दोन समुदायांमध्ये धर्माच्या आधारावर संघर्ष निर्माण होणे म्हणजे जमातवाद. वसाहतकाळापासून जमातवादाचा प्रश्न हा भारतातील एक महत्त्वाचा सामाजिक, तसेच राजकीय प्रश्न राहिला आहे. स्वातंत्र्योत्तर काळातही देशातील सांस्कृतिक विविधतेला विळखा घालून हा एक ज्वलंत सामाजिक व राजकीय प्रश्न म्हणून अस्तित्वात राहिलेला दिसतो. स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाही राजकारण प्रचलित झाल्यावर या प्रश्नाची गुंतागुंत अधिकच वाढली. जमातवादाची चर्चा एकीकडे हिंदू-मुस्लिम दंगली, तर दुसरीकडे इतिहासाचे आकलन, धर्माची चिकित्सा, धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाची जडण-घडण इत्यादी मुद्द्यांभोवती प्रामुख्याने राहिलेली दिसते. असे असले, तरीदेखील जमातवादाचा प्रश्न किंवा समस्या केवळ भारतापुरती मर्यादित नसून ती संपूर्ण जगात कमी अधिक फरकाने तसेच वेगवेगळे स्वरूप धारण करून अस्तित्वात असल्याचे दिसते. जमातवाद नेमका कोणत्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत उदयाला येतो, तसेच नेमक्या कोणत्या सामाजिक प्रक्रियांमुळे निर्माण झालेल्या पोकळीत जमातवादी जाणिव जन्म घेते, यावर जमातवादाचे समाजशास्त्रीय आकलन प्रकाश टाकत असते. त्यामुळे त्याचा बहुविध सांस्कृतिक, सामाजिक घटकांवर नेमका काय परिणाम होतो, हे समजणे शक्य होते आणि त्या आधारे उपाययोजनांची योग्य दिशा निश्चित करण्यासही मदत होते. या संकल्पनेस सांप्रदायिकता असेही म्हणतात.
जमातवादाचा अभ्यास धार्मिक मुलतत्त्ववाद अशा अंगानेदेखील केला जातो. सर्वसामान्यांची रूढीप्रियता, धर्मभोळेपणा यांचा वापर करून एखादा धार्मिक समुदाय दुसऱ्या धार्मिक समुदायाच्या विरोधात धर्माच्या आधारावर संघर्ष करण्यास प्रवृत्त होतो, तेव्हा जमातवादाचा जन्म होतो किंवा त्यातून धर्माचे राजकारण आकार घेते. जमातवाद या संकल्पनेच्या केंद्रस्थानी धर्म नावाची गोष्ट आहे. असे असले तरी, धार्मिकता आणि जमातवाद यांमध्ये मुलभूत फरक आहे. एखादी व्यक्ती धर्मभोळेपणातून एखाद्या धर्माचे व्यक्तिगत पातळीवर पालन करीत असेल, जो त्या व्यक्तीला राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे, तर ती व्यक्ती धार्मिक आहे असे आपण म्हणतो. अशारितीने एखादी व्यक्ती जर धार्मिक असेल, तर ती जमातवादी असेलच असे नाही; परंतु धर्माच्या आधारावर किंवा धर्मभोळेपणाचा फायदा घेऊन दुसऱ्या धार्मिक समुदायाच्या विरोधात जर द्वेष निर्माण केला जात असेल किंवा संघर्ष उभा केला जात असेल, तर ती कृती मात्र जमातवादी ठरत असते. धार्मिकता मुळात जमातवादी जाणीव नसून तिचे रूपांतर राजकीय स्वार्थासाठी जमातवादी जाणीवेत केले जाते. त्यामुळे जमातवाद ही एक सामाजिक आणि राजकीय समस्या असून जमातवादाचे मूळ धर्मात अथवा धर्मिकतेमध्ये नाही.
