फ्रॉईड, सिग्मंड : (६ मे १८५६ – २३ सप्टेंबर १९३९) ऑस्ट्रियन साम्राज्यातील मोरेव्हियातील फ्रायबर्ग गावात, सिग्मंड फ्रॉईड यांचा जन्म झाला. सिग्मंड यांचे प्राथमिक शिक्षण सलग एकाच ठिकाणी झाले नाही. सिग्मंड अभ्यासात हुशार होते आणि शालेय परीक्षेत ते नेहमी उत्तम यश मिळवीत. व्हिएन्नातील स्पर्ल या शाळेत त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले.
आपले अठ्ठयाहत्तर वर्षाचे आयुष्य फ्रॉईड यांनी व्हिएन्नात व्यतीत केले. गटे या जर्मन कवी आणि नाटककाराच्या साहित्याच्या प्रभावामुळे सिग्मंड फ्रॉईड निसर्गाकडे आणि परिणामी वैद्यकीय क्षेत्राकड आकृष्ट झाले असावेत. फ्रॉईड यांनी व्हिएन्ना विद्यापीठातून एम.डी. पदवी मिळवली. त्यानंतर दोन वर्षानी ते व्हिएन्ना विद्यापीठात अध्यापनाचे काम करू लागले.
तेथे अर्न्स्ट विल्हेल्म फॉन ब्रूक यांचे मार्गदर्शन फ्रॉईड यांना लाभले. अतिकुशाग्र बुद्धिमत्तेचे वयाने चाळीस वर्षे ज्येष्ठ असलेले ब्रूक यांच्याकडून फ्रॉईड अनेक गोष्टी शिकले. स्वप्ने, आकांक्षा, इच्छा, चिंता इ. गोष्टी मनात वसलेल्या असतात आणि मन मेंदूत. मेंदूतील भागांच्या रचनांचा, रसायनांचा अभ्यास केला पाहिजे तरच मेंदूत निर्माण होणाऱ्या तरल आणि अगम्य वाटणाऱ्या भावभावना, विचार यांचे स्वरूप हळूहळू कळेल. ही ब्रूक यांची शिकवण फ्रॉईड यांना पटली आणि त्यांनी मेंदूचा सखोल अभ्यास केला.
प्रस्थापित विचाराना छेद देणाऱ्या फ्रॉईड यांच्या मनोविश्लेषणाभिमुख भूमिकेला नाझींचा विरोध होता. तो एवढा प्रखर होता की जर्मनीत त्यांच्या पुस्तकांची होळी करण्यात आली. नाझींमुळे जीवाला धोका असल्याची जाणीव होऊन फ्रॉईड यांनी व्हिएन्ना सोडले. ते लंडनमध्ये स्थायिक झाले.
विपुल शब्द थिटा वाटावा एवढी प्रचंड प्रकाशन संपदा म्हणजे पुस्तके, निबंध किंवा लेख मिळून तब्बल ३२० रचना फ्रॉईड यांनी निर्माण केल्या. आपल्या लिखाणातून फ्रॉईड यांनी आपण विचार कसा करतो याचा विचार करायला मानवजातीला प्रवृत्त केले. त्यांचे सर्व लिखाण मूळ जर्मन भाषेत असून त्यापैकी बहुतेक पुस्तकांच्या इंग्रजी आणि अन्य भाषांत आवृत्त्या उपलब्ध आहेत.
