वागनर, ज्युलियस : (७ मार्च १८५७ – २७ सप्टेंबर १९४०) ज्युलियस वागनर यांचा जन्म ऑस्ट्रीयातील वेल्स, येथे झाला. ज्युलियस वागनर यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सालोमन स्ट्रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ओरिजिन अँड फंक्शन ऑफ ॲक्सिलरेटेड हार्ट’ हा प्रबंध सादर करून डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली. या प्रबंधात त्यांनी हृदयाच्या धडधडीची सुरुवात आणि त्याचे नैसर्गिक कार्य या विषयावरील  संशोधनाची मांडणी केली होती.

त्यांनी सालोमन स्ट्रायकर यांच्यासोबत इन्स्टिट्यूट ऑफ जनरल एक्सपेरिमेंट पॅथॉलॉजी अर्थात या रोगनिदानशास्त्र संस्थेत अभ्यास केला होता. पुढील चार वर्षे त्यांनी मनोरुग्ण दवाखान्यात मेक्झिमिलियन लेडेसडॉर्फ या ऑस्ट्रियन मनोविकार तज्ज्ञाबरोबर काम केले होते. न्यूरो मनोरुग्ण चिकित्सालय ग्रेझ विद्यापीठात त्यांनी क्राफ्ट एबिंग यांच्याबरोबर संशोधन केले. कंठस्थ ग्रंथीची (थायरॉइड) वाढ, जन्मतः प्राप्त झालेली मंद गती, गतिमंदत्व व खुजेपणाची विकृती यावर आपले लक्ष त्यांनी केंद्रित केले. या सर्व विकारांवर आयोडीनचा होणारा परिणाम हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. अंततः त्यांनी या विषयावर प्रभुत्व प्राप्त केले. यायोगे मानसोपचार व चिंताग्रस्त मानसिकता या रोगावरील एक असामान्य प्राध्यापक म्हणून त्यांनी लौकिक प्राप्त केला. या बरोबरच व्हिएन्ना येथील मानसोपचार व चिंताग्रस्त मानसिकता या रोग चिकित्सालयाचे संचालक बनले.

वागनर यांचे मूळ प्रशिक्षण वैद्यक विषयावरील असूनही त्यांनी आपले संशोधन मानसिक रोगावरील उपचार पद्धतीवरच केंद्रित केले होते. वागनर यांनी आपल्या आयुष्यात मानसिक रोगांवरती जी औषधोपचार पद्धती विकसित केली त्यात रोग्याच्या शरीरात ताप उत्पन्न केला जातो. या पद्धतीला पायरोथेरपी असे म्हणतात. त्यांनी जंतु संसर्गाने निर्माण होणार्‍या रोगांचा परिणाम मनोविकृतीशी असल्याचे शोधून काढले. प्रथमतः त्यांनी सायकॉसिस (psychoses) म्हणजेच मनोदौर्बल्य या रोगाच्या उपचाराकरिता रॉबर्ट कॉखने तयार केलेल्या इरिसेपिला (erisipela) व ट्युबरक्यूलिन (tuberculin) यांचा वापर केला.परंतु या उपचार पद्धतीचा फारसा चांगला प्रभाव दिसून आला नाही. म्हणून त्यांनी अशा मनोरुग्णांवर मलेरिया परजीवींची प्रतिबंधक लस टोचण्याचा प्रयोग केला. कारण हाच प्रयोग यापूर्वी चेतासंस्थेवर परिणाम करणार्‍या तिसर्‍या पायरीच्या स्थितीतील डेमेंनशिया पॅरॅलिटिकावर (Dementia paralytica) (ज्याला स्मृतिभृंश व अंशतः लुळेपणा असे संबोधतात) झाला होता. या प्रयोगाच्या निरीक्षणात त्यांना असे आढळून आले की, जे मलेरियाच्या तापाने फणफणले होते ते या उपचार पद्धतीने पूर्णपणे बरे झाले. त्यामुळे सन १९१७ ते १९४० या काळात अतिउच्च पातळीवरील गुप्तरोगाच्या उपचारात मलेरियाच्या (हिवताप) किमान आक्रमक प्लाझ्मोडीयम व्हायवॅक्स परजीवींचा पायरोथेरिपी म्हणून वापर केला गेला. हा एक मान्य केलेला धोका म्हणून स्वीकारला गेला. कारण मलेरियावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारे क़्युनाईन सर्वत्र उपलब्ध होते. याच शोधासाठी १९२७ मध्ये त्यांना नोबेल पुरस्काराने गौरविले गेले. वरील संशोधन प्रायोगिक उपचार पद्धतीच्या स्मरणीय प्रकाशनात मलेरिया रोगाची लस टोचून अर्धागवायूवरील प्रतिबंध व उपचार Prevention and treatment of progressive paralysis by malaria inoculation या पुस्तकांद्वारे प्रकाशित केले गेले. परंतु पुढे असे निदर्शनात आले की ही उपचार पद्धती धोकादायक आहे. या उपचार पद्धतीत १५ % रुग्ण दगावतात. त्यामुळे त्यांचा फारसा वापर केला गेला नाही.