जमातवाद या समस्येची जमातवादी हिंसा (दृष्य प्रारूप) आणि जमातवादी जाणीव (छुपे/अदृश्य प्रारूप) अशी दोन प्रारूपे आहेत. जमातवादी जाणिव ही अदृष्यपणे व्यक्तीच्या मनात खोलपर्यंत रुजलेली असते. स्वतःची धार्मिक ओळख अथवा अस्मिता ही दुसऱ्या धर्मापेक्षा वेगळी आणि म्हणून आपला धर्म श्रेष्ठ आहे अशी धारणा जेव्हा व्यक्तीच्या मनात निर्माण होते आणि त्या आधारावर ती व्यक्ती इतर धार्मिक समुदायांशी/व्यक्तींशी उचनीचतेचा व्यवहार करते, तेव्हा जमातवादी जाणीवेचा जन्म होतो. जमातवादी जाणीवेच्या केंद्रस्थानी वेगळं करण्याची प्रक्रिया (अदरिंग) ही अजून एक प्रक्रिया असते. जेव्हा समाजात ‘आम्ही’ – ‘ते’ अशा प्रकारचे ध्रुवीकरण/विभाजन होते, तेव्हा जमातवादी जाणीव ही बळकट होते. याउलट, जमातवादी हिंसा हे जमातवादाचे काहीसे दृष्य प्रारूप आहे, जे बरेचदा सांप्रदायिक दंगलींच्या माध्यमातून आपण अनुभवतो. जमातवादामुळे देशातील सामाजिक सहिष्णुता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षता ही घटनात्मक मूल्ये आकसली जात आहेत.
आपला समाज अशा धार्मिक समुदायांमध्ये विभागाला गेला आहे की, ज्यांचे हितसंबंध वेगळेच नव्हे, तर परस्पर विरोधी आहेत अशी धारणा किंवा विचारधारा समाजामध्ये निर्माण होणे, याला जमातवाद असे म्हटले जाते. एखादा धार्मिक समुदाय जेव्हा दुसऱ्या धार्मिक समुदायाच्या विरोधात संघर्ष करण्यास तयार होतो, तेव्हा जमातवादाचा जन्म होतो. या विचारधारेच्या दुसऱ्या बाजूमध्ये हे गृहीत धरले जाते की, कोणताही धार्मिक समुदाय हा एकसंध समुदाय आहे आणि त्यामध्ये अंतर्गत हितसंबंधांची लढाई नसते; परंतु वास्तविकपणे कोणताही धार्मिक समुदाय (हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, शीख इत्यादी) हा एकसंध समुदाय नाही. प्रत्येक धार्मिक समुदायात जात-वर्गीय स्तरीकरणाची रचना असते. यांतर्गत स्तरीकरणाच्या रचनेमुळे मुळात या धार्मिक समुदायांमध्ये अंतर्गत हितसंबंधांची लढाई असते. त्यामुळे या धार्मिक समुदायातले (मग ते हिंदू असोत, मुस्लीम असोत अथवा ख्रिश्चन असोत) जे घटक सत्तेच्या स्थानावर आहेत, त्यांना सतत अशी धास्ती वाटत राहते की, केव्हा ना केव्हा तरी या अंतर्गत हितसंबंधाच्या लढाईचा परिणाम त्यांच्या सत्ताहिनतेत होईल आणि एक प्रकारे त्यांच्या सत्ता स्थानाला धक्का पोहोचेल. त्यामुळे प्रत्येक धार्मिक समुदायातील सत्ताधारी घटक त्यांच्या त्यांच्या धार्मिक समुदायांपुढे असा आभास निर्माण करतात की, जणू आपला धार्मिक समुदाय हा एकसंध/एकसाची आहे आणि यात आंतर्गत पातळीवर कोणतीही हितसंबंधांची लढाई नाही. यासाठी त्यांना एका आभासी बाह्य शत्रूची छबी निर्माण करावी लागते, जो बाह्य शत्रू दुसरा धार्मिक समुदाय असतो. यातून