पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला. हा किल्ला पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळील महाकाय रेडिओ दुर्बीणीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या खोडद या गावाच्या उत्तरेस ५ किमी. अंतरावर पूर्व–पश्चिम पसरलेला असून याची समुद्रसपाटीपासून उंची २९१६ फूट आहे. गडाच्या दोन्ही टोकांना टेकड्या असून गडाचा माथा चिंचोळा व गडावर कमी सपाटी आहे. गडाच्या पायथ्याला असणाऱ्या मुकाईदेवी मंदिरापर्यंत गाडी रस्त्याने पोहोचता येते.

नारायणगड, पुणे.

मुकाईदेवीच्या मंदिरापासून गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी वनविभागाने बनवलेल्या पायऱ्या असून, पुढे दगडात कोरलेल्या मूळ पायऱ्या गडाच्या पडलेल्या प्रवेशद्वारापर्यंत दिसतात. किल्ल्याच्या दक्षिणेची तटबंदी उद्ध्वस्त झालेली असून उत्तरेकडील तटबंदी बरीच शाबूत आहे. या तटबंदीत काही बुरूज बघायला मिळतात. तटबंदीवर काटेरी झुडपे उगवलेली आहेत. गडाचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख व अवशिष्ट रूपात असून प्रवेशद्वारातून आत गेल्यावर वाटेच्या दोन्ही बाजूंस खांब उभे करण्यासाठी खोदलेले खड्डे दिसतात. पश्चिमेस असणाऱ्या टेकडीच्या पायथ्यापाशी किल्लेदार वाडा अथवा राजवाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वास्तूचे भग्न अवशेष दिसतात. या अवशेषांमध्ये वाड्याची गणेशपट्टी अतिशय सुंदर असून त्या मागील बाजूस व्याघ्र सदृश प्राण्याचे शिल्प दिसते. वाड्याच्या दक्षिणेस नुकतेच सापडलेले खांब टाके असून त्यातील गाळ काढण्याचे काम दुर्ग संवर्धन मोहिमेअंतर्गत करण्यात आले आहे. पश्चिम बाजूस असणाऱ्या टेकडीच्या माथ्यावर हस्तमातेचे मंदिर असून हे मंदिर स्थानिक गावकऱ्यांनी श्रमदानातून बांधले आहे. गडाच्या उत्तरेस असणाऱ्या तटबंदीत एक चोरदिंडी असून त्यातील माती, दगडधोंडे काढण्याचे काम दुर्ग संवर्धन मोहिमेअंतर्गत करण्यात आले आहे. येथून पूर्वेकडे जाणाऱ्या पायवाटेने पुढे गेल्यावर गडावरील एकमेव पिण्याचे पाणी असलेले नारायण टाके आहे. या खांब टाक्यास आतील बाजूस उतरण्यास पायऱ्या असून टाक्याच्या वरील भिंतीवर एक शिलालेख कोरलेला आहे. येथून पुढे जाणाऱ्या वाटेवर काटेरी झुडपे उगवलेली असल्यामुळे गडाचा पूर्वेस सांभाळून जावे लागते. परत फिरून मधील खिंडीत येताना एक टाके लागते. येथून वर आल्यावर एका उद्ध्वस्त समाधीचे अवशेष दिसतात. येथून थोडे खाली आल्यावर डावीकडे जाणाऱ्या वाटेने गेल्यास आपणास सहा टाक्यांचा समूह दिसतो. हा समूह पाहताना आपणास चावंड गडावरील टाक्यांच्या समूहाची आठवण येते. खिंडीच्या खाली अंदाजे ३८ फूट लांब, १२ फूट रुंद व २० फूट खोल असणारे चांभारटाके पाहावयास मिळते.

या किल्ल्याचा इतिहास फारसा उपलब्ध नाही. १६०५ पासून या परिसराचा ताबा शहाजीराजांचे वडील मालोजी राजांकडे होता. छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज व छ. राजाराम महाराजांच्या काळात हा परिसर मोगल साम्राज्यात होता. १७३८ मधील एका पत्रानुसार हा किल्ला स्वराज्यात असल्याचे दिसते. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी हा किल्ला बांधल्याचे म्हटले जाते. परंतु यास दुजोरा देणारे संदर्भ मिळत नाहीत. दाऊजी इंदुलकर याची नेमणूक किल्ल्यावर केलेली असल्याचे दिसते. छ. शाहू महाराजांनी बाजीरावांना पेशवे पदाची सूत्रे देताना नारायणगाव परिसराचा सरंजाम दिला. १७१३ मधे सर्काजी राउ पासलकर हा गडाचा हवालदार म्हणून नेमणुकीस होता. १७२८ मधे निजामांनी या प्रांतावर स्वारी केलेली होती, तेव्हा चिमाजीअप्पांचे या भागातील निजामाच्या हालचालीवर लक्ष होते. जुन्नरच्या पूर्वेकडील गावांचा महसूल या किल्ल्यावर जमा होत असे. या किल्ल्याचा सरंजाम पेशव्यांनी उदाजी पवार या सरदाराला दिल्याचे दिसते. पुढे छ. शाहू महाराजांच्या कारकिर्दीतच या किल्ल्याचे बांधकाम नानासाहेब उर्फ बाळाजी बाजीराव पेशव्यांनी पूर्ण केले. १७४१-४२ मध्ये या किल्ल्यावर हवालदार म्हणून अंताजी काटकर याची नेमणूक केलेली दिसते. १८१८ च्या शेवटच्या इंग्रज-मराठा युद्धात इंग्रजांच्या तोफांनी किल्ल्यावर हल्ला केला, तेव्हा गडातील शिबंदीने आपली शस्त्रे खाली ठेवली. १४ जून १८१८ मधे अहमदनगरचा जिल्हाधिकारी (कलेक्टर) हेन्री पॉटींजर याच्या हुकमानुसार तत्कालीन शिवनेर तालुक्याचा कमाविसदार रामराव नरसिंह याने बोइट याच्या ताब्यात हा किल्ला दिला. पुढे १८ डिसेंबर १८१८ मधे जुन्नर तालुक्यातील किल्ले पाडण्यासाठी कॅप्टन इस्टनर या भागात आला. त्याने किल्ल्यावर जाणारे रस्ते, पाण्याची टाकी, तटबंदी उद्ध्वस्त केली.

संदर्भ :

  • Abhang, Chandrakant, Unpublished documents of East India Company regarding destruction of forts in Junnar region, Indian History Congress, 2014.
  • गोगटे, चिं. गं. महाराष्ट्र देशातील किल्ले : भाग १ व २ (सुधारित आवृत्ती), शिवसमर्थ सेवा प्रकाशन, नाशिक, २०१९.
  • पारसनीस, द. ब.; वाड, ग. चि. बाळाजी बाजीराव पेशवे रोजनिशी, डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी, पुणे, १९०७.

                                                                                                                                                                                         समीक्षक : सचिन जोशी