मलेरिया झालेल्या रोग्याचे रक्त न्यूरोसिफिलिस झालेल्या म्हणजेच गुप्त रोगाच्या तिसर्‍या पायरीत गेलेल्या रोग्याच्या शरीरात संक्रमित केले जात आहे. या पद्धतीने रोग्याच्या शरीरात ताप निर्माण केला जातो व गुप्तरोगाला करणीभूत असलेले स्पायरोचिट्स हे जिवाणू नष्ट केले जातात. या उपचार पद्धतीला पायरोथेरपी असे म्हणतात.

वागनर यांनी तरुण मनोविकारग्रस्त रुग्णांच्या कंठस्थ ग्रंथी व गर्भाशयाची चाचणी करवून घेतली. तसेच उशिराने वयात आल्याने ज्यांच्यात दुय्यम लैंगिक वैशिष्ट्ये दिसून आली व अती हस्तमैथुनामुळे ज्यांना मानसिक रुग्ण मानण्यात आले अशा व्यक्तींचे त्यांनी निर्बीजीकरण (नसबंदी) केले. त्या द्वारे रुग्णांची परिस्थिती सुधारण्यास मदत झाली.

या पुढील विचारात वागनर यांनी सुप्रजाजननशास्त्र नावाच्या स्वच्छ अनुवांशिक गुणवत्तेच्या विचारधारेचा सल्ला विद्यार्थांना दिला. या विचाराने प्रभावित झालेल्या अलेक्झांडर पिल्कझ यांनी ज्यू (लोकांमधील मानसिक आजार बळावण्याची शक्यता लक्षात घेऊन) प्रजातीतील लोकांच्या मानसिक वर्तनाविषयी, त्यांच्या मानसिक आजाराबाबत या समूहाच्या मानसिकतेची मीमांसा करणारे मान्यताप्राप्त लहान पुस्तकाचे लेखन केले.

वागनर यांनी सन ऑस्ट्रियन मानवशास्त्र सोसायटीचे सदस्य असताना मानसिक रुग्ण व गुन्हेगारांसाठी सक्तीच्या नसबंदी शस्त्रक्रियांना मान्यता मिळवण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला. तसेच वांशिक पुनर्निर्मिती व अनुवंशिकतेच्या ऑस्ट्रियन लीगचे अध्यक्ष असताना त्यांनी न्यूनतम अनुवांशिकते संदर्भात नसबंदीचा मार्ग सुचविला.

वागनर जॉरेग हे निवृत्तिनंतरही अखेरपर्यंत संशोधन कार्यात सक्रिय राहिले. निवृत्तीनंतर त्यांनी सुमारे ८० वैज्ञानिक शोधनिबंध प्रकाशित केले. वागनर यांच्यावर हिटलरच्या जर्मन राष्ट्रवादाचा पगडा होता. ते सोमाईट विरोधी होते. त्यांना नाझीवादाबद्दल सहानुभूती होती. तसेच उपलब्ध कागदपत्रांवरून असे समजते की, जर्मनीच्या ऑस्ट्रियावरील उठावानंतरही वागनर यांनी नाझीवादाला पाठींबा दर्शविला होता.

अशा या संशोधकाच्या नावे आज ऑस्ट्रियात खूप शाळा, रस्ते, पदपथ व दवाखानेही उभारण्यात आले आहेत. व्हिएन्ना येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : गजानन माळी