ते एकप्रकारचे सामाजिक मिथक निर्माण करून त्यांच्या त्यांच्या समुदायापुढे असा आभास निर्माण करतात की, आपली हितसंबंधाची लढाई आपापसांत नसून ती या प्रस्थापित शक्तींनी उभ्या केलेल्या आभासी ‘बाह्य शत्रू’सोबत, म्हणजेच दुसऱ्या धार्मिक समुदायाशी आहे. त्यामुळे समाजात जेव्हा जमातवादी जाणीव निर्माण केली जाते, तेव्हा त्यामध्ये कोणताही धार्मिक समुदाय हा असा एकसंध समुदाय आहे की, ज्यात सर्वांचे हितसंबंध सारखे असते असे एक महत्त्वाचे गृहीतक असते. याच गृहीतकाची दुसरी बाजू म्हणजे, या एकसंध मानल्या गेलेल्या धार्मिक समुदायाच्या हितसंबंधाची ‘खरी’ लढाई ही दुसऱ्या धार्मिक समुदायाशी आहे. त्यामुळे सर्व धार्मिक समुदायांमध्ये अशी धारणा रूढ केली जाते की, आपला ‘खरा शत्रू’ अंतर्गत नसून दुसरा धार्मिक समुदाय आहे. अशा प्रकारे एखाद्या धार्मिक समुदायातील सत्ताधारी घटक जेव्हा आपली सत्ता (सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक) अबाधित ठेवण्यासाठी धर्माचा वापर करून बाह्य शत्रूच्या अस्तित्वाचा आभास निर्माण करतात, तेव्हा जमातवादाची समस्या समाजात निर्माण होते. थोडक्यात, धर्म वेगळा असला की, संबंधित लोकसमूह इतर धर्मियांपेक्षा वेगळा असतो, वेगवेगळ्या धर्मांच्या समूहांचे हितसंबंध वेगवेगळे असतात, हे जमातवादाच्या सिद्धांतामागचे मुख्य गृहीतक आहे. त्यामुळे जमातवादी विचारप्रणालीमध्ये धर्म हाच समाजरचना आणि सामाजिक संबंध निश्चित करणारा घटक असतो.
जमातवादाची वैशिष्टे :
- देशाच्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित संपत्ती व संसाधनांवर हक्क सांगून त्यांच्यावर ताबा मिळविणे; त्याकरिता इतर धार्मिक गटांचे अधिकार नाकारणे; आर्थिक व राजकीय व्यवहारांवर एकाधिकार प्रस्थापित करणे.
- सामाजिक व सांस्कृतिक व्यवहारांत केवळ एकाच (सर्वसाधारणतः बहुसंख्यांक) गटाचे व्यवहार आणि कल्पना प्रमाण मानणे.
- इतर गटांना आगंतुक वा उपरे मानणे आणि त्यांच्या व्यवहारांना दुय्यम दर्जा देणे; त्यांच्या देशप्रेमाबद्दल संशय व्यक्त करणे; त्यांना अलग पाडण्याचा प्रयत्न करणे.
समाजात जेव्हा जमातवादी जाणिव घट्ट होत असते, तेव्हा वरील नमूद केलेल्या सर्व बाबी आपोआप ‘नैसर्गिकपणे’ होताना दिसतात. त्यातील भौतिक बाबींचे व्यावहारिक महत्त्व मोठे असले, तरीही धार्मिक प्रतीकात्मक बाबींचे भावनिक महत्त्व, विशेषतः राजकारणाच्या दृष्टीने, वाढत जाते. भारतीय राजकारणातील याचा एक परिणाम जमातवादी हिंसा व जमातवादी हत्याकांडे अथवा दंगली हा आहे. भारतीय समाज व लोकशाही यांच्यापुढे या हिंसेने मोठेच आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे जमातवाद मवाळ, जहाल, संसदीय अथवा हिंसक अशी विविध रूपे धारण करू शकतो.
