देऊन त्यांना गौरविले होते. भारतीय टपाल खात्यातर्फे त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ टपाल तिकीट जारी करण्यात आले होते.
संदर्भ :
- Thakur VC (2003). “Research Contributions of D N Wadia”(PDF) 8 (2): 65–75. doi:10.1007/BF02835651
- https://scientistsinformation.blogspot.com/2010/09/dr-dn-wadia-1883-1969.html
समीक्षक : विद्याधर बोरकर