त्यांचे सर्वात महत्त्वाचे पुस्तक, द इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स आहे. हे पुस्तक मानसशास्त्रात मैलाचा दगड ठरले. फ्रॉईड यांनी लिहिलेले हे सर्वात मोठ्या आकारमानाचे पुस्तक आहे. या ग्रंथाच्या लिखाणात, संस्करणात फ्रॉईड यांनी नमूद केल्याप्रमाणे त्यांना स्वतः लाच मनातील भावनिक गुंते विंचरण्यास मदत झाली. पुस्तकाचा खप सुरुवातीच्या पाच-सहा वर्षांत अगदी नगण्य झाला. इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स मध्ये फ्रॉईड यांनी आपली मनोविश्लेषणाची उपपत्ती-मानसिक, तात्विक दृष्ट्या मांडली आहे. मेंदूकडे आलेल्या संवेगांतून आकलन कसे होते, स्वप्ने आणि स्मृती यांचा संबंध काय, मनोविश्लेषणाची क्रिया कशी चालते, आलेल्या संवेगांतून कोणता बोध घेतला जातो याचा उहापोह द इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स पुस्तकामध्ये केला आहे. बाल्यावस्थेत लहान मुलाला आईविषयी जास्त प्रेम आणि वडिलांविषयी असूया वाटते. कारण त्याला या वयात वडील आईचे प्रेम मिळवण्यात स्पर्धक वाटतात. या उलट लहान मुलीला वडिलांविषयी जास्त प्रेम आणि आईविषयी असूया वाटते. या संकल्पनेला फ्रॉईड यांनी इडिपस गंड (Oedipus complex) असे नाव दिले. स्वतःच्या पूर्वानुभवातून सुचलेली इडिपस गंड संकल्पना त्यांनी द इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्समध्ये प्रथमच सादर केली. या पुस्तकातील तीन मुख्य मुद्दे म्हणजे-स्वप्ने सुप्त इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. ती नुकत्याच घडलेल्या घटनांशी, बालपणीच्या अनुभवांशी आणि ज्ञानेंद्रियांकडून येणाऱ्या संवेगांशी संबंधित असतात.
मानसशास्त्र, मनोविकारशास्त्र, मानसोपाचारशास्त्र, चेताविज्ञान, चेताविकृतीशास्त्र, नीतीशास्त्र, न्यायवैद्यकशास्त्र, समाजशास्त्र अशा विविध ज्ञानशाखांच्या अभ्यासकांना फ्रॉईड यांच्या पुस्तकांची दखल आजही घ्यावीच लागते.
पहिल्या टप्प्यात एक-दोन वर्षाच्या लहान बाळात लैंगिकता मुखामध्ये (ओठ, तोंड) एकवटलेली असते. दुसऱ्या टप्प्यात तीन वर्षाच्या आणि थोड्या मोठ्या बालकांत लैंगिकता मल-मूत्र रोखून धरणे. गुदद्वार, मलमार्ग, मूत्रमार्ग याना स्पर्श करून त्यांची रचना जाणणे, त्यांत निर्माण होणाऱ्या संवेदनांचा अनुभव घेणे. या (एनल) अवस्थेतील लैंगिकता ही मल-मूत्र विसर्जनाच्या भागात एकवटलेली असते.
त्यापुढील अवस्थेत हळूहळू मूल स्वत:च्या जननेंद्रियाना स्पर्श करून स्पर्शसुख अनुभवु लागते. ही लिंगकेंद्रित (जेनिटल) अवस्था आहे. नार्सिसस हे ग्रीक पुराणातील पात्र पराकोटीचे स्वमग्न असते. त्यावरून बालकांतील या लिंगकेंद्रित अवस्थेला नार्सिसिस्टिक अवस्था असे नावही दिले गेले आहे.
त्यापुढे म्हणजे सहा ते बारा या वयात मुलांना आईबाबा पूर्वीइतकेच आवडत असले तरी आईबाबांनी इतरांसमोर प्रेम व्यक्त केले, मुलांना कुरवाळले तर ते त्यांना आवडत नाही.
तेरा पासून काही वर्षे मुलांना मुलांच्या सहवासात रहायला आवडते. तसेच मुलींना मुलींच्या सहवासात रहायला आवडते. स्वतःच्या लिंगाच्या आणि जवळपास स्वतःच्याच वयाच्या मुला-मुलींच्या समूहात सुरक्षित वाटते.