भारतातील हिंदू आणि मुस्लिम यांच्या वरिष्ठ आणि मध्यमवर्गीय घटकांचे जमातवादीकरण ब्रिटीश राजवटीत अथवा एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, किंबहुना शेवटच्या दोन दशकात सुरू झाले. ब्रिटीश व पाश्चात्त्य विचारवंतानी राष्ट्रवादाचा मुलभूत घटक म्हणून धर्म आणि संस्कृतीची मांडणी केली. भारतातील मुसलमानांचा समाजशास्त्रीय व मानवशास्त्रीय अभ्यास असे दर्शवितो की, भारतातील ८५% मुसलमान हे एकेकाळच्या जातीजमातीतील आहेत. मुठभर अशरफ मुलासामानांचा अपवाद सोडल्यास हिंदू आणि मुसलमान यांत फक्त उपासना पद्धती आणि धार्मिक आचारणांचा फरक असून भाषिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या त्यांच्यात प्रचंड सरमिसळ होती; परंतु ही सरमिसळ दृष्टीआड करून केवळ धर्म हाच समाजरचना आणि सामाजिक संबंध निश्चित करणारा घटक असतो, असे मानून त्याद्वारे धर्माचे एकसाची रूप उभं करण्यातून जमातवादी विचारप्रणाली समाजात रुजविली गेली व जात आहे.
जागतिकीकरण आणि जमातवाद : जागतिकीकरणाचे सांस्कृतिक परिणाम म्हणून अनेक प्रकारांनी धर्मनिरपेक्ष लोकशाही संस्कृतीला हादरे बसत आहेत. एकतर राष्ट्रातीत भांडवलाचे संस्कृती उद्योगात हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे विविध मार्गांचा वापर करून त्याने त्यात शिरकाव केला आहे. संस्कृतीचे जमातवादी स्वरूपात सवंग सादरीकरण हा त्याचाच एक महत्त्वाचा परिणाम दिसतो.
जागतिक भांडवलशाहीपुढे उभा असलेला पेच सोडविण्यासाठी १९७० नंतर जागतिक नाणेनिधी व जागतिक बँकेमार्फत भांडवलशाहीची पुनर्रचना करण्यास सुरवात झाली. अंशीच्या दशकात याला रीगनवाद व थेचरीझम म्हणून संबोधिले जाऊ लागले. या विचारप्रणालीमार्फत नव–उदारमतवादी बाजारपेठेची भलावण सुरू झाली. शर्मिला रेगे यांच्या मते, खुल्या बाजारपेठेचा गौरव करणारे, त्यांची सक्ती करणारे अर्थकारण, नव-सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडणारे, राजकारण व धर्मांध व प्रतिगामी मूल्यांची भलावण करणारे राजकारण या जागतिकीकरणाच्या गाभ्याशी होते. म्हणजेच खुल्या बाजारपेठांची दुसरी बाजू म्हणजेच जमातवाद/धार्मिक मुलतत्त्ववाद हे स्पष्टपणे पुढे येते. भारतामध्ये १९९० नंतर हिंदू राष्ट्राची कल्पना व परकीय भांडवल हे हातात हात घालून आले. अंशीच्या दशकातच खुल्या अर्थकारणाचे धोरण स्वीकारल्यानंतर एका बाजूला साम्राज्यवादी शक्तींशी हातमिळवणी सुरू झाली, तर दुसऱ्या बाजूला राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी खुलेपणाने जमातावादाचा वापर सुरू झाला.
जमातवाद आणि स्त्रिया : काही स्त्रीवादी अभ्यासकांच्या मते, जमातवाद आणि लिंगभावातील संबंधदेखील गुंतागुंतीचा आहे. जमातवादी राजकारणामध्ये स्त्रीयांसंबंधीचा मुद्दा नेहमीच समूहाच्या अस्मितेचा मुद्दा बनविला जातो किंवा त्याभोवती राजकारण केले जाते. त्यासाठी धार्मिक परंपरा, रूढींचा वापर केला जातो. म्हणजेच अनेकदा जमातवादी राजकारण आपल्या किंवा दुसऱ्या समूहांच्या स्त्रियांना वापरून केले जाते. उदा., अलीकडेच घडून आलेली उत्तरप्रदेशातील मुज्जफरनगर शहरामधली दोन धर्मांतील समूहांमधली दंगल इत्यादी. दंगलींमध्ये स्त्रीची छेडछाड हा मुद्दा कळीचा ठरला आहे. हिंसेचे समर्थन करणारा ठरला आहे. धार्मिक संघटन कण्यासाठीही स्त्रियांचा वापर केला जातो. एकजिनसी समूहांची कल्पना दंगलींमध्ये वापरली जाते. दुसऱ्या समूहाला शत्रू ठरवण्यासाठी जमातवादी अस्मिता जागृत केल्या जातात. यासाठी स्त्रियांचा वापर इतिहासातून तथ्ये बाजूला करून मिथके, प्रतिके वापरून केला जातो. सणावारांचा वापर, प्रसारमाध्यमे, रामायण, महाभारत यांसारख्या टी. व्ही. मालिका यांचा वापर करून स्त्रियांचे विचार वळविले जातात. भारत व पाकिस्तान फाळणीवरील अभ्यासांवरून दिसते की, स्त्रियांना समूहाचे, राष्ट्राचे प्रतिक बनविले जाते. ही प्रतिके पुरुषप्रधान मूल्यव्यवस्थेतून आलेली असतात.
