पेढ्यांना (कंपनी) एखाद्या बाजारपेठेमधून किंवा औद्योगिक क्षेत्रामधून बाहेर पडण्यामध्ये येणारे अडथळे म्हणजे निगमनातील अडथळे होय. निगमन करणे म्हणजे बाहेर पडणे. अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धा, एकाधिकार, एकाधिकारयुक्त स्पर्धा, अल्पाधिकार, द्वयाधिकार असे बाजाराचे विविध प्रकार आढळतात. यामध्ये पेढ्यांना उद्योगांमध्ये व निगमनामध्ये अडथळे येताना दिसून येतात. पेढ्यांचे आगमन व निगमनातील अडथळे हा भाग अर्थशास्त्रामध्ये उद्योगांमधील पेढ्यांच्या संदर्भातील संकल्पना आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातून बाहेर पडताना अडचणी येतात. यामध्ये बरेचदा बाजारातून किंवा औद्योगिक क्षेत्रातून बाहेर पडण्यासाठी आर्थिक भूर्दंड भरावा लागतो. उद्योगांमध्ये पेढ्यांना अनेकदा अनेक प्रकारच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. एखाद्या पेढीला बाजारामध्ये प्रतिस्पर्धा करणे चालू ठेवण्यासदेखील भाग पाडले जाते किंवा पेढ्यांना उद्योगांमध्ये राहण्यामध्येदेखील अडथळे दिसून येतात. उद्योगांमध्ये राहण्यामध्ये जेवढा खर्च येतो, त्यापेक्षा जास्त खर्च पेढ्यांना उद्योग सोडून जाण्यासाठी येतो. बहुतांश पेढ्या बाजारामध्ये स्थायी राहण्यासाठी प्रयत्न करतात; कारण बाजारामध्ये स्पर्धा निर्माण होते. अधिक कंपन्यांना बाजारपेठेमध्ये राहण्यासाठी भाग पाडले जात असल्याने त्या बाजारपेठेत स्पर्धा निर्माण होते. त्यामुळे बाजारातील सर्व पेढ्या नकारात्मकपणे प्रभावी होतात आणि नफा पूर्णपणे स्पर्धात्मक बाजारपेठांपेक्षा कमी असू शकतो. पेढी बाजारपेठेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ शकते; कारण अशी पेढी अधिक नफा मिळविण्यासाठी नवीन बाजारपेठेच्या शोधात असते.
निगमनातील अडथळे हे पेढीला एका विशिष्ट बाजारपेढीमधून बाहेर येण्यापासून रोखतात. हे अशा पेढ्यांशी संबंधित असतात की, जे काही पेढ्यांना उद्योगांमधून किंवा बाजारांमधून बाहेर पडताना नुकसानास कारणीभूत ठरतात. मायकेल पोर्टर यांच्या स्पर्धात्मक विश्लेषणाच्या प्रारूपामध्येदेखील पेढ्यांचे निगमनातील अडथळे अभ्यासाला मिळतात.
निगमनातील अडथळे निर्माण करणारे घटक :
- अहस्तांतरणीय स्थिर मालमत्तांमध्ये उच्च गुंतवणूक : उद्योगांमध्ये बहुतेक वेळा स्थिर मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणे बंधनकारक असते. शिवाय अशी गुंतवणूक अहस्तांतरणीय आणि विशिष्ट मुदतीची असली, तर निगमनामध्ये अडथळे येतात. जर स्थिर मालमत्तांमध्ये उच्च गुंतवणूक केली असल्यास आणि अशी गुंतवणूक अहस्तांतरणीय असल्यास उद्योग सोडून जाण्यामध्ये किंवा निगमनामध्ये पेढ्यांना अडथळे येतात.
- अनावश्यक आधिक्य खर्च : एखाद्या पेढीमध्ये अधिकचे कर्मचारी आहेत, त्यांना उच्च वेतन व भत्ते मिळतात किंवा ते कर्मचारी करारी तत्त्वावर कामावर आहेत इत्यादी कारणांमुळेसुद्धा पेढीला निगमनामध्ये अडथळे निर्माण होतात; कारण कर्मचाऱ्यांशी तसा लेखी करार झालेला असतो. तो विशिष्ट अटी व शर्तींनुसार असतो. हा अनावश्यक आधिक्य खर्च पेढीने करून निगमन करणे कठीण असते.
- करारनामा : पुरवठादार किंवा खरेदीदारांसोबत विविध खरेदी-विक्रीचे करार झालेले असतात. हे करार तोडून निगमन करण्यामध्येदेखील अडथळे येतात; कारण अशा प्रकारचा करारनामा तोडून खर्च करणे पेढीला अडचणीचे असते.
- उत्पादन संयोग : जेव्हा एखाद्या पेढीकडून चांगले किंवा दर्जेदार उत्पादन केले जाते, तेव्हा इतर वस्तूंच्या उत्पादनापेक्षा चांगल्या उत्पादनावर लक्ष केंद्रित असल्याने इतर वस्तूंच्या उत्पादनासाठी कमी खर्चाला उद्योगाकडून किंवा बाजाराकडून परवानगी दिली जाते. उद्योगातून बाहेर पडणे हे चांगले उत्पादन करताना जास्त खर्च येत असूनही दर्जामुळे पेढीला प्रोत्साहन मिळत असते. त्यामुळे अशा पेढीला बाजारातून बाहेर पडताना अडथळे येतात.
- संभाव्य उत्थान : सध्याच्या आर्थिक परिस्थितीतून पेढ्यांवर संभाव्य उत्थान किंवा बदलाचा प्रभाव पडतो. उदा., लहान पेढ्यांचे मोठ्या पेढ्यांमध्ये किंवा मोठ्या पेढ्यांचे लहान पेढ्यांमध्ये रूपांतरण होणे. हे कारणसुद्धा निगमनामध्ये अडचणी आणतात.
काही कंपन्यांकडे अडथळ्यांना नकारात्मक परिणाम होऊ शकतात; परंतु इतरांसाठी ते सकारात्मक असू शकतात. जेव्हा काही कंपन्या स्पर्धेतून इतरांवर विजय मिळवितात, तेव्हा ते शून्य समतोल खेळ म्हणून ओळखले जाऊ शकते. पेढ्यांना निगमनामध्ये जसे अडथळे येतात, तसेच बाजारामध्ये आगमन किंवा प्रवेश करतानादेखील अडथळे येतात.
समीक्षक : सुहास सहस्त्रबुद्धे