त्यापुढे मात्र कायद्याच्या दृष्टीने सज्ञान अशा युवकांना सामान्यतः युवतींचा आणि युवतींना सामान्यतः युवकांचा सहवास आवडू लागतो. ते भावनिक, शारीरिक, सामाजिकदृष्ट्या परिपक्व होतात. विवाहित स्त्री-पुरुष आणि कालांतराने मातापिता म्हणून जबाबदारी स्वीकारू शकतात. लिंगभाव, लैंगिकता आणि कामजीवन याबद्दलचे फ्रॉईड यांनी केलेले मूलगामी विवेचन यामुळे विचारी लोकाना नवा दृष्टीकोन मिळाला. अनेक मानसिक विकृतींच्या मुळाशी लैंगिक जीवनातील अतृप्तता, किंवा बालपणातील लैंगिक हिंसा, त्या शोषणातून झालेला मनावरील आघात असे फ्रॉईड याना वाटे.
केवळ लैंगिकतेबद्दलच नाही तर अन्य काही बाबतीतही फ्रॉईड यांचे विचार अनेकांना न पटणारे आणि त्याज्य वाटत. धर्माचा घट्ट पगडा असणाऱ्या समाजासमोर ते धर्म हा मोठ्या मानव समाजाचा एक भ्रम आहे. धर्म माणसाला वास्तवापासून दूर ठेवतो असे विस्फोटक मत मांडत असत. त्याच वेळी त्यांना हेही मान्य होते की जनसामान्यांना धर्मामुळे एक व्यक्ती म्हणून आणि लोकसमूह म्हणून स्वतंत्र ओळख मिळते.
अर्थात फ्रॉईड यांना सर्वच गोष्टी कळत होत्या असे नाही. त्यांना कोकेनचा अवसाद (डिप्रेशन) कमी करण्यास उपयोग होतो हे समजले. म्हणून ते वापरण्याचा सल्ला त्यांनी अनेकांना दिला.
फ्रॉईड एक वर्षासाठी शिष्यवृत्तीवर पॅरिसला गेले होते. तेथे ब्रूक यांच्याप्रमाणे आणखी एका डॉक्टर प्राध्यापकांचा फ्रॉईड यांच्यावर प्रभाव पडला. ते म्हणजे पॅरिसमधील चेतातज्ज्ञ जॉं चार्कॉट. चार्कॉट हे जगातील अग्रगण्य चिंताग्रस्ततातज्ज्ञ होते. चिंताग्रस्ततेचे मुख्यतः स्त्रीमनोरुग्णांवरील परिणाम पाहून फ्रॉईड हेलावून गेले. तोतरेपणा, भ्रमिष्टपणा, स्वतःच्या वा प्रिय व्यक्तींच्या प्रकृतीची अतिकाळजी वाटणे, भावनांचा उद्रेक, फेपरे-आकडी येणे यासारखे मनोरुग्णांवरील परिणाम त्यानी अभ्यासले.
त्याआधारे जोसेफ ब्रूअर या सहलेखकाबरोबर फ्रॉईड यांनी द स्टडीज ऑन हिस्टेरिया हे पुस्तक लिहिले. उन्माद मनोविकाराचे व त्याने ग्रस्त रुग्णांची तपशीलवार माहिती या ग्रंथात आहे. यातील काही रुग्ण फ्रॉईड आणि ब्रूअर यांनी तपासलेले, मानसोपचार केलेले आहेत. अॅना ओ. सारखे रुग्ण फ्रॉईड यांनी केलेल्या मनोविश्लेषण क्रियांच्या तपशीलवार वर्णनातून वाचकांना सुपरिचित झालेले होते. रुग्णाला मोकळेपणे बोलू देऊन केलेले त्याचे मनोविश्लेषण मानसोपचार म्हणून उपयोगी ठरते हे या ग्रंथातून स्पष्ट होते. अॅना या स्त्रीरुग्णाने चर्चा उपचार प्रभावी ठरतो हे कबूल केले आणि त्याचा पुरस्कार केला आहे.
फ्रॉईड आणि सहकाऱ्यांच्या ज्ञानाचा परिणाम म्हणजे उन्माद या मनोविकाराच्या रुग्णांना सहानुभूतीची वागणूक मिळू लागली. त्यापूर्वी विशेषतः स्त्रीमनोरुग्णांना वेड्या, चेटकिणी समजून बांधून ठेवणे, चटके देणे, बडवून काढणे अशी अघोरी वागणूक दिली जात असे. चार्कॉट अशा मनोरुग्णांना संमोहनाचा उपचार देत. परंतु फ्रॉईड यांच्या असे लक्षात आले की त्याचा परिणाम तात्पुरता टिके. तरीही चार्कॉट यांच्या संमोहन उपचारातून फ्रॉईड यांना मनाचा शरीरावर किती जबरदस्त प्रभाव असतो हे लक्षात आले.
फ्रॉईड यांच्या द सायकोपॅथॉलॉजी ऑफ एव्हरीडे लाईफ या ग्रंथात मनोविश्लेषण विषयक उपपत्तीचा गोषवारा येतो. दैनंदिन जीवनातील घडणाऱ्या साध्यासुध्या घटना उदा., माणसांची आणि जागांची नावे विसरणे, उच्चारात चुका होणे, जीभ घसरल्याने बोलण्यात गडबड होणे या गोष्टी फ्रॉईड विचारात घेतात.
त्यांच्या इंट्रॉडक्शन टु सायकोअॅनालिसीस या ग्रंथातून मनोविश्लेषण मानसोपचार म्हणून उपयोगी ठरते हे अधोरेखित होते. त्यानी प्रारंभ केलेल्या मनोविश्लेषण पद्धतीचा या ना त्या प्रकारे आज जगभरातील मनोवैज्ञानिक वापर करतात.
वैयक्तिक जीवनात फ्रॉईड शिस्तबद्ध होते. व्यवस्थित शिष्टसंमत कपडे परिधान करणे, केस, दाढीची निगा राखणे ते काटेकोरपणे करीत. ग्रीस, इजिप्त, रोममधील अनेक प्राचीन वस्तूंचा संग्रह त्यांच्याकडे होता. त्यातील विशेषतः चीनमधील मूल्यवान वस्तू त्याना फार प्रिय होत्या. या वस्तू, एक लाकडी कोच आणि त्यावरील सुबक भरतकाम केलेल्या उशा- रजई अजूनही फ्रॉईड यांच्या लंडनमधील स्मृती संग्रहालयात आहेत. या कोचावर आरामात पहुडलेले तणावरहित रुग्ण त्यांच्यामागे मार्गदर्शक साक्षीदार रूपात खुर्चीत बसलेल्या फ्रॉईड यांच्याशी मन मोकळे करीत. एका वेळी पन्नास मिनिटांच्या सत्रात रुग्ण बोलत रहात आणि मनाच्या अंतरंगात डोकावायला फ्रॉईड यांना मदत करीत. चर्चा हाच फ्रॉईड यांच्या रुग्णांसाठी उपचार ठरे.
लंडनमधील वास्तव्यात फ्रॉईड याना तोंडाच्या अंत:त्वचेचा (leukoplakia) कर्करोग झाला. तो क्रमशः वाढत जाऊन शल्यक्रिया आणि औषधे याना न जुमानण्याएवढा गंभीर झाला व त्यात ते मृत्यू पावले.
संदर्भ :
- https://www.britannica.com/biography/Sigmund-Freud
- https://www.notablebiographies.com/Fi-Gi/Freud-Sigmund.html
- https://www.loc.gov/exhibits/freud/
- https://www.oxfordbibliographies.com/view/document/obo-9780199791231/obo-9780199791231-0105.xml
- https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/11919379/
समीक्षक : मोहन मद्वाण्णा