जमातवादी दंगलींकडे स्त्रीवादी परिप्रेक्षातून पाहताना जात, वर्ग, लिंगभाव व समुदाय यांच्यातील गुंतागुंतीच्या संबंधांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बाबरी मशिदीनंतरच्या किंवा गोध्रानंतरच्या दंगलतील स्त्रियांचा वाढता सहभाग पाहता, या परिघटनेचे विश्लेषण करण्याची गरज स्त्रीवादी अभ्यासकांना वाटू लागली. जमातवाद आणि स्त्रिया यांचा संबंध केवळ स्त्रिया जमातवादाच्या बळी असतात या पलीकडे जाऊन तपासण्याची गरज वाटू लागली. स्वसमूहातील स्त्रियांच्या लैंगिक पावित्र्याच्या संरक्षणाचा मुद्दा जमातवादी दंगलींमध्ये महत्त्वाचा बनतो. जमातवादी दंगलींमध्ये बलात्काराचा वापर शस्त्रासारखा केला जातो. स्त्रीच्या शरीरावर सत्ता गाजवून तिच्या समूहाला हरविण्यासाठी साधन म्हणून त्याचा वापर होतो. जमातवादी दंगलींमध्ये सामूहिक बलात्कार मोठ्या संख्येने होतात ते यामुळेच.
जमातवादाचा प्रश्न हे भारताच्या लोकशाही धर्मनिरपेक्षतेपुढील खूप मोठे आव्हान आहे. त्याचे व्यक्तिगत, सामाजिक, आर्थिक, धार्मिक तसेच मानसिक अशा सर्व पातळ्यांवर परिणाम होत असतात. त्याच बरोबर जामातावादाचा पुरुषसत्तेशी व जागतिक भांडवलशाहीशी असलेला अनोन्यसाधारण संबंध लक्षात घेता या प्रश्नाची व्याप्ती व गुंतागुंत समजून घेता येऊ शकते. व्यापक पद्धतीने केलेले जामातावादाचे समाजशास्त्रीय आकलनच जमातवाद या प्रश्नाच्या सोडवणुकीची योग्य दिशा दाखवू शकते.
संदर्भ :
- चव्हाण दिलीप, समकालीन भारत : जाती अंताची दिशा, पुणे,२०१९.
- देहाडराय, स्वाती, लिंगभेदाचे राजकारण आणि जामातवादाचे आकलन, पुणे, २००६.
- थापर, रोमिला व इतर (मराठी अनुवाद- बेडेकर सुधीर), जमातवाद आणि भारतीय इतिहास लेखन, मुंबई, १९८३.
- पळशीकर, सुहास, जमातवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही, पुणे, २००६.
- पानसरे, मेधा, (संपा.) धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि जमातवाद, कोल्हापूर, २०१८.
- बेडकिहाळ, किशोर (संपा), ‘जिहाद, गुलाल आणि सारीपाट’ – हिंदू-मुस्लिम जातीयवादावरील वसंत पळशीकर यांचे निवडक लेख, मुंबई.
- भोळे, भास्कर, धर्मनिरपेक्ष लोकशाहीपुढील जामातवादाचे आव्हान, सातारा, २००२.
- Menon, Dilip, The Blindness of Insight : Essays on Caste in India, Pondicherry, 2006.
- Shani, O., Communalism, Caste and Hindu Nationalism : The Violence in Gujarat, Cambridge, 2007.
समीक्षक : वंदना